सोलापूर : एकीकडे अमेरिकेतील फुलब्राईट स्कॉलरशिपची संधी आणि दुसरीकडे शिक्षणाधिकाऱ्यांनी कायद्याचा बडगा उगारत दिलेला कारवाईचा इशारा. या सगळ्या प्रकारानं ग्लोबल टीचर अवार्ड (Global Teacher Award) विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले गुरुजी (Ranjitsinh Disale) व्यथित झाले आहेत. इतके की ते शिक्षक म्हणून सरकारी नोकरी सोडण्याच्या मनस्थितीत आहेत. ग्लोबर टीचर अॅवार्ड मिळाल्यापासून शिक्षण विभागातल्या काही अधिकाऱ्यांनी त्रास दिला.पैशाची मागणी केली. एवढंच नाही तर फुलब्राईट स्कॉलरशिपसाठी केलेल्या अर्जावरही अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळं फुलब्राईट स्कॉलरशिपही हातातून जाण्याची शक्यता आहे असं डिसले गुरुजींनी एबीपी माझाला सांगितलंय. एबीपी माझाशी बोलताना डिसले गुरुजींच्या डोळ्यात पाणी आलं होतं. सरकारी नोकरीत होणाऱ्या त्रासामुळं डिसले गुरुजी उद्विग्न झाल्याचं दिसतं आहे. दरम्यान यावर आज जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी तसेच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून आहे.
काय म्हणाले रणजितसिंह डिसले?
रणजितसिंह डिसले Abp Majha सोबत बोलताना म्हणाले की, पुरस्कार मिळाल्यापासून शिक्षण विभागातल्या काही अधिकाऱ्यांनी त्रास दिला. पुरस्कार मिळाल्यानंतर खूप मानसिक त्रास झाला. जेवणावळी कराव्या अशी मागणी केली गेली. ते म्हणाले की, 25 जानेवारीला फुलब्राईटसाठी अंतिम कागदपत्रे दाखल करायची आहेत.14 डिसेंबरला रजेचा अर्ज केला होता, त्यावर अद्याप निर्णय नाही. फुलब्राईट हातातून जाण्याची शक्यता आहे, असंही ते म्हणाले.
डिसले म्हणाले की, राज्यपाल येणार होते तेव्हा थेट राज्यपालांशी संपर्क का साधला याचा राग त्यांना आहे. राज्यपालांशी थेट संपर्क झाला, यानंतर अधिकाऱ्यांनी थेट तुझा वारे गुरूजी करू असा निरोप दिला. या व्यवस्थेत राहणे शक्य होत नाही. झोपही लागत नाही. घरी सगळ्यांशी चर्चा केली आहे. बाहेर पडायचे ठरवले आहे. सतत होणाऱ्या आरोपामुळे व्यथित आहे. वारे सर व्हायच्या आधी बाहेर पडणार असल्याचं डिसले गुरुजी म्हणाले.
डिसले गुरुजींवर काय आहेत आरोप
रणजितसिंह डिसले गुरुजी कारवाईच्या कचाट्यात सापडले आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी यांनी रणजित डिसले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. डिसले गुरुजी गेल्या तीन वर्षांपासून आपल्या शाळेकडे फिरकलेच नाही, तीन वर्षांच्या काळात डिसले गुरुजींनी काय केलं? याबाबत चौकशी समितीचा अहवाल जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे प्राप्त झालाय. त्यामुळं डिसले गुरुजींवर कायदेशीररित्या कारवाई करण्यात येणार आहे असं शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी म्हटलंय. रणजितसिंह डिसले यांना अमेरिकन सरकारकडून दिली जाणारी प्रतिष्ठित फुलब्राईट स्कॉलरशिप रणजितसिंह डिसले यांना जाहीर झाली आहे. याविषयावर संशोधन करण्यासाठी त्यांना सहा महिने अमेरिकेत जाऊन अभ्यास करायचे आहे. यासाठी दीड महिन्यांपूर्वी सोलापूर जिल्हा परिषदेकडे अध्यापन रजा मिळवण्यासाठी अर्ज केला होता. काल जेव्हा डिसले गुरुजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे भेटीला गेले होते तेव्हा सादर केलेल्या अर्जामध्ये त्रुटी असल्याचं सांगितलं गेलं
भाजपकडून निषेध -
ग्लोबल टिचर पुरस्कार मिळवणारे बार्शी जी सोलापूर जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक रणजित डिसले गुरुजी यांनी PHD करण्यासाठी अमेरिका जायला रजा मागितली. पण शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी डिसले यांना रजा नाकारणे, त्यांच्या जाण्यावर आक्षेप घेणे निंदनीय आहे. देशाच्या शिक्षण क्षेत्राची मान उंचवणाऱ्या गुरुजीला असा अनुभव येणे चुकीचे असून अशा शिक्षणधिकाऱ्याचा निषेध आहे, असं भाजपचे राज्य प्रवके राम कुलकर्णी यांनी केला आहे.
