Ganesh Chaturthi 2024 Muhurat Live : आजपासून देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह; घरोघरी बाप्पांचं आगमन
Ganesh Chaturthi 2024 Muhurat Live: राज्यभरात आज गणेशोत्सवाचा उत्साह दिसून आला आहे
महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने व आनंदाने दरवर्षी साजरा करण्यात येतो. राज्यातील सामान्य जनतेसोबतच राजकीय नेते तसेच अभिनेत्यांच्या घरी गणपतीबाप्पांचे आगमन झाले. हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते गोविंदा यांच्या जुहू येथील निवासस्थानी गणरायाची विधिपूर्वक स्थापना करण्यात आली. ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत गोविंदा आणि त्यांच्या कुटुंबीयांनी बाप्पा घरी आणून स्थापना केली. गोविंदा आणि त्याच्या कुटुंबीयांनी मनोभावे गणरायाची आरती करून सर्वांच्या सुखसमृद्धी व भरभराटीसाठी कामना केली. अभिनेता गोविंदा यांच्या घरी दीड दिवसांसाठी बाप्पाचे आगमन झाले आहे.
केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या निवासस्थानी आज गणेशोत्सवानिमित्त गणरायाचे आगमन झाले. सहकुटुंब विधिवत पूजन करून विघ्नहर्ताचे प्रतापराव जाधव यांच्या परिवाराने सहर्ष स्वागत केले. गणेश भक्ताच्या जीवनातील दुःख नाहीये होऊन देशातील जनता सुखी समृद्ध आणि निरोगी आयुष्य मिळू दे ....बळीराजाला चांगले दिवस येऊ दे असे साकडे केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी गणरायाच्या चरणी घातले. गणरायाची विधिवत पूजाअर्चा केली यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी राजश्री जाधव मुलगा ऋषिकेश जाधव सून मयुरी नातू रणविर आणि पुतण्या धिरज जाधव असा आप्त परिवार होता.
रायगडसह कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साही वातावरणात साजरा होतोय. शिवसेना पक्षप्रतोद भरत गोगावले यांच्या महाड तालुक्यातील मूळ जन्मगाव असलेल्या पिंपळवाडी येथील निवास स्थानी आज गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी आमदार भरत गोगावले यांनी गणरायाला साकडे घातले. बाप्पा आतापर्यंत जो कृपाशीर्वाद सर्वांवर ठेवला तोच कृपाशीर्वाद यापुढही राहूदे. राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सरकार जनतेच्या हिताचे काम करतय. जनतेच भल करणाऱ्या महायुतीला पुन्हा सत्तेत येऊ दे,मला सुध्दा पुन्हा चौथ्यांदा विजयी कर असे साकडे आमदार भरत गोगावले यांनी बाप्पा चरणी घातले.
जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात मराठी माणूस जर गेला तर तो तिथे गणेश उत्सव नक्कीच साजरा करतो. लक्षदीप बेटावर पहिल्यांदाच गणेशोत्सवची धूम पहायला मिळते. लक्षद्वीप हा 36 बेटांचा समूह. यातील दहा बेटावरच मानवी वस्ती आहे. ती फक्त 80 हजार. 32 स्क्वेअर किलोमीटरचा हा परिसर. येथील लोकसंख्येत 95 टक्के मुस्लिम समाज आहे.
