नागपूर: नागपुरात दिघोरी परिसरातील अराधनानगरमध्ये एकाच कुटुंबातील 5 सदस्यांची धारदार आणि वजनदार शस्त्राने अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली.
आज सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर नागपुरात एकच खळबळ उडाली.
प्रॉपर्टी डीलिंगचे छोटे व्यवसाय करणारे आणि भाजपचे स्थानिक कार्यकर्ता असलेल्या कमलाकर पवनकर आणि त्यांच्या कुटुंबाला कोणी संपवले, याचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार या हत्याकांडामागे कौटुंबिक आणि संपत्तीचा वाद असण्याची शक्यता आहे.
दरम्यान काल रात्री पवनकर यांच्या घरी त्यांचा मेहुणा मुक्कामी असल्यामुळे, पोलिसांचा संशय बळावला असून सध्या त्याचा शोध सुरु आहे.
एक घर,पाच हत्या, एक संशयित आणि एक गूढ
नागपूरच्या आराधनानगरातली आजची सकाळ थरकाप उडवणारी ठरली. कारण पवनकर कुटुंबातल्या घरात पडला होता मृतदेहांचा खच... आणि साचलं होतं रक्ताचं थारोळं..
या हत्याकांडामध्ये कमलाकर पवनकर, त्यांची पत्नी अर्चना पवनकर, आई मीराबाई पवनकर, मुलगी वेदांती पवनकर आणि मेहुण्याचा मुलगा कृष्णा पालटकर यांचा जीव गेला.
पण दुसऱ्या खोलीत झोपलेल्या कमलाकर यांची मुलगी वैष्णवी आणि मेव्हण्याची मुलगी सुदैवाने वाचली. पण प्रश्न असा आहे की इतकं क्रूर हत्याकांड घडवलं तरी कुणी?
मध्यरात्रीनंतर 1 ते 3 च्या दरम्यान पवनकर कुटुंबातील 5 सदस्यांची एकानंतर एक हत्या करण्यात आली. घरातल्या मुख्य बेडरुममध्ये एकाच डबलबेडवर कमलाकर पवनकर, त्यांची पत्नी अर्चना पवनकर, मुलगी वेदांती पवनकर आणि कमलाकरच्या मेहुण्याचा मुलगा कृष्णा पालटकर या चौघांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. तर वृद्धा मीराबाई पवनकर यांचा मृतदेह किचनमध्ये जमिनीवर होता.
कमलाकर पवनकर हे भाजपचे पदाधिकारी होते. त्यामुळे यामागे राजकीय वैमनस्य असल्याची चर्चा होती. कमलाकर हे प्रॉपर्टी डीलरही होते, त्यामुळे आर्थिक वादातून झाल्याचीही शक्यता वर्तवली गेली. पण पोलिसांना संशय मात्र वेगळाच आहे.
काल रात्री पवनकर यांच्या घरी पाच मृत, दोन बचावलेल्या सात जणांव्यतिरिक्त आणखी एक माणूस होता. कमलाकर यांचा मेहुणा विवेक पालटकर. त्याची गाडी घराबाहेर आहे. पण विवेक बेपत्ता आहे.
ना झटापटीचे निशाण, ना लुटीचा प्रयत्न. त्यामुळे हे कृत्य घरातल्याच माणसाने केलं असण्याची शक्यता दाट आहे..
आपल्याच पत्नीची हत्या करुन जेलमध्ये गेलेल्या विवेक पालटकरच्या दोन्ही मुलांची जबाबदारी कमलाकर यांनी घेतली होती. पण आज त्याच कमलाकर यांचं स्वतःच्या जीवासह अख्खं कुटुंब संपलं... मागे उरले... दोन कोवळे जीव.
संबंधित बातम्या
नागपुरात अख्ख्या कुटुंबाची हत्या, तीक्ष्ण हत्याराने पाच जणांचा खून
ना झटापट, ना लुटीचे निशाण, पवनकर कुटुंबाच्या हत्येचं गूढ
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Jun 2018 03:37 PM (IST)
प्रॉपर्टी डीलिंगचे छोटे व्यवसाय करणारे आणि भाजपचे स्थानिक कार्यकर्ता असलेल्या कमलाकर पवनकर आणि त्यांच्या कुटुंबाला कोणी संपवले, याचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -