मुंबई : यंदाच्या गणेशोत्सव दरम्यान गणेशमूर्तीच्या उंचीबाबत मर्यादा राज्य सरकारने घालून देऊ नये, अशी मागणी मूर्तीकार आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून केली जातीये. मागील वर्षी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करताना 4 फुटापर्यंत गणेशमूर्तीची उंची असावी, अशा प्रकारच्या सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या होत्या. मात्र, यावर्षी अशी मूर्तींच्या उंचीबाबत मर्यादा घालू नये, अशी विनंती केली जातीये. अवघे दोन महिने गणेशोत्सवाला उरलेले असताना मूर्तिकार मात्र चिंतेत आहेत. कारण कुठल्याही प्रकारच्या मार्गदर्शक सूचना अद्याप राज्य सरकारकडून न मिळाल्याने उंच गणेशमूर्तीची काम मूर्तिकारांनी सुरू केलेली नाही. त्यामुळे याबाबत स्पष्टता सरकारने द्यावी, जेणेकरून ज्या प्रकाराचा संभ्रम मूर्ती साकार करण्याबाबत मूर्तिकारांमध्ये आहे तो दूर होईल. मूर्तिकारांप्रमाणे हाच संभ्रम मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सवात मंडळामध्ये सुद्धा आहे.


मागील वर्षी 4 फुटापर्यंत गणेशमूर्तीची उंची बाबत मर्यादा घालून दिल्याने मोठा फटका मूर्तिकारांना बसला होता. कारण मंडळाने पारंपरिक उंच मूर्तीच्या ऑर्डर दिल्या नव्हत्या. यावर्षी ऑर्डर दिल्या जातायेत. मात्र, नियमांबाबत स्पष्टता नसल्याने अजून मूर्तीचे काम सुरूच करू शकत नसल्याचं लालबाग राजाची गणेशमूर्ती साकारणारे मूर्तिकार संतोष कांबळी यांनी सांगितले. तर यावर्षी कारागीर, मूर्तिकार मूर्ती तयार करण्याच्या कामासाठी तयार असून परराज्यातून येथे कामाला आलेले आहेत. पण गणेशमूर्ती तयार करताना नियम जाहीर न केल्याने मोठ्या मूर्तीचे काम सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे अगदी कमी वेळात मूर्ती तयार करण्याचे काम यावर्षी करावे लागणार असून कारागीर, मूर्तिकारांचे रोजगार यावर अवलंबून असताना या सगळ्या गोष्टीचा विचार करू आम्हाला अत्यावश्यक सेवेत स्थान द्यावेत, अशी मागणी राज्य सरकारकडे आम्ही करत असल्याचं मूर्तिकार रेश्मा खातू यांनी सांगितलं.


शिवाय, ज्या प्रकारे गणेशमूर्तीच्या उंचीबाबत मूर्तिकार जसे आग्रही आहेत. तसे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सुद्धा याबाबतची मागणी करताना पाहायला मिळत आहेत. मागील वर्षी उंचीबाबत मर्यादा जवळपास सर्वच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पाळल्या. मात्र, यावर्षी पारंपारिक गणेशाची मूर्ती विराजमान करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने केली असल्याची, मंडळाचे प्रसिद्धीप्रमुख संदीप परब यांनी सांगितलं. शिवाय इतर मंडळी सुद्धा अशीच मागणी करत आहेत. कोरोनाची पुढील परिस्थिती पाहून जे निर्बंध राज्य सरकारकडून जारी केले जातील, त्याचं पालन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ करतील आणि ती मंडळाची जबाबदारी राहील. मात्र, यामध्ये गणेशमूर्तीच्या उंचीबाबत मर्यादा नसावी, असे परब यांनी सांगितले.