नागपूर : नागपुरातील 20 वर्षांच्या सानिका थुगावकरने अखेर मृत्यूसमोर हात टेकले. अडीच महिन्यांपूर्वी एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने सानिकावर चाकूने वार केले होते. रोहितला घटनेच्या दोन दिवसांनंतर मुंबईजवळच्या कल्याणमधून अटक करण्यात आली होती.

मूळची अमरावतीची असलेला सानिका नागपुरात टेक्स्टाईल इंजिनियरिंग शिकत होती. पहिल्या वर्षाला ती युनिव्हर्सिटीची टॉपरही होती. तिच्यावर रोहित हेमनानी या तरुणाचं एकतर्फी प्रेम होतं. रोहितचं मोबाईल रिपेअरिंगचं छोटं दुकान होतं. तो कायम सानिकाच्या मागावर असायचा. पण सानिकाने दिलेला नकार त्याला पचनी पडला नाही.

1 जुलै 2018... सानिका नागपुरातल्या लक्ष्मीनगर भागात रात्री आठ वाजता आपल्या मामांच्या कार्यालयात बसली होती. त्याचवेळी रोहित तिथे पोहोचला आणि त्याने सानिकावर चाकूचे वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सानिकाला टाकून रोहित पसार झाला आणि सानिकाची मृत्यूशी लढाई सुरु झाली.

गेल्या अडीच महिन्यांपासून सानिकाचा परिवार, मित्रमंडळी सानिका बरी होईल, अशी आशा लावून बसले होते. पण प्रेमात राक्षस झालेल्या रोहितनं तिला जगू दिलं नाही.

वेड्या प्रेमापोटी... एकीचा जीव गेला... एक तुरुंगात गेला... आणि सानिकाभोवती असलेल्या शेकडो जणांना आयुष्यभराची सल लागून राहिली.