मुंबई : कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना सोडण्यात आलेल्या 72 विशेष रेल्वे गाड्या फुल झाल्या आहेत. रेल्वेने चाकरमान्यांसाठी अजून अधिकच्या गाड्या सोडाव्यात, अशी मागणी भाजपा नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. पुणे दौऱ्यावर असताना आशिष शेलार यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान शेलार यांनी ही मागणी केली आहे.
कोकणात गणेशोत्सवाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई, विरार या भागातून मोठ्या प्रमाणात चाकरमानी आपल्या कोकणातील गावी जातात. यावर्षी कोकण रेल्वेने 72 अतिरिक्त उत्सव विशेष गाड्या सोडण्याची घोषणा केली होती. या गाड्यांसाठी बुकिंग सुरु होताच, या सर्व गाड्यांचे बुकिंग पूर्ण क्षमतेनं झालं आहे. पण तरिही अद्याप बरेचजण प्रतिक्षा यादीतच आहेत. दरवर्षीच्या तुलनेत या गाड्या कमी असून 2019 ला कोकण रेल्वेवर 210 फेऱ्या आणि रेल्वे गाड्यांना 647 अतिरिक्त डबेही जोडण्यात आले होते. तर त्यावेळी तिकीटांच्या ज्यादा बुकिंगसाठी 11 टपाल खात्यात आणि 17 रेल्वे स्थानकात पीआरएस सिस्टम सुरु करण्यात आली होती. तसेच, 16 ठिकाणी टाऊन बुकिंग एजन्सी आदी सुविधा 2019 ला खास कोकणवासीयांना उपलब्ध करुन दिल्या होत्या.
त्यामुळे याही वर्षी अशा अधिकच्या बुकिंग सुविधा आणि अजूनच्या काही गाड्या कोकणातील चाकरमान्यांना उपलब्ध करुन देण्याबाबत कोकण रेल्वेला निर्देश द्यावेत, ही विनंती आमदार आशिष शेलार यांनी रेल्वे राज्य मंत्र्यांना केली आहे. यावेळी भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक आणि योगेश टिळेकर आदी उपस्थित होते.
गणेशोत्सव दरम्यान मूर्तीच्या उंचीबाबत मर्यादा नको, मूर्तिकार, गणेशोत्सव मंडळाची मागणी
यंदाच्या गणेशोत्सव दरम्यान गणेशमूर्तीच्या उंचीबाबत मर्यादा राज्य सरकारने घालून देऊ नये, अशी मागणी मूर्तीकार आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून केली जातीये. मागील वर्षी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करताना 4 फुटापर्यंत गणेशमूर्तीची उंची असावी, अशा प्रकारच्या सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या होत्या. मात्र, यावर्षी अशी मूर्तींच्या उंचीबाबत मर्यादा घालू नये, अशी विनंती केली जातीये. अवघे दोन महिने गणेशोत्सवाला उरलेले असताना मूर्तिकार मात्र चिंतेत आहेत. कारण कुठल्याही प्रकारच्या मार्गदर्शक सूचना अद्याप राज्य सरकारकडून न मिळाल्याने उंच गणेशमूर्तीची काम मूर्तिकारांनी सुरु केलेली नाही. त्यामुळे याबाबत स्पष्टता सरकारने द्यावी, जेणेकरून ज्या प्रकाराचा संभ्रम मूर्ती साकार करण्याबाबत मूर्तिकारांमध्ये आहे तो दूर होईल. मूर्तिकारांप्रमाणे हाच संभ्रम मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सवात मंडळामध्ये सुद्धा आहे.
गणेशोत्सव नियमावलीचा पुनर्विचार करा, ठाण्यातील गणेश मंडळांची राज्य सरकारकडे मागणी
राज्यात कोरोनाचे सावट आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मंगळवारी गणेशोत्सव नियमावली जाहीर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्या नियमावलीचा पुनर्विचार करावा, तसेच, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर बाळासाहेबांचा सुपुत्र या नात्याने त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार व्हावा, अशी मागणी ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय समितीने केली आहे. असं झालं नाही तर येत्या काही दिवसात ठाणे महापालिकेसमोर आंदोलन करण्यात येईल असाही इशारा समितीने दिला आहे.