आज पर्यंत इथे गणेश उत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा झालाच नाही. पहिल्यांदाच असा गणेशोत्सव साजरा होतोय तो ही लक्षद्वीपची राजधानी कावरत्ती येथे. पुढाकार घेतलाय तेथील पोलीस अधीक्षक हरेश्वर स्वामी यांनी. मूळचे ते लातूर जिल्ह्यातील . लक्षदीप बेट समूहाचे ते एसपी म्हणून काम करत आहेत. इंडिया रिझर्व बटालियनच्या प्रांगणात गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष लक्षद्वीप समूहात पहिल्यांदाच घुमलाय. मुंबई येथून खास गणपतीची मूर्ती मागवण्यात आली आहे. अकरा दिवस चालणाऱ्या या उत्सवात भारतभरातून नोकरीसाठी तिथे आलेल्या अनेकांनी सहभाग घेतला आहे. भजनसंध्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
विघ्नहर्त्या गणरायाचे बेळगाव आणि परिसरात भक्तिभावाने आणि जल्लोषात स्वागत करण्यात आले. सकाळपासूनच मुर्तिकारांच्या चित्रशाळेकडे गणपतीची मूर्ती नेण्यासाठी गणेश भक्तांनी गर्दी केली होती. पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणरायाचे स्वागत करण्यात आले. बहुतेक जणांनी बँड लावून , ढोल ताशाच्या गजरात श्री मूर्ती वाजत गाजत नेली. मूर्ती नेण्यासाठी गणेश भक्तांनी गर्दी केल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती. यावर्षी पर्यावरण पूरक मूर्तीला अधिक मागणी होती. काही जणांनी श्री मूर्ती दुचाकीवरून नेली. मराठा लाईट इन्फट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये देखील गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
Ganeshotsav 2024 : राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या मूळ गावी नाथरा येथे सपत्नीक गणेशाची स्थापना केली. राज्यावरील विघ्न दूर करण्याची मागणी त्यांनी गणपती बाप्पासमोर केली.
Ganeshotsav 2024 : राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या शासकीय निवासस्थानी आज बाप्पाचं आगमन झालं. सध्या चर्चेत असलेले भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी देखील महाजनांच्या बाप्पाचं दर्शन घेतलं.
Lalbaugcha Raja 2024 : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत. त्यांनी सहकुटुंब लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आहे.
Maharashtra Rain Alert : गणपती बाप्पाच्या आगमनापासून पुढील चार दिवस पावासाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यातील बहुतांश भागात चांगला पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. मुंबई, पुण्यासह रायगड, कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मराठवाडा, विदर्भात मुसळधार पावासाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
Pune Ganeshotsav 2024 : पुण्यात मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. ढोलताशांच्या गजरात मोठ्या थाटामाटात कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालीम गणपती, तुळशीबाग गणपती, केसरी गणपती या पाच मानाच्या गणपतीचं आगमन होत आहे. थोड्याच वेळात गणराया विराजमान होतील.
Pune : श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचं यंदाचं 133 वं वर्ष आहे. भाऊसाहेब रंगारी यांच्या मंडळाच्या मिरवणुकीला आता सुरुवात झाली आहे. या मंडळाकडून 10 दिवसांत विविध कार्यक्रम आयोजित केले गेले असल्याचं उत्सव प्रमुख पुनीत बालन यांनी सांगितलं.
CM Eknath Shinde Ganpati Bappa : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शासकीय वर्षा निवासस्थानी सुद्धा बाप्पांचं आगमन झालं आहे. राज्यातील बळीराजावरील विघ्न दूर व्हावं, अशी मागणी बाप्पा चरणी मुख्यमंत्र्यांनी केली.
Lalbaugcha Raja 2024 : राज्यभरात गणरायाच्या आगमनाचा उत्साह दिसून येत आहे. लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे.
Ganesh Chaturthi 2024 : सांगलीत मुस्लिम रिक्षाचालक युवकाने खास बाप्पांच्या आगमनासाठी रिक्षासेवा मोफत ठेवली आहे. सिकंदर सद्गद्दिन खुशाल असे या रिक्षा चालकाचे नाव आहे. सांगली शहरातील सर्वसामान्य कुटुंबातील अनेक नागरिकांनी आतापर्यंत सिकंदर यांच्या रिक्षातून आपले घरगुती गणपती घरात नेले आहेत. आपल्या उपक्रमाला सकाळपासून चांगला प्रतिसाद मिळाला असून आत्तापर्यंत 31 कुटुंबांना सांगली शहरातील वेगळ्या भागांत सोडल्याचे सिकंदर यांनी सांगितलं.
