मुंबई : कोकणाच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी काय दिलं? मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांत पॅकेज का जाहीर केलं नाही? असा सवाल करत नारायण राणे यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले. मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा म्हणजे नुसता फेरफटका आणि 'नौटंकी दौरा असल्यांच भाजप नेते नारायण राणे यांनी म्हटलंय. राज्य सरकारच्या प्रत्येक खात्यामध्ये भ्रष्टाचार सुरु असून तो पुराव्यानिशी समोर आणेन असा इशाराही त्यांनी दिला. 


मुख्यमंत्र्यांच्या कोकण दौऱ्यावर नारायण राणेंची टीका
मुख्यमंत्र्यांनी कोकणचा दौरा केला, पण त्यासाठी किती वेळ दिला असा सवाल करत नारायण राणे म्हणाले की, "केवळ तीन तासाच्या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. पण या वादळात किती लोकांचं नुकसान झालं, किती जणांचे रोजगार गेले याची माहिती लोकांकडून घेतली नाही. मुख्यमंत्र्यानी लोकांची का भेट घेतली नाही?"


मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांत पॅकेज का जाहीर केलं नाही? असा सवाल करत त्यांच्या आश्वासनामध्ये स्पष्टता नाही अशी टीका नारायण राणे यांनी केली. नारायण राणे म्हणाले की, "मुख्यमंत्र्यांनी कोकणाला काय दिलं, एक तरी प्रकल्प दिला का? पर्यटनासाठी काय दिलं, किती विकास केला हे सांगावं. भावनिक विषयावर गोड-गोड बोलून कोकणची फसवणूक केली जातेय."


राज्य सरकारचा भ्रष्टाचार उघड करणार, नारायण राणेंचा इशारा
राज्याच्या प्रत्येक खात्यात भ्रष्टाचार चालला असून तो आपण उघड करणार असल्याचं नारायण राणे म्हणाले. मंत्रालयात केवळ टक्केवारीसाठी कामं चालतात असं सांगत नारायण राणे म्हणाले की, "कोरोनाच्या औषधांच्या टेंडरमध्ये पैसे खाल्ले जात आहेत. संजय राऊतांनी हे जाहीर करावं अन्यथा मी जाहीर करेन. पोलीस वसाहतीच्या टेंडरमध्येही भ्रष्टाचार झाला असून प्रत्येक खात्यात चाललेला भ्रष्टाचार नावानिशी उघड करणार आहे."


सरकारच्या तिजोरीत लोकांना देण्यासारखं काहीच नाही असं सांगत नारायण राणे म्हणाले की, जनाची नाही आणि मनाचीही नाही असं हे सरकार आहे. 


महत्वाच्या बातम्या :