रत्नागिरी : आपणा सर्वांना कावळा आणि बगळा यांची गोष्ट ठाऊक आहे. आपला रंग बगळ्याप्रमाणे सफेद व्हावा यासाठी कावळ्यानं लढवलेली शक्कल आणि त्यानंतर त्याचे झालेले परिणाम याची गोष्ट ऐकली नसेल असं झालंच नसेल. तसेच कावळ्याचा रंग काळा हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. पण, सफेद रंगाचा कावळा आम्ही पाहिल्याचं तुम्हाला कुणी सांगितल्यास तुमचा विश्वास नाही बसणार. उलट तुम्ही त्याची टर उडवल्याशिवाय राहणार नाही. पण, रत्नागिरी जिल्ह्यातील काळबादेवी या गावी सफेद कावळा आढळून आला आहे. सध्या या कावळ्याचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. सफेद रंगाचा कावळा हा सध्या सर्वांच्या कुतूहलाचा आणि चर्चेचा विषय झाला आहे.




काळबादेवी गावचे रहिवासी असलेल्या शेखर शेट्ये यांच्या घराच्या परिसरात या कावळ्याचं सर्वप्रथम दर्शन झालं. सुरूवातीला सफेद कावळा कबुतर असावं असा सर्वांचा होरा होता. पण, आवाजावरून मात्र तो कावळाच आहे यावर अखेर शिक्कामोर्तब झाले. तसं पाहायाला गेलं तर अभावानंच सफेद कावळ्याचं दर्शन होतं. पण, काळा रंग असणारा कावळा सफेद कसा होतो? किंवा ते कसं शक्य आहे? याबाबत आम्ही पक्षी अभ्यासक असलेल्या प्रतिक मोरे यांच्याशी संवाद साधला. त्यांनी दिलेल्या माहितीमुळे कावळ्याच्या रंगाबाबत झालेला गोंधळ सुटण्यास देखील मदत झाली. 


काय आहे पक्षी अभ्यासकांचं म्हणणं? 

'कावळ्याची ही कोणतीही नवीन प्रजाती नसून अनुवंशिक स्थितीमुळे झालेला हा एक बदल आहे. पक्षी, प्राणी यांचे रंग एका विशिष्ट द्रव्यामुळे ठरतात. मेलानिन, कॅरेटीनोईड आणि पॉरफिरीनस अशी ही रंग द्रव्य आहेत. या तीनही रंग द्रव्यांची कमतरता, कमी - जास्तपणा पक्षांच्या रंगात बदल करू शकतात. मेलानिनचा अभाव हा यापैकी अनुवंशिक बदल आहेत. अशाप्रकारे बदल दिसणाऱ्या पक्ष्याला ल्युसिस्टिक म्हणतात.  मेलानिनचा अभाव असल्यानं पिसे पूर्णता सफेद रंगाची दिसून येतात. तसेच डोळ्यातील रंगद्रव्ये नसल्यामुळे आतील लाल रंगाच्या केशिकांचाही रंग डोळ्यांना येऊन डोळे लालसर दिसू लागतात. पक्ष्याची चोच, पाय गुलाबी रंगाचे असतात. अशा प्रकारचे पक्ष्यांचे प्रमाण कमी असल्यानं ते दुर्मिळ ठरतात. अशाच प्रकारचा हा बदल काळबादेवीतील या कावळ्यात झाला आहे', अशी प्रतिक्रिया पक्षी अभ्यासक प्रतिक मोरे यांनी दिली.