Ganeshostav 2024 : 'गोदावरीचा राजा ' अशी मनमाड-मुंबई या गोदावरी एक्स्प्रेसमध्ये प्रतिष्ठापना होणाऱ्या गणपतीची ओळख आहे. मात्र, यावर्षी प्रवाशी संघटनेने प्रयत्न करूनही धावत्या रेल्वेत गणेश स्थापना करण्यास रेल्वे प्रशासनाने विरोध केल्याने धावत्या रेल्वेतील बाप्पांचा प्रवास थांबणार आहे. गेल्या 27 वर्षांची परंपरा यंदा खंडित झाल्याने गणेशभक्त आणि चाकरमान्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मनमाड, लासलगाव आणि नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील चाकरमाने हे गेल्या 27 वर्षांपासून मनमाड - लोकमान्य टिळक टर्मिनस गोदावरी एक्स्प्रेसच्या धावत्या प्रवासी रेल्वे गाडीच्या पासबोगीत गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाची स्थापना करून दहा दिवस पूजा-आरती करण्यात येत होती. यंदा मात्र या परंपरेला रेल्वे प्रशासनाने ब्रेक लावला आहे.
Ganesh Chaturthi 2024 : कोकणातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण समजला जाणाऱ्या गणेशोत्साला आजपासून सुरुवात होत आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला घरी आणण्यासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत मंडळी अतिशय उत्साहात गणपती कारखान्याच्या ठिकाणी येऊन पारंपारिक पद्धतीने ताशांच्या गजरात डोक्यावरून बाप्पाला आपल्या घरी नेत आहेत. आजपासून पुढील पाच दिवस कोकणात आलेला चाकरमानी नेहमीच्या कामाच्या ताणातून मुक्त होत केवळ लाडक्या गणरायाची पूजाअर्चा, आरती आणि भक्तीमध्ये घालवत असतो. वर्षभर ज्या सणाची आतुरतेने वाट पाहत असतो तो उत्सव सुरू झाल्यामुळे कोकणातील घरोघरी भक्तिभावाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
Ganeshostav 2024 : चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची म्हणजेच चिंचपोकळीच्या चिंतामणीची सकाळीच प्राणप्रतिष्ठापना आणि आरती पार पडली. यंदाचा चिंचपोकळीच्या चिंतामणीचे हे 105 वं वर्ष आहे. मुंबईतील जुन्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळापैकी एक असेल हे मंडळ यंदाच्या वर्षी या मंडळांनी जगन्नाथ पुरी मंदिराचा देखावा साकार केला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा 20 फुटाची चिंचपोकळीच्या चिंतामणाची गणेश मूर्ती आहे.
Ganesh Chaturthi 2024 Live Updates : देशभर गणेश उत्सवानिमित्ताने उत्सवाचे वातावरण पाहायला मिळतेय. यामध्ये मुंबईचा राजा म्हणजेच गणेश गल्ली गणपती महामंडळाच्या उत्सवामध्ये देखील उत्साह पूर्ण वातावरण सध्या पाहायला मिळतोय. यंदा गणेशमुंबईचा राजागणेशोत्सव मंडळाने उज्जैन मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. सकाळपासूनच मोठ्या संख्येने भाविक हे बाप्पाच्या दर्शनासाठी येत आहेत.
Ganeshostav 2024 : पुण्याच्या प्रसिद्ध आणि पुणेकरांच्या लाडक्या असलेल्या दगडूशेठ गणपती मंदिरात पहाटेपासून गणेशभक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. अथर्व शीर्ष पठण झालं असून 07:46 ला आरतीला सुरुवात होईल.
Ganesh Chaturthi 2024 Live Updates : आज गणेश चतुर्थीनिमित्त देशभरात जल्लोषात बाप्पाचं स्वागत केलं जातंय. आज गणेश मंडळांसह घरोघरी बाप्पाचं आगमन झालं आहे. तसेच, आजच्या दिवशी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिरात प्रचंड गर्दी पाहायला मिळते. आज सकाळची आरती मंदिरात सुरु झाली आहे. आज सकाळपासूनच भाविकांचा ओघ मंदिरात पाहायला मिळत आहे.
