जळगाव: मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या विश्वस्तांना धमकावल्याचा आरोप असलेले भाजपाचे नेते गिरीश महाजन यांच्यासह अन्य आरोपींनी मंगळवारी याच प्रकरणाशी संबंधित एका घटनेचा तपास सीबीआयकडे वर्ग करावा, अशी मागणी मुंबई उच्च न्यायालयाकडे केली आहे. यावर 'तुम्ही मागणी करू शकता, मात्र, तुमच्या सांगण्यावरून एका विशिष्ट तपास यंत्रणेकडे तपास सुपूर्द करता येणार नाही, कारण यात तुम्ही एक आरोपी आहात' असं हायकोर्टानं यावेळी स्पष्ट केलं. 


तीन वर्षापूर्वी, जानेवारी 2018 मध्ये पुणे कोथरूड परिसरात घडलेल्या घटनेसंदर्भात जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे विश्वस्त अ‍ॅड. विजय पाटील यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली होती. तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, ट्रस्टची कागदपत्रे घेण्यासाठी पाटील यांना पुण्यात बोलवण्यात आलं होतं. त्यानंतर तेथील लोकांनी गिरीशभाऊंना आता ट्रस्टवर ताबा हवाय, म्हणून तुम्ही राजीनामा द्या अशी धमकी दिली गेली असा आरोप या तक्रारीमध्ये विजय पाटील यांनी केला आहे. हे प्रकरण कोथरूड पोलीस ठाण्यात वर्ग करून भाजपा नेते गिरीश महाजन आणि त्यांचे स्वीय सचिव रामेश्वर नाईक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसह या दोघांनीही मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर मंगळवारी न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.


या प्रकरणात राज्य सरकारकडून हायकोर्टात माहिती देण्यात आली की, या प्रकरणी अद्याप सरकारी वकीलांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. तेव्हा, विशेष सरकारी वकिलांच्या नियुक्तीबाबत माहिती सादर करण्याचे निर्देश हायकोर्टानं राज्य सरकारला दिले. तसेच या याचिकेची सुनावणी 25 एप्रिलपर्यंत तहकूब करत तोपर्यंत गिरीश महाजनांसह इतरांना याप्रकरणी कठोर कारवाईपासून दिलेले संरक्षण कायम ठेवलं आहे. 


महाजनांकडून नवी याचिका 
गिरीश महाजनांवर ज्या प्रकरणात गुन्हाची नोंद आहे त्या प्रकरणातील तत्कालीन विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. प्रवीण चव्हाण यांचे स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून रेकॉर्ड केलेले व्हिडीओ काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी भर विधानसभेत समोर आणले होते. ज्यात चव्हाण हे महाजन यांना बनावट गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचं स्पष्ट दिसतंय असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी विधिमंडळात केला होता. याच प्रकरणी प्रवीण महाजन यांनी आता मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत, हे आपल्या विरोधातील राजकीय षडयंत्र असून अशा आरोपांमुळे आपली प्रतिमा मलीन होत असल्याचा दावा या याचिकेतून केलेला आहे. या याचिकेवर अन्य याचिकांसोबतच सुनावणी घेऊ असं हायकोर्टानं स्पष्ट केलंय.


महत्त्वाच्या बातम्या: