Ganesh Chaturthi 2022 : सध्याच्या मोबाईल, इंटरनेटच्या युगात पारंपारिक खेळांचं महत्त्व कमी होऊ लागलं आहे. त्यामुळे भातुकलीसारखे (Bhatukali) खेळ विस्मरणात जात असून खेळांना नवसंजीवनी देणारे प्रयत्न होण्याची गरज आहे. हीच गरज ओळखून बदलापुरातील नरेकर कुटुंबियांनी घरगुती गणेशोत्सवात (Ganesh Chaturthi 2022) भातुकली खेळणाऱ्या बालगणेशाचा देखावा साकारला आहे. यात भातुकलीचा खेळ खेळणारा बालगणेश आणि उंदीर आकर्षणाचा विषय ठरले आहेत. 


22 वर्ष गणेशोत्सवातून सामाजिक संदेश : 


बदलापूरच्या नरेकर कुटुंबियांनी गेली 22 वर्ष घरगुती गणेशोत्सवातून सामाजिक संदेश देण्याची परंपरा जोपासली आहे. यंदा भातुकली खेळणाऱ्या बाल गणेशाचा देखावा नरेकर कुटुंबियांनी साकारला आहे. या देखाव्यात बाल गणेश आणि त्याचं वाहन असलेला मूषक हे दोघंही भातुकलीचा खेळ खेळताना दाखवण्यात आले आहेत. या देखाव्यात भातुकलीची भांडी असलेली मांडणी असून चारही बाजूंना भातुकली पसरलेली आहे. भातुकली हा फक्त भांड्यांचा खेळ नाही. तर मोठेपणी जगण्यासाठीचा सराव या भातुकलीतून कळतो. सध्या भातुकलीतील बऱ्याचशा वस्तू, भांडी यांची जागा नव्या यंत्रांनी घेतली आहे. मात्र, जुन्या वस्तू, भांडी आणि परंपरा नव्या पिढीला कळावी, या हेतूने हा देखावा साकारल्याचं सागर नरेकर यांनी सांगितलं.


या देखाव्यासाठी पुंडलिक नरेकर यांच्यासह शारदा, सागर आणि संगिता नरेकर यांनी मेहनत घेतली असून प्रसिद्ध निवेदिका दिपाली केळकर यांच्या खेळ मांडियेला या पुस्तकातून प्रेरणा घेण्यात आली आहे. देखाव्यातील दोन्ही मूर्ती कोकोपीटपासून बनवल्या आहेत. या देखाव्यात मांडलेली तांबे, पितळ, दगड आणि मातीची भांडी ‘निरगी’च्या स्मिता हजारे यांनी उपलब्ध करून दिल्याची माहिती सागर नरेकर यांनी दिली. हा देखावा पाहण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुलांचीही गर्दी पाहायला मिळते. 


तब्बल दोन वर्षांनंतर महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा सण मोठ्या उत्साहात, जल्लोषात साजरा केला जातोय. या निमित्ताने विविध संकल्पनेच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्यावर भाविकांचा कल पाहायला मिळतोय. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव जल्लोषा बरोबरच सामाजिक भान जपणारा आहे. बदलापुरातील नरेकर कुटुंबीय देखील याला अपवाद नाहीत. 


महत्वाच्या बातम्या :