सिंधुदुर्ग : आतापर्यंत तुम्ही पूर्ण गाव सुट्टीवर गेल्याचं कधी ऐकलंय का? नाही ना! मग आम्ही तुम्हाला कोकणातील एक अशा गावाची ओळख करुन देणार आहोत, जे वर्षातून एकदा सात दिवसांच्या सुट्टीवर जातं. तेही अगदी माणसांबरोबरच गुराढोरांसह.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वैभववाडी तालुक्यातील शिराळे गावातील लोक गुराढोरांसह सात दिवस वेशीबाहेर झोपड्या बांधून वास्तव्य करतात. 80 ते 90 उंबरठे असलेल्या या गावाची लोकसंख्या सुमारे 400च्या वर आहे. मात्र सध्या हे गाव या लोकांच्या गावपळण प्रथेमुळे सुट्टीवर आहे. गेली चारशे वर्षांपासून गावपळणीची परंपरा येथील लोकं पाळत आले आहेत. म्हणूनच आपले घरदार सोडून गावाच्या वेशीबाहेर आलेल्या या लोकांनी आभाळाच्या छायेखालीच सात दिवसांसाठी आपला संसार थाटला आहे.



सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या गावातील जागृत देवस्थान असलेल्या श्री. गांगेश्वर देवाच्या हुकुमाने ही गावपळण होते. गावपळण दरवर्षी पौष महिन्यात कडाक्याच्या थंडीमध्ये होते. ही गावपळण म्हणजे गांगो देवाचे वार्षिक समजतात. पौष महिन्यामध्ये होत असलेली ही गावपळण पाच, तीन किंवा सात दिवसांची असते. तीन दिवस झाल्यानंतर गांगोला कौल लावून देवाने हुकूम दिल्यानंतर शिराळेवासीय गावात परततात.



आता पूर्ण गावच वेशीबाहेर गेलंय म्हटल्यावर गावातील शाळा आणि अंगणवाडीही सहाजिकच याच ठिकाणी भरणार. विशेष म्हणजे विद्यार्थी दशेतील गावच्या पोरांना ही गावपळणीची प्रथा मजेशीर आणि त्यानिमित्ताने सहलीचा आनंद देणारी असते. महाराष्ट्राला उत्सव आणि परंपरांचा मोठा वारसा लाभलेला आहे. मात्र आजच्या आधुनिकतेच्या युगात श्रद्धेला अंधश्रद्धेचे ग्रहण लागू न देण्याची खबरदारी घेतल्यास परंपरा टिकवणं आणि त्यांचा आनंद घेणं निरंतर शक्य होईल.


गांगो देवाने हुकूम दिल्यानंतर गावपळण सुरु केली जाते. गावपळण सुरु झाल्यानंतर कुणीही गावात जात नाहीत. कारण या दिवसांच्या कालावधीत गांगेश्वर देवाबरोबर इतर देवतांची सभा भरते, असा ग्रामस्थांचा समज आहे. त्यामुळे गावात कोणाचाही आवाज होता कामा नये. तीन दिवसानंतर परत गांगेश्वराला कौल लावून हुकूम घेतला जातो. त्यानंतर गावभरणी होते. जोपर्यंत गांगोचा हुकूम होत नाही तोपर्यंत ग्रामस्थ गावाच्या बाहेर राहतात. त्यामुळे तीन, पाच, सात दिवसांची ही गावपळण असते. दरवर्षी गावपळण होणारी जिल्ह्यात एकमेव शिराळे गाव आहे. शिराळेवासियांचा आपल्या श्री.देव गांगेश्वरावर पूर्ण विश्वास आहे. देवाचा हुकूम घेऊन ग्रामस्थ गाव सोडतात. परत हुकूम घेऊन गावात परततात. शिराळे गावात 80 कुटुंब असून सुमारे 400 लोकसंख्या असणारं गाव आहे.

तळकोकणात कुठे कुठे गावपळण परंपरा?
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणात वायंगणी, आचरा आणि चिंदर, देवगड येथे मुणगे, वैभववाडीमध्‍ये शिराळे येथे आदी गावांमध्ये ‘गावपळण’ पाळली जाते. काही ठिकाणी दरवर्षी तर काही ठिकाणी तीन, पाच वर्षांनी गावपळण केली जाते.