जळगाव : नरेंद्र मोदींचा चेहरा वापरल्यामुळेच शिवसेनेचे 56 आमदार भाजपच्या जीवावर आल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रकांत पाटलांच्या या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. मोदींचा चेहरा होता, तसा बाळासाहेब ठाकरे यांचाही चेहरा यावेळी होता. दोन्ही पक्षांची युती असल्याने त्याचा दोन्ही पक्षांना फायदा झाला आहे. असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर दिलं आहे. राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे हे काल (शनिवारी) जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील विविध विकास कामांचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. 


पाचोऱ्याचे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी केलेल्या कामांचेही एकनाथ शिंदे यांनी तोंडभरून कौतुक केले. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी आघाडी सरकारने घेतलेले अनेक निर्णय हे सर्व सामान्य जनतेसाठी अतिशय फायदेशीर ठरले असल्याचंही शिंदे यांनी म्हटलं आहे. 


मोदींचा चेहरा वापरल्यामुळेच सेनेचे 56 आमदार हैं आमच्या जीवावर झाल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. या टीकेला एकनाथ शिंदें यांनीही चोख प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी बोलताना शिंदे यांनी म्हटल आहे की, "त्यावेळी युती असल्याने मोदींचा चेहरा होता, तसाच बाळासाहेब ठाकरे यांचा देखील चेहरा होता आणि त्याचा फायदा दोन्ही पक्षांना झाला आहे. याविषयीच्या राजकारणात आपण जाऊ इच्छित नाही, मात्र कोरोनाच्या कठीण काळातही आघाडी सरकारने कशा प्रकारे चांगले काम केले, हे जनतेला चांगले माहीत आहे. त्यामुळे आम्ही विकास कामांवर लक्ष देत आहोत.", असंही ते म्हणाले.


एकनाथ खडसे यांच्यावर आणि त्यांच्या जावयावर ईडीच्या कारवाई संदर्भात बोलताना एकनाथ शिंदे यांनी अतिशय सावधपणे प्रतिक्रिया दिले. ते म्हणाले की, "हा चौकशीचा भाग आहे. त्यामुळे यामध्ये आपण आताच बोलणं योग्य ठरणार नाही."


काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील? 


पावसाळी अधिवेशनात तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की केल्याचा ठपका ठेवत भाजपच्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आलं होतं. यावरुन आपली प्रतिक्रिया देताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली होती. "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी संपूर्ण दिवस तोंडाला पट्टी बांधून सभागृहात बसले होते. कुठल्याही विषयाबाबत चर्चेतून तोडगा काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही. त्याऐवजी केवळ घोषणा आणि निदर्शने केली म्हणून आमच्या आमदारांचे निलंबन केले. विधानसभेची समन्वयातून तोडगा काढण्याची परंपरा या सरकारने मोडीत काढली", अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. याचवेळी बोलताना, "नरेंद्र मोदी यांच्या नावावर शिवसेनेचे 56 आमदार आणि 18 खासदार निवडून आले आहेत. आज तेच आमदार सभागृहात भाजपचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. याविरुद्ध आम्ही रस्त्यावर उतरून प्रखर संघर्ष करू."