Ganesh Chaturthi 2024 : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती आगमन मिरवणूक सकाळी 08.30 वाजता सुरू होणार आहे. बुधवार पेठेतील गणपती मंदिरापासून गणेश भक्तांच्या उपस्थितीत गणरायाची मिरवणूक सुरू होईल आणि कोतवाल चावडी इथल्या पारंपारिक जागेत उभारलेल्या जटोली येथील श्री शिवमंदिर प्रतिकृती विराजमान होईल. 11 वाजून अकरा मिनिटं या शुभमुहूर्तावर दत्त संप्रदायातील ज्ञानराज महाराज माणिकप्रभू यांच्या शुभहस्ते मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाईल. दुपारी बारानंत 12 नंतर भक्तांना दगडूशेठ बाप्पाच्या दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. संध्याकाळी 7 वाजता विद्युत रोषणाईचे भव्य उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा हस्ते केले जाणार आहे.
Ganesh Chaturthi 2024 Live Updates : जगभरातील गणेशभक्तांचे अराध्य दैवत बनलेल्या लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी गणेशभक्तांची मोठी गर्दी उसळली आहे. यंदा लालबागचा राजाचा दरबार हा मयूर महालात आहे. तसेच लालबागचा राजा मयुरासनावर विराजमान झाला आहे. आज गणेश चतुर्थीचा पहिला दिवस असल्यामुळे लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी गणेशभक्तांची काल रात्रीपासूनच रांगा लावल्या होत्या. आज पहाटे लालबागच्या राजाची पारंपारिक विधीवत पद्धतीने पूजा करण्यात आली. त्यानंतर लालबागच्या राजाचे दर्शन गणेशभक्तांसाठी सुरू करण्यात आलं आहे.
Ganesh Chaturthi 2024 : लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं यंदाही मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. विधीवत पूजेनंतर गणेशगल्लीतील मुंबईच्या राजाची प्राणप्रतिष्ठापना पूर्ण झाली आहे. आपल्या आकर्षक देखाव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या मंडळानं यंदा उज्जैनमधील महाकाल मंदिराचा देखावा साकारला आहे. मोठ्या दिमाखात मुंबईचा राजा उज्जैनमधील महाकाल मंदिराच्या प्रतीकृती स्वरुप गाभाऱ्यात विराजमान झाला आहे.
Ganesh Chaturthi 2024 : आज गणेश चतुर्थी. या दिवशी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिरात गर्दी पाहायला मिळते. आज सकाळची आरती मंदिरात पार पडली असून सकाळपासूनच भाविकांचा ओघ मंदिरात पाहायला मिळत आहे.
Ganesh Chaturthi 2024 : चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या प्राणप्रतिष्ठापनेला सुरुवात झाली आहे. हजारो भाविक पहिल्याच दिवशी बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचले आहेत.
Ganeshotsav 2024 : ‘गजानना श्री गणराया... आधी वंदू तुज मोरया...’ अशी विघ्नहर्ता गणराया चरणी प्रार्थना करत आजपासून, म्हणजेच 7 सप्टेंबरपासून गणेशोत्सवास प्रारंभ झाला आहे. सध्या राज्यभरातील अनेक मंडळांत, घराघरांत गणपती बाप्पाचं वाजत गाजत स्वागत होत आहे.
Mumbai Best Bus : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील गणपतींचे दर्शन गणेशभक्तांना घेता यावे यासाठी बेस्ट उपक्रमाने रात्रभर बेस्टसेवा चालविण्याचा निर्णय घेतला आहे. 27 जादा बसेस नऊ मार्गांवर चालवण्यात येणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे बेस्ट उपक्रमाने 7 ते 16 सप्टेंबर या काळात रात्रीच्या वेळेस 24 विशेष बस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाही मुंबईतील गणेशभक्तांचा उत्साह लक्षात घेऊन 7 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर या कालावधीत जादा बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाने दिली. उत्तर पश्चिम मुंबईत गिरगाव, परळ, लालबाग, चेंबूर या मार्गांवरुन बेस्टच्या विशेष फेऱ्या चालविण्यात येतील.
Mumbai Ganeshostav : गणेशोत्सवाच्या बंदोबस्तासाठी मुंबई पोलिसांना 1 हजार 128 महिला पोलीस अतिरिक्त मिळणार आहे.. महिला पोलिसांच्या विशेष तुकडीचा आज नागपुरातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात आठ महिन्यांचा खडतड प्रशिक्षण पूर्ण झालं... सकाळी पार पडलेल्या दीक्षांत समारंभ आणि पासिंग आऊट परेडच्या माध्यमातून या 1 हजार 128 महिला पोलिसांनी रीतसर पोलीस दलात प्रवेश केला असून आजच या सर्व आपल्या पोलिसी कर्तव्यासाठी मुंबईला रवाना होत आहेत.. उद्यापासून गणेशोत्सवाच्या बंदोबस्तात मुंबई वेगवेगळ्या ठिकाणी या महिला पोलीस कर्तव्य बजावणार आहेत.
