Maharashtra Budget 2023 :  विधीमंडळात काल (9 मार्च) राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. राज्याच्या अर्थसंकल्पात शिंदे-फडणवीस सरकारने अनेक गोष्टींची खैरात वाटली. महिला, ज्येष्ठ नागरिकांसोबत शेतकऱ्यांसाठीही अनेक महत्त्वाच्या घोषणा अर्थसंकल्पातून करण्यात आल्या आहेत. मात्र अर्थसंकल्पात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला विशेष काहीच मिळाले नसून लाल परीची झोळी रिकामीच राहिली असल्याची टीका महाराष्ट्र एस. टी.कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे. 


अर्थसंकल्पावर बोलताना श्रीरंग बरगे म्हणाले की, "राज्याच्या 23-24 च्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला विशेष काहीच मिळालं नसून लाल परीची झोळी रिकामीच राहिली आहे. स्थानक नूतनीकरण, इलेक्ट्रिक बस आणि जुन्या गाड्यांचे रूपांतर या जुन्याच योजना असून त्याच योजनांची पुन्हा फक्त उजळणी करण्यात आली आहे. ही निव्वळ धूळफेक असून राज्य सरकार शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रकार करत आहे."


राज्य सरकार एसटीला कायम सापत्न वागणूक देतंय : श्रीरंग बरगे 


"एसटी महामंडळाला मोठ्या भरीव निधीची गरज असताना महामंडळ उर्जित अवस्थेत आणण्यासाठी एसटीला स्वमालकीच्या नव्या गाड्या खरेदी करण्यासाठी मोठ्या भरीव निधीची गरज असताना, त्याकडे या अर्थसंकल्पात दुर्लक्ष करण्यात आलं आहे. बस स्थानक नूतनीकरण, चार्जिंग स्टेशन, 5150 इलेक्ट्रिक बस खरेदी, 5 हजार जुन्या वाहनांचे रूपांतर या जुन्याच योजना आणण्याची घोषणा पुन्हा एकदा करण्यात आली आहे. यातून महामंडळ नक्कीच सक्षम होणार नाही. राज्य सरकार एसटीला कायम सापत्न वागणूक देत आहे. राज्य सरकारला गरिबांची लालपरी टिकवायची नाही, हेच यावरुन सिद्ध होत आहे.", असंही श्रीरंग बरगे म्हणाले. 


एसटीसाठी विशेष तरतूद आवश्यक होती, पण अर्थसंकल्पात तसं काहीच नाही : श्रीरंग बरगे 


"गेल्या अर्थ संकल्पात स्थानक नूतनीकरण आणि गाड्या खरेदी करण्यासाठी 1423 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. त्यातील फक्त 298 कोटी रुपयांचा निधी आतापर्यंत एसटीला सरकारकडून देण्यात आला आहे. या शिवाय संप काळात कबूल करुन सुद्धा वेतनाला कमी निधी देण्यात आला आहे. त्यामुळे भविष्य निर्वाह निधी, उपदान, बँक कर्ज, एलआयसी आणि इतर 700 कोटी रुपयांची देणी अद्यापही प्रलंबित आहेत. त्यासाठी विशेष तरतूद करायला हवी होती. पण तसं काहीच अर्थसंकल्पात करण्यात आलेलं नाही," असं श्रीरंग बरगे म्हणाले. 


900 कोटी रुपये इतकी रक्कम सरकारकडून एसटीला येणं बाकी : श्रीरंग बरगे 


"राज्य सरकारने यापूर्वी विविध प्रकारच्या 29 सवलती प्रवाशांसाठी जाहीर केलेल्या होत्या. त्याच्या प्रतिपूर्तीची 900 कोटी रुपये इतकी रक्कम सरकारकडून एसटीला येणं बाकी असतानाच पुन्हा महिलांसाठी बस भाड्यात 50 टक्के सूट देण्याची तिसावी सवलत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेचे आम्ही स्वागत करतो. पण या सवलत मूल्याची प्रतिपूर्ती सरकारने तात्काळ केली पाहिजे. कारण ही रक्कम एसटीला वेळेवर मिळाली नाही तर दैनंदिन खर्चाला निधीची कमतरता निर्माण होत आहे. आजही काही आगारात डिझेल आणि स्पेअर पार्टसला अपेक्षित निधी नसल्याने गाड्या उभ्या राहतात. प्रवाशांची गैरसोय होत आहे. सरकार जितक्या सवलती प्रवाशांसाठी जाहीर करेल तितका एसटीचा फायदा आहे. पण सरकार सवंग लोकप्रियतेसाठी अशा घोषणा करत आहे. त्याच्या प्रतिपूर्तीची रक्कम मात्र एसटीला वेळेवर देत नाही," असा आरोपही बरगे यांनी केला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Maharashtra Budget 2023 : अर्थसंकल्प म्हणजे 'बड्या-बड्या बाता अन् शेतकऱ्यांना लाथा', सोयाबीन-कापसाच्या मुद्यावरुन तुपकर आक्रमक