Nitesh Rane On Maha Vikas Aghadi : महाविकास आघाडीत जागावाटपाचा (Maha Vikas Aghadi Seat Sharing) निर्णय होत नसून, काही जागांवरून तीनही पक्षात एकमत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, यावरूनच भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी महाविकास आघाडीसह (Maha Vikas Aghadi) संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर निशाणा साधला आहे. जागावाटपावरून महाविकास आघाडीत गॅंगवॉर सुरू असून, आता परिस्थिती एक दुसऱ्यांवर बंदूक काढण्यापर्यंत गेली असल्याचं नितेश राणे म्हणाले आहे. 


पुढे बोलतांना नितेश राणे म्हणाले की, “काही महिन्यांपासून जसा मी स्पष्ट बोलतोय, तेच आज सकाळी प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पत्रकार परिषदेतून सांगितले. संजय राऊत हे कॅमेऱ्यासमोर खोटं बोलतात, खोटी माहिती देतात, खोटा आव आणतात. महाविकास आघाडीची जागावाटपाबाबत जी काही आतमधील परिस्थिती आहे, मी ऐकलं आहे की मोठा गॅंगवॉर सुरू आहे. एक दुसऱ्यांवर बंदूक काढण्यापर्यंत परिस्थिती गेली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी व्हेंटिलिटरवर आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही,” असे नितेश राणे म्हणाले. 


महाविकास आघाडी नावाचा पोपट मेलेला आहे...


पुढे बोलतांना नितेश राणे म्हणाले की, "महाविकास आघाडीमधील सुरू असलेली परिस्थिती आज प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पत्रकार परिषदेतून सांगितली. बाहेर पत्रकार परिषदेत बोलत असतांना संजय राऊत हे प्रकाश आंबेडकर यांना आम्ही मोठा मान देतो असे म्हणत संविधानाची भाषा बोलतात. मात्र, भांडुकचा हा शकुनी मामा कुणाचाच नाही हे आज स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे. संजय राऊत खोटं बोलणारा आहे. त्यामुळे महाविकास आघाडी नावाचा हा जो पोपट आहे, तो पोपट मेलेला आहे, असे राणे म्हणाले. 


भारत जोडो यात्रेवर टीका...


दरम्यान याचवेळी बोलतांना नितेश राणे यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर देखील टीका केली आहे. राहुल गांधी यांचा पायगुण एवढा चांगला आहे की, ते ज्या ज्या राज्यात जातायत. तिथे एकतर त्यांचा मित्रपक्ष सोडून जात आहे, अन्यथा काँग्रेस पक्षातून कोणीतरी फुटत आहे. आता त्यांनी महाराष्ट्रात एन्ट्री केल्याचं मी ऐकलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून जात असताना एक तर महाविकास आघाडीची भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याची वेळ येणार आहे. अन्यथा दुसऱ्या बाजूला काँग्रेसमध्ये काय भूकंप होतील हे येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला कळेल. त्यामुळे महाविकास आघाडी संपलेलं दुकान असल्याचं परत एकदा सांगतो. त्यांच्या ज्या काही बैठका सुरू आहे, त्यामध्ये एकमेकांचे कपडे फाडले जात आहे. मात्र, बाहेर येऊन खोटं बोलत असल्याचे राणे म्हणाले. 


महाविकास आघाडी फोडण्यास राऊत कारणीभूत ठरणार...


प्रकाश आंबेडकर यांच्या चारित्र्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याच्या प्रयत्न संजय राऊत करत आहेत. त्यांना खोटारडा बोलण्याचं काम राऊत करत आहे. त्यामुळे संजय राऊत याचा मालक कोण, कोणाकडून त्याचा पगार येतो आणि उद्या जेव्हा महाविकास आघाडी फुटेल त्याचा एकमेव जबाबदार संजय राऊत असेल असेही नितेश राणे म्हणाले.



इतर महत्वाच्या बातम्या : 


प्रकाश आंबेडकर म्हणाले, तुम्ही खोटं बोलता, आता बॅकफूटवरील संजय राऊत फ्रंटफूटवर, आंबेडकरांच्या टीकेला उत्तर!