Dada Bhuse : धुळे (Dhule) जिल्ह्यातील साक्री तालुक्यात दौऱ्यावर असलेले मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. यावेळी परिसरातील शेतकऱ्यांनी मंत्री दादा भुसे यांना काळे झेंडे दाखवत रोष व्यक्त केला आहे. तसेच त्यांच्याविरोधात शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली. 


बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे आज धुळे दौऱ्यावर होते. यावेळी साक्री तालुक्यातील कासारे येथे विविध कामांच्या भूमिपूजनासाठी जात असताना उपस्थित शेतकऱ्यांनी मंत्री दादा भुसे यांचा काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी (Farmers Protest) घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. विशेष म्हणजे यावेळी मंत्री भुसे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, शेतकऱ्यांनी मंत्री भुसेंना डावलत कांदा प्रश्नांकडे (Onion Issue) गांभीर्याने बघण्याचे सुचविले. 


धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातल्या कासारे गावात विविध विकास कामांच्या उदघाटनाच्या निमित्ताने बंदरे व खणीकर्म मंत्री दादा भुसे यांना शेतकऱ्यांच्या विरोधाला सामोरे जावे लागले.  यावेळी कासारे गावात भुसे आल्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवत रोष व्यक्त केला. कांद्याला भाव मिळत नाही, साक्री तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर होत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी हे आक्रमक आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी '50 खोके, मंत्री ओके' अशा जोरदार घोषणाही दिल्या. यावेळी उपस्थित पोलिसांनी आंदोलकांना बाजूला हटवण्याचा प्रयत्न केला.मात्र शेतकऱ्यांनी आपली बाजू मांडत दादा भुसे यांना दखल घेण्यास भाग पाडले. 


दरम्यान शेतकऱ्यांचा रोषाला सामोरे गेलेले दादा भुसे यांनी गाडी थांबवत शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. यावेळी मंत्री भुसे यांनी शेतकऱ्यांची समजूत घालून त्यांचं म्हणणं ऐकण्याचा प्रयत्न केला... मात्र आक्रमक आंदोलक काही ऐकून घेण्याच्या मानसिकतेत नव्हते. शेतकरी अडचणीत सापडलेला आहे, मात्र त्यांना मदत होताना दिसत नाही असा आरोप आंदोलकानी केला. शिवाय मंत्री दादा भुसे त्यांच्यासमोरच शेतकऱ्यांनी ५० खोके मंत्री ओके अशा जोर जोरात घोषणा यावेळी शेतकर्‍यांनी देत दादा भुसे याचा निषेध केला.


50 खोके एकदम ओके 
सध्या राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेती पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अशातच नव्याने स्थापन झालेल्या शिंदे सरकारच्या मंत्री मंडळातील पूर्वीचे कृषिमंत्री सध्या बंदरे व खनिकर्म म्हणून काम पाहत असलेले दादा भुसे याना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. यावेळी शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत दादा भुसे यांना घेराव घातला. ५० खोके एकदम ओके अशा जोरदार घोषणाही यावेळी शेतकऱ्यानी दिल्या. 


कृषिमंत्री बांधावर 
एकीकडे राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे शेतकऱ्यांच्या बांधावर फिरत असून एक दिवस बळीराजासाठी अशी मोहीम राबविण्यात येत आहे. असे असताना सद्यस्थितीत नाशिकसह धुळे नंदुरबार जिल्ह्यात एकही भागात अतिवृष्टी झाल्याने शेकतकऱ्यांची पिके खराब झाली आहेत. अशावेळी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी तातडीने साक्री धुळे दौरा करावी अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी केली आहे.