Shaktipeeth Expressway: शक्तीपीठ महामार्गातून (Shaktipeeth Expressway) ज्या पद्धतीने कोल्हापूर वगळलं, त्याच पद्धतीने सांगली जिल्ह्यालाही वगळावं. सरकारला ही शेवटची विनंती, अन्यथा आंदोलन करावा लागेल, असा खासदार विशाल पाटील (Vishal Patil) यांनी सरकारला इशारा दिला आहे.
आम्ही शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत नाही. शक्तीपिठाला रत्नागिरी-नागपूर हा पर्यायी रस्ता आहे. याच रस्त्याला शक्तीपीठ जोडावेत. ज्या भागात शेतकरी जमिनी द्यायला तयार आहेत, त्या ठिकाणच्या जमिनी घ्याव्यात. तासगाव , मिरज या तालुक्यातील शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गास विरोध आहे. नियोजित शक्तीपीठ हा खरोखरच शक्तीपीठाला जोडणारा रस्ता आहे की दुसऱ्या हेतून निर्माण केलेला रस्ता आहे. कमी खर्चात जमीन अधिग्रहण करून त्यासाठी जास्त खर्च करण्यासाठी हा प्रकल्प आहे अशी शंका येते, असंही विशाल पाटील म्हणाले.
शेतकऱ्यांचा जमिनी देण्यास नकार- विशाल पाटील
वास्तविक पाहता शक्तीपीठ महामार्गास जमिनी देण्यासाठी शेतकऱ्यांची मानसिकता नाही. नदीकाठच्या पिकाऊ जमिनी आहेत. शेतकऱ्यांनी कष्ट करून ऊस बागा पिकवले आहेत. शासनाकरून जिरायत नोंद झाली आहे. त्यामुळे मूल्यांकनही कमी होते परिणामी नुकसान भरपाई कमी मिळते. जिरायतीची नोंद बागायत केली तर नुकसान भरपाई दुप्पट मिळेल तर तुम्ही जमिनी देण्यास तयार आहात काय अशी शेतकऱ्यांशी चर्चा केली. तरीही शेतकऱ्यांचा जमिनी देण्यास नकार आहे, असं विशाल पाटील यांनी सांगितले.
शक्तीपीठ महामार्गाला हिंगोलीच्या शेतकऱ्यांचासुद्धा विरोध-
शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर सांगली पाठोपाठ आता हिंगोली जिल्ह्यातून सुद्धा विरोध होतोय. या महामार्गासाठी महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातून 27 हजार हेक्टर शेत जमिनीचा अधिग्रहण केला जाणार आहे. यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील सुद्धा शेत जमिनीचा समावेश असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुद्धा या शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवला आहे. आमच्याकडे असलेल्या बागायती शेत जमिनीच्या भरोशावर आमचा उदरनिर्वाह होत असतो. जर त्या शेती मधून महामार्ग नेला तर आमच्यावर उपासमारीची वेळ येईल. त्यामुळे या महामार्गाला विरोध असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे. सरकारने कितीही मोबदला दिला तरीही आम्ही आमच्या जमिनी शक्तीपीठ महामार्गाला देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.
कोणत्या देवस्थानांना हा शक्तीपीठ महामार्ग जोडणार?
कोल्हापूर - अंबाबाई, तुळजापूर - तुळजाभवानी. नांदेड - माहूरची रेणुका देवी या तीन शक्ती पीठांना जोडणारा हा महामार्ग असणार आहे. परळी वैजनाथ, हिंगोली जिल्ह्यातील औंधा नागनाथ (नागेश्वर), माहूरची रेणुकादेवी, तुळजापूरची तुळजाभवानी, पंढरपुरचे विठ्ठल रखुमाई मंदिर, कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, सोलापुरातील सिद्धरामेश्वर, अक्कलकोट, गाणगापूर, कारंजा (लाड), नृसिंहवाडी, औदुंबर या बारा देवस्थानांना हा महामार्ग जोडणार आहे.