मुंबई : गणेशोत्सवाच्या निमित्ताने बेळगावातील (Belgaum) प्रसिद्ध शेफ आर. के भातकांडे यांनी कलिंगडामध्ये (Watermelon) बाप्पाची प्रतिकृती साकारली आहे. बाप्पाची (Ganeshostav) ही कलाकृती साकार करण्यासाठी त्यांना तब्बल दोन तांसाचा कालावधी लागला. मंगळवार (19 सप्टेंबर) रोजी अगदी उत्साहाने आणि जल्लोषात लाडक्या बाप्पांचे (Ganesh Chaturthi) स्वागत करण्यात आले. प्रसाद म्हणून गणपतीजवळ फळ ठेवली जातात. पण याचा फळामध्ये शेफ आर.के. भातकांडे यांनी बाप्पा साकारले आहेत.
गणपती ही कलेची देवता आहे. त्यामुळे कलेच्या माध्यमातून तिचं पूजन करण्याचा प्रयत्न या कलाकारांकडून करण्यात आला आहे. भातकांडे यांच्यासारख्या अनेक कलाकारांनी त्यांच्या कलाकृतीच्या माध्यमातून बाप्पाला वंदन केलं. कोणी सुपारीवर, तर कोणी मोदकावर बाप्पा साकारला. या अनोख्या कलाकृती अनेकांनी भरभरुन प्रतिसाद देत कौतुक केलं.
वसईच्या कलाशिक्षकांनी साकारला सुपारीवर बाप्पा
वसईचे कलाशिक्षक आणि चित्रकार कौशिक जाधव यांनी गणेश चतुर्थीचे औचित्य साधून सुपारीवर बाप्पा साकारले. त्यांनी त्यांच्या अनोख्या कलाकृतीमधून अष्टविनायक गणपतीचं चित्र रेखाटलं आहे. कौशिक जाधव यांनी आठ सुपाऱ्यांवर अष्टविनायक गणपती साकारले. सुपारीचं प्रत्येक कार्यात एक विशेष महत्त्व आहे. शिवशंकर आणि पार्वती यांची मुलगी अशोकसुंदरीच्या लग्नात कोणत्या देवाला प्रथम आराध्य देवता म्हणून पुजलं जावं यावरुन देवता आणि ऋषींमध्ये विचारविमार्श सुरु होते. त्यानंतर एकमताने गणपतीस प्रथम पूजेचा मान देण्यात आला. तेव्हा यापुढे श्रीगणेश हा सुपारीच्या रूपाने पुजला जाईल अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे. त्यामुळे सुपारीवर अष्टविनायक गणपती कौशिक जाधव यांनी साकारले आहेत.
तर परभणीतील कलाकार प्रमोद उबाळे यांनी सुपारीवर बाप्पा साकारले. उबाळे यांनी एका सुपारीवर 1×1 सेंटीमीटर आकाराची गणेशाची अतिशय सुंदर अशी कलाकृती साकारली. त्यासाठी त्यांना जवळपास दोन तास लागले. केवळ 1×1 सेंटीमीटर सुपारी वरील गणपती बाप्पाची कलाकृती मनाला भावणारी आहे.
मोदकावर बाप्पाची कलाकृती
मोदक हा बाप्पाच्या खूप आवडीचा विषय आहे. त्यामुळे नाशिकच्या मालेगावातील कलाकार संदीप आव्हाड यांनी मोदकावरच बाप्पा साकारले. त्यांच्या या कलाकृतीसाठी अनेकांनी त्यांचे कौतुक केले. तर अतिशय कमी जागेमध्ये साकारलेली बाप्पाची ही कलाकृती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
दहा दिवस पाहुणचारासाठी येणारा बाप्पा सर्वांच्या घरी, मंडळात, कार्यालयात विराजमान झाला आहे. वर्षभर ज्या सणाची सगळेजण आतुरतेने वाट पाहत असतात त्या सणाची अगदी जल्लोषात सुरुवात झाली.