अहमदनगर : महाराष्ट्रतील छोटा पुढारी म्हणून नावलौकिक मिळवलेल्या घनश्याम दरोडेला दहावीत 51 टक्के मिळाले आहेत. शारीरिक आजार आणि गावातील विजेच्या समस्यांवर मात करुन त्याने हे यश मिळवलं. घनश्यामची मूर्ती लहान असली तरी त्याची किर्ती महान आहे.

दहावीच्या निकालानंतर एबीपी माझाने घनश्यामसोबत खास बातचीत केली. अभ्यासात आलेले विविध अडथळे, शेतकरी संप, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या समस्या या सर्वांवर त्याने सडेतोड उत्तरं दिली.

''सर्वांच्या आशीर्वादाने मी उत्तीर्ण झालोय''

''शाळेत जाताना रस्त्याची अडचण असल्याने पायी जावं लागतं होतं. जाताना वेळेचा अपव्यय होत होता. घरी अभ्यास करताना वीज जात असल्याने अडचणी आल्या. आजारी पडल्याने वेळ वाया गेला. अभ्यास करताना घरची कामं करुन अभ्यास केला. ‘मी येतोय’ या सिनेमाची निर्मिती आणि प्रमोशनमध्ये वेळ गेला'', असं सांगत आपण सर्वांच्या आशीर्वादाने उत्तीर्ण झाल्याचं घनश्यामने सांगितलं.

''जिल्हाधिकारी व्हायचंय''

घनश्याम श्रीगोंद्यात महाराजा विद्यालयात अकरावी कला शाखेत प्रवेश घेणार आहे. जिल्हाधिकारी होण्याची त्याची इच्छा आहे. त्यामुळे आपण अकरावीला कला शाखेला प्रवेश घेणार असल्याचं तो सांगतो.

''कमी मार्क पडले म्हणून खचून जाऊ नका''

''कमी मार्क पडलेल्या विद्यार्थ्यांनी रडून खचून निराश होऊन आत्महत्या करु नका. जीवन पुन्हा नाही. यंदा नाही तर पुढील वर्षी पास व्हाल. शिक्षण हे वाघिणीचे दूध असून ते प्राशन करायला शिका,'' असा सल्लाही घनश्यामने विद्यार्थ्यांना दिला.

''आजारी असताना काही कालावधी गेला. मात्र मी शिक्षणाकडं दुर्लक्ष केलं नाही. डॉक्टर आणि शिक्षकांनी आराम करायला सांगितलं. मात्र मी शाळेत जाऊन अभ्यास केला,'' अशी माहितीही घनश्यामने दिली.

''ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवा''

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी रस्ता, वीज आणि एसटीची समस्या सोडवा, असं आवाहनही घनश्यामने सरकारला केलं. ''पावसात मुलांना रस्ता नसल्यावर अडचणी येतात. मी सोसलेले हाल इतरांचे होऊ नयेत,'' असंही तो म्हणाला.

''मी एका शेतकरी उत्पादनाच्या कंपनीचा अ‍ॅम्बेसिडर आहे. या माध्यमातून पिकांची रोपं विक्री होतात. त्याचबरोबर ‘मी येतोय’ हा सिनेमा केला. महिनाभरात मी अभ्यास करुन पास झालो. एका मराठी वृत्तवाहिनीवर गंगुबाई गोट्या नावाची मालिका सुरु आहे,'' असंही त्याने सांगितलं.

''शेतकरी संपाला पाठिंबा''

''शेतकरी संपाला पूर्ण पाठिंबा आहे. कर्जमाफी आणि वीजबील माफ करत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही. मागण्या मान्य न केल्यास आत्महत्या करु नका तर लढा, रक्त सांडायची वेळ आली तरी संप मागं घेणार नाही,'' असंही घनश्यामने ठणकावून सांगितलं.

घनश्यामचे दहावीचे गुण

मराठी- 57

हिंदी- 51

इंग्रजी- 37

गणित- 35

टेक्नॉलॉजी सायन्स - 45

सोशल सायन्स- 63

एकूण – 500 पैकी 288

पाहा व्हिडीओ :