नांदेड : वीस वर्षापूर्वी पाकिस्तानमध्ये हरवलेली गीता आठवतेय का? ही तीच गीता आहे जिला पाच वर्षांपूर्वी तत्कालीन विदेशमंत्री स्व. सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानातून देशात आणलं होतं. पाच वर्षांपासून गीताचे भारतात असलेले कुटुंब शोधण्यात येत असून आता नांदेड शहरासह जिल्ह्यात शोध घेतला जात आहे. गीता ही मूकबधीर असून विदेश मंत्री स्व. सुषमा स्वराज यांनी गीताला देशात आणल्यानंतर कुटुंबाचा शोध घेतला जाईल तोपर्यंत इंदौर येथील ज्ञानेंद्र पुरोहित यांच्या आनंद सर्व्हिस सोसायटीकडे सांभाळ करण्यासाठी दिले होते. सुषमा स्वराज हयात असताना गीताची नेहमी चौकशी करून काळजी घेत असायच्या. पाच वर्षापासून गीताच्या कुटुंबाचा शोध घेतला जात आहे.
आता गीता आपल्या कुटुंबाचा शोध घेत नांदेडमध्ये दाखल झाली आहे. गीताला ऐकूही येत नाही आणि बोलूही शकत नाही. ती हरवली होती तेव्हा केवळ आठ वर्षाची होती. आता तिचे वय 28 वर्ष आहे. ती सचखंड एक्सप्रेसने बसून त्यानंतर समझोता एक्सप्रेसने पाकिस्तानला पोहोचली असावी असा अंदाज आहे.
सदरील परिसराची ओळख म्हणून गीता रेल्वे स्टेशन, स्टेशनच्या बाजूला नदी, मंदिर, दवाखाना, परिसरात ऊस व तांदळाचे उत्पन्न घेतले जाते,असे तिच्या भाषेत सांगत आहे. त्यामुळे ती नांदेड किंवा शेजारील तेलंगाणा परीसरातील असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. गीताला तिच्या परिवाराचा शोध घेण्यासाठी इंदौर येथील ज्ञानेंद्र पुरोहित, सुमित्रा मुवेल, जालना येथील राज्यस्तरीय कर्णबधीर संस्थेचे मनोज पटवारी, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. डी. भारती हे परिश्रम घेत आहेत.