Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या समोरच आज (9 जानेवारी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपली भावना व्यक्त करताना प्रदेशाध्यक्षपदी मराठा व्यतिरिक्त चेहरा देण्याची मागणी केली. यावेळी प्रदेशाध्यक्षांसह सर्व फ्रंटचे पदाधिकारी बदलण्यात यावेत, राज्यांमध्ये वेगळं वातावरण असल्याने मराठा व्यतिरिक्त प्रदेशाध्यक्षपदी तरुण चेहऱ्याची नियुक्ती करा, जो प्रदेशाध्यक्ष वेळ देणारा असेल आणि सामान्य कार्यकर्त्यांना भेटणारा असेल अशा चेहऱ्याला प्रदेशाध्यक्षपदी संधी द्या अशी थेट मागणीच शरद पवार यांच्यासमोर करण्यात आली. 


दुसरीकडे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची मुंबईत दोन दिवसीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. या आढावा बैठकीच्या पहिल्या दिवसी काल पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आक्रमक झाल्याचे दिसून आले. निकालानंतर काही नेते आणि पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना पुष्पगुच्छ दिल्याने कार्यकर्ते आणि जनतेत संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. यावरून पाटील यांनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे. 


जायचं असतं तर यापूर्वीच गेलो असतो


दरम्यान, मी कुठेही जाणार नाही, जायचं असतं तर यापूर्वी गेलो असतो, असेही जयंत पाटील यांनी म्हटल्याची माहिती समोर आली आहे. पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आळस झटकून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीला लागण्याच्या सूचनाही जयंत पाटील यांनी दिल्या.


पण कोणाचाही विश्वासघात करणार नाहीत


दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊन निवडणूक लढवणार का, अशी चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. त्याचवेळी, महाराष्ट्र निवडणुकीचे निकाल आल्यानंतर लगेचच अजित पवार गटनेते प्रफुल्ल पटेल यांनीही शरद आणि अजित पवार एकत्र येऊ शकतात, असे म्हटले जात होते. मात्र, जितेंद्र आव्हाड यांनी असे काहीही होणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. काका-पुतणे एकत्र येणार नसल्याचे आव्हाड यांनी स्पष्ट केले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, "आमच्यासारखे कार्यकर्ते मरण पत्करतील, पण कोणाचाही विश्वासघात करणार नाहीत. आमचा पक्ष तोडला गेला आणि आमचे चिन्हही हिसकावले गेले. पवार साहेब (शरद पवार) म्हणाले की आम्ही कुठेही जाणार नाही. आता आमच्या खासदारांना घेऊन जाण्याची तयारी सुरू आहे, पण कोणीही जाणार नाही.


इतर महत्वाच्या बातम्या