बीड : खंडणी, सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून निर्घृण हत्या आणि आणि वादातून दोन सख्ख्या भावांची हत्या असा भयंकर प्रकार बीड जिल्ह्यामध्ये सुरू असतानाच आणखी एक धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यामध्ये शुक्रवारी घडला. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई तालुक्यामध्ये प्रेयसीने बोलणं बंद केल्याने थेट तिच्या दारात जाऊन खिडकीतून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. मात्र, या घटनेमध्ये युवतीच्या घरची मंडळी दुसऱ्या खोलीमध्ये थांबली असल्याने यावेळी कोणतीही अनुचित घटना घडली नाही. मात्र, या घटनेनंतर पुन्हा एकदा बीडमधील शस्त्र परवाना आणि गावठी कट्टाचा मुद्दा समोर आला आहे.
दरवाजा कोणीच न उघडल्याने गावठी कट्टातून खिडकीतून गोळीबार
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसा संबंधित तरुणीशी प्रियकर गणेश पंडित चव्हाणचे (वय 24) प्रेमसंबंध होते. मात्र, गणेश चव्हाणच्या त्रासाला संबंधित युवतीने त्याच्याशी बोलणे बंद केले होते. यानंतर गणेश चव्हाणने युवती व तिच्या कुटुंबास जीवे मारण्याची धमकी दिली होती. याच रागातून तो आंबेजोगाईमध्ये आला होता. यावेळी त्याने थेट युतीच्या घरी जात तिच्या घराचा दरवाजा ठोठावला. मात्र, आतून दरवाजा कोणीच न उघडल्याने गावठी कट्टातून त्याने खिडकीतून गोळीबार केला. मात्र, यावेळी कुटुंबातील इतर मंडळी दुसऱ्या खोलीमध्ये असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. हा गोळीबार गावठी कट्ट्यामधून करण्यात आला. पोलिसांनी गणेश चव्हाणला अटक केली आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यामधील धक्कादायक घटनांमध्ये मालिका सुरुच आहे.
तोतया अधिकारी पोहोचला उपोषणस्थळी, उपोषण सोडण्यासाठी केली विनंती
दरम्यान, बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सुरू असलेल्या उपोषणस्थळी एका तोतया शासकीय अधिकाऱ्याने भेट दिली. ही बाब लक्षात येताच नागरिकांनी गोंधळ घातला. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बीड रेल्वे स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं नाव देण्यात यावं, या मागणीसाठी मागील पाच दिवसांपासून उपोषण सुरू आहे. याच उपोषणस्थळाला शासकीय अधिकारी असल्याचे सांगत एका व्यक्तीने भेट दिली आणि उपोषण मागे घेण्याची विनंती केली. परंतु, हीच बाब लक्षात येताच या ठिकाणच्या नागरिकांनी मोठा गोंधळ घातला. दरम्यान, यावेळी तत्काळ शासकीय अधिकाऱ्यांनी धाव घेऊन आंदोलकांची समजूत काढली. मात्र, या प्रकारामुळे 26 जानेवारीला आंदोलकांनी सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या