Bhiwandi Ganeshostav : गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला भिवंडीत सिन्नर, नाशिक येथून काही महिला पाठ आणि चौरंग विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. गणपती उत्सव जवळ आल्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात पूजेसाठी लागणारे साहित्य उपलब्ध आहे. कच्चा माल महाग झाल्यामुळे यंदा पाठ, चौरंग, पोळपाट यांचे दरही वाढले आहेत.
Pune Dagdusheth Ganpati : राज्यभरातील गणेश भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातर्फे दरवर्षी गणेशोत्सवात देशभरातील सुप्रसिद्ध अशा मंदिराची प्रतिकृती देखावा म्हणून तयार केली जाते.. देशभरातील प्रसिद्ध आणि मोठ्या मंदिराची हुबेहूब प्रतिकृती बनवण्यासाठी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर प्रसिद्ध आहे आणि याच मंदिराच्या गाभाऱ्यात गणेशोत्सवा दरम्यान बापांची मुर्ती विराजमान होत असते.. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातर्फे १३२ व्या वर्षी गणेशोत्सवात हिमाचल प्रदेशमधील जटोली शिवमंदिराची प्रतिकृती साकारण्यात येत आहे.गणेशोत्सवात साकारण्यात आलेल्या जटोली शिवमंदिराच्या प्रतिकृतीचा आकार १२५ फूट लांब, ५० फूट रंद आणि १०० फूट उंच असणार आहे. मंदिराची प्रतिकृती फायबर मध्ये उभारण्यात येत असून या सगळ्या देखव्याचे काम आता पूर्ण झालेलं पाहायला मिळतय
Kolhapur Ganeshostav : गणेशोत्सवासाठी कोल्हापूर जिल्हा पोलीस दल सज्ज झालयं. जिल्ह्यात गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुकीसाठी वरीष्ठ अधिकाऱ्यांसह सुमारे 2 हजार पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे..त्यामुळे गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडून पोलिसांना सहकार्य करावं असं आवाहन जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडीत यांनी केलयं. दरम्यान गणेशोत्सव काळात जिल्ह्यातील 1 हजार 144 समाजकंटकांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आलीयं.. तसचं सार्वजनिक मंडळांनी गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणूका नियमानुसार काढाव्यात असं आवाहन जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आलयं
Konkan Ganeshostav: कोकणातील सर्वात मोठा सण गणेश उत्सव असून अवघं कोकण आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज झालं आहे. मोठ्या संख्येने चाकरमानी देखील कोकणात दाखल होत आहे. सिंधुदुर्गात मूर्तिकार मूर्तींवर शेवटचा हात फिरवत आहेत, तर कुठे वाहत गाजत आपल्या लाडक्या बाप्पाला घरी घेऊन जांत आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गात सध्या भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
Ganeshostav 2024 : पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या चरणी एका भाविकांनी एक कोटी रुपयांचा हिरा अर्पण केला आहे.. गणपती बाप्पांच्या आगमनाची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांची ही सुंदर मूर्ती संपूर्ण सोन्याच्या दागिन्यांनी आभूषणांनी सजून तयार आहे.
पार्श्वभूमी
Ganesh Chaturthi 2024 Muhurat Live : राज्यासह देशभरात आज गणेशोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळतोय. सार्वजनिक मंडळांपासून ते घरोघरी लाडक्या गणरायाचं आगमन झालं आहे. या निमित्ताने सगळीकडेच गणेशोत्सवाची धामधूम आणि उत्साह पाहायला मिळतोय. सकाळपासून श्री गणेशाच्या प्राणप्रतिष्ठापनेपासून गणपतीची आरती मोठमोठ्या गणेश मंडळांत पार पडली. एकंदरीतच सर्वत्र आज आनंदाचं, उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -