Sangli Crime : बिबट्याची कातडी, सांबरशिंगे आणि खवल्या मांजराची खवले यांची तस्करी करणार्‍या एका टोळीचा छडा लावत सुमारे 28 लाखांचे वन्य प्राण्यांचे अवयव मिरजेत पोलिसांनी जप्त केले. तस्करी करणारा एकजण पोलिस व वन विभागाच्या सापळ्यात अडकला असून एक जण फरार झाला. 


संरक्षित वन्य प्राण्यांचे अवयव बाळगणे, विक्री करण्याचा प्रयत्न करणे या प्रकरणी अशोक सदाशिव कदम (वय 55 रा. कदमवाडी, पोस्ट केजीवडे, ग्रामपंचायत हासणे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून पूर्ण वाढीच्या एक लाखाचे बिबट्याचे हळद, मीठ लावलेले चमडे, पन्नास हजार मुल्याची दोन सांबरशिंगे आणि अत्यंत दुर्मिळ समजल्या जात असलेल्या खवल्या मांजराची दहा लाखाचे 18 किलो खवलेजप्त करण्यात आली.


मिरज रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या पोस्ट कार्यालयाजवळ एक व्यक्ती वन्य प्राण्यांचे अवयव विक्रीसाठी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गुरूवारी रात्री साडेदहा वाजता मिरज रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या पोस्ट कार्यालयाजवळ सहायक निरीक्षक रविराज फडणीस यांनी अधिक्षक बसवराज तेली व अप्पर अधिक्षक मनिषा दुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली वन व पोलीस कर्मचारी यांचा सापळा लावला.


यावेळी संशयास्पद स्थितीमध्ये कदम थांबला होता. त्याच्याजवळ असलेल्या दोन प्लास्टिक पिशव्यांची झडती घेतली असता बिबट्याचे चमडे, सांबराची शिंगे व खवल्या मांजराची खवले मिळून आली. खवल्या मांजराची खवले किलोला एक लाख रूपये दराने विकली जात असल्याचे सांगण्यात आले.


अशोक कदमला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. ही कारवाई पोलीस अधीक्षक बसवराज तेली अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबले, उपविभागीय पोलीस अधीक्षक अशोक वीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी रविराज फडणीस, उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे, कुमार पाटील, सोमनाथ कचरे, प्रमोद खाडे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली. सपोनि रविराज यांनी यापूर्वी रक्तचंदन, बिबट्याची कातडी, 50 किलो गांजा जप्त करून वन्यप्राणी तस्करी ,आणि अंमली पदार्थ तस्करांवर मोठी कारवाई केली होती. 


इतर महत्वाच्या बातम्या