Tushar Gandhi : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसेच्या उदात्तीकरणाबाबत महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी खंत व्यक्त केली आहे. थोडीच वर्षे शिल्लक राहिली आहेत, आता हा देश गांधींचा राहणार नाही असं वक्तव्य तुषार गांधी यांनी केलं आहे. महात्मा गांधींची शिकवण संपुष्टात येत आहे आणि मारेकरी नथुराम गोडसेची विचारधारा प्रबळ होत आहे. देशात आता नवीन राष्ट्रपिता तयार होत असून त्याचे नाव नथुराम गोडसे असेल, असंही तुषार गांधी म्हणाले आहेत. आज 30 जानेवारी, महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त जालन्यातल्या जेईएस महाविद्यालयात 'करके देखो' हे व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. या व्याखानादरम्यान तुषार गांधी यांनी ही खंत व्यक्त केली आहे. केला आहे.


यावेळी बोलताना तुषार गांधी म्हणाले की,   देशातील सध्या स्थितीमध्ये प्रचंड विषमता असून गांधी विचारांचा द्वेष करणाऱ्या मानसिकतेकडून द्वेषाचा खुलेआम प्रसार होत आहे. त्यामुळे गांधी विचारांचा द्वेष करणारे हळू हळू आपल्या पायाखालची जमीन ओढून घेत असल्याचं तुषार गांधी यांनी म्हटलं आहे. स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असताना ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करत असतानाच समाजात ‘द्वेषाचे विष’ पसरत आहे. भारताच्या गौरवशाली आणि समृद्ध इतिहासाचे स्मरण करण्यासाठी सरकारकडून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे, परंतु आता ‘अमृत’ हे द्वेषाचे विष बनले असून ते वाढत आणि पसरतच आहे, असेही तुषार गांधी म्हणाले. 


काही लोक इतिहासाशी छेडछाड करत असून तो आपल्या पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आपल्याला खऱ्या इतिहासाला पुन्हा समोर आणावे लागेल. खरा इतिहास आपल्याला पुनरुज्जीवित करायचा असून समाजातील द्वेष आणि विभाजनाविरुद्ध आवाज उठवायचा आहे, असे तुषार गांधी या कार्यक्रमात म्हणाले.  आपण हिंसाचार, द्वेष आणि विभाजनाची संस्कृती स्वीकारली आहे. धर्म, जात, प्रदेश या आधारावर आपण विभागलो आहोत, असेही तुषार गांधी म्हणाले.  


देश म्हणजे फक्त ध्वज, सीमा आणि नकाशा नसतो. देश ही एक भूमी आहे, ज्यावर सर्व लोक राहतात अन् लोकच देश घडवतात. जेव्हा महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा काढण्याचा प्रस्ताव दिला होता, तेव्हा काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी या विचारधारेचा विरोध केला होता. त्यांना ही योजना यशस्वी होईल का, यावर त्यांच्या मनात शंका होती. यामुळे पक्षाचं नुकसान होईल, असेही त्या नेत्यांना वाटत होतं, असे तुषार गांधी म्हणाले. 


दांडी यात्रेवर शंका उपस्थित केल्यानंतरही महात्मा गांधी स्वातंत्र्यासाठीच्या आंदोलनात सहभागी झाले. शंका उपस्थित करणाऱ्यांना महात्मा गांधी यांनी फक्त 'कर के देखो' इतकेच उत्तर दिले होतं. आपल्याला आजही द्वेष, विभाजन आणि असमानतेविरोधात काम करण्याची गरज आहे. आपल्याला महात्मा गांधी यांना खरी आदरांजली वाहायची असेल तर त्यांची शिकवण आणि त्यांच्या विचारसरणीचे पालन करायला हवे, असे तुषार गांधी म्हणाले.  


हेही वाचा : नथुराम गोडसेंनी महात्मा गांधींचा वध केला, नाना पटोलेंचं वादग्रस्त वक्तव्य