कोण आहेत रणजित डिसले?
- 2009 साली सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षक म्हणून रुजू
- सोलापूर जिल्हा परिषदेच्या परितेवाडीच्या शाळेत प्राथमीक शिक्षक म्हणून कार्य
- 2017 साली सोलापुरातील वेळापूर येथील जिल्हा शिक्षण प्रशिक्षण केंद्र येथे प्रतिनियुक्ती
- जिल्हा शिक्षण प्रशिक्षण केंद्रात IT विषय सहाय्यक म्हणून नेमणूक
- तंत्रस्नेही अशी ओळख असलेल्या डिसले यांनी विद्यार्थ्यांना व्हर्च्युअल विज्ञान प्रयोग शिकवले
- QR कोडेड पाठयपुस्तकाची संकल्पना मांडली
- लेट्स क्रॉस द बॉर्डर या उपक्रमाच्या माध्यमातून जगभरातील अशांत देशातील मुलांना एकत्र आणून त्यांच्यात अहिंसेच्या विचारांचा प्रसार करण्याचे काम
- कार्याची दखल घेत त्यांना 4 डिसेंबर 2020 रोजी ग्लोबल टीचर अवॉर्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
- जून 2021 मध्ये वशिंग्टन dc मधील जागतिक बँकेच्या सल्लागर पदी नेमणूक करण्यात आली
- शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल ग्वाल्हेरच्या आयटीएम विद्यापीठकडून 20 नोव्हेंबर 2021 रोजी मानद डॉक्टरेट प्रदान
- 1 डिसेंबर 2021 रोजी अमेरिकेन सरकारची प्रतिष्ठित फुल ब्राईट स्कॉलरशिप जाहीर करण्यात आली
- याच स्कॉलरशिपसाठी डिसले यांना अमेरिकेत जायचे आहे
काय आहे फुलब्राईट शिष्यवृत्ती?
- अमेरिकन सरकारकडून दिली जाणारी प्रतिष्ठित फुलब्राईट स्कॉलरशिप
- 2021 मध्ये जगभरातील 40 शिक्षकांना ही प्रतिष्ठेची स्कॉलरशिप जाहीर
- पीस इन एज्युकेशन या विषयावर अमेरिकेतील विद्यापीठात अधिक संशोधन करण्यासाठी त्यांना ही स्कॉलरशिप जाहीर करण्यात आली
- लेट्स क्रॉस द बॉर्डर या उपक्रमाच्या माध्यमातून ते जगभरातील अशांत देशातील मुलांना एकत्र आणून त्यांच्यात अहिंसेच्या विचारांचा प्रसार करण्याचे काम ते करत आहेत
- याच विषयावर अधिक संशोधन करण्याची संधी डिसले गुरुजींना या स्कॉलरशिपच्या माध्यमातून मिळणार
- अमेरिकन सरकारकडून दिली जात असून हे 75 वे वर्ष आहे.
संबंधित बातम्या
ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसलेंना सरकारी 'बाबूं'चा त्रास, नोकरी सोडण्याच्या मनस्थितीत
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI