Bhagwat Karad : ग्रामीण आणि शहरी भागातील जनतेचे अधिकाधिक प्रमाणात आर्थिक समावेशन झाल्यास देशाच्या अर्थकारणाला गती मिळेल, असे वक्तव्य केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) यांनी व्यक्त केले. महानगरपालिका क्षेत्रातील फेरीवाल्यांना केंद्रीय योजनेचा लाभ देण्यासाठी आणि त्यासंबंधीची जागरुकता वाढवण्यासाठी विभागवार बैठका घेण्यात येत आहेत. फेरीवाल्यांचे बँकेत खाते, आधार आणि महानगरपालिकेत नोंदणी असल्यास त्यांना स्वनिधी योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याचे कराड म्हणाले. प्रथम 10 हजार रुपये कर्ज आणि वेळेवर परतफेड केल्यास नंतर 20 हजार व त्यानंतर 50 हजार रुपये कर्ज देण्यात येईल. बैठकीत ठरवलेले उद्दिष्ट एका महिन्यात पूर्ण करून गोरगरिबांना प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा लाभ द्यावा, असे आवाहन देखील त्यांनी केलं.


पुण्यातील हॉटेल शेरेटन ग्रँड येथे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांच्या अध्यक्षतेखाली प्रधानमंत्री स्वनिधी आणि पुणे विभागीय बँकर्स समितीची बैठकीत आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला खासदार उदयनराजे भोसले, खासदार श्रीरंग बारणे, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार गोविंदराव केंद्रे उपस्थित होते. मागील आठ वर्षात गरिबांच्या आर्थिक उन्नतीसाठी तीन स्तरावर प्रयत्न करण्यात येत असल्याचे कराड म्हणाले. बँक खाते नसलेल्यांचे खाते उघडणे, विमा योजनेचा सर्वसामान्यांना लाभ देणे आणि अर्थ सहाय्यापासून वंचित असलेल्यांना ते उपलब्ध करुन देण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याचे कराड म्हणाले.


पशुपालन आणि मत्स्यव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांनाही मदत


पशुपालन आणि मत्स्यव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांनाही किसान क्रेडीट कार्डच्या माध्यमातून अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सुमारे 47 कोटी जनधन खाते सुरू करण्यासोबत या खात्यांशी आधार व मोबाईल जोडणी केल्यानं शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत पोहोचवणं शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीस राज्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर  सिंह, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, नगर विकास संचालक किरण कुमार उपस्थित होते.


गरिबांचा विकास झाल्यास देशाचा विकास वेगाने होणार : चंद्रकांत पाटील


प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला व्यवसायासाठी निधी उपलब्ध करुन देत त्यांची आर्थिक उन्नती व्हावी, यासाठी बँकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. गरिबांचा विकास झाल्यास देशाचा विकास वेगाने होणार असल्याने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योजना राबवण्यात येत आहेत. गरजू व्यक्तींना मोफत सुविधा देण्याऐवजी त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केल्यास त्यांची खऱ्या अर्थाने प्रगती साधता येईल आणि देशाच्या विकासालाही हातभार लागेल असेही पाटील म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या:


Minister Bhagwat Karad : अमेरिका, चीन यांच्या महागाई दरापेक्षा आपल्या देशाची महागाई कमी : मंत्री डॉ. भागवत कराड