याच जबाबाच्या आधारे आज एसीबीने गजानन पाटीलला सात दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती. पण न्यायालयाने एसीबीची ही मागणी फेटाळत त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
विशेष म्हणजे तीन दिवसांच्या चौकशीत गजानन पाटील हा तपासात सहकार्य करत नसल्याचं सांगितलं जातं. त्याने कोणाच्या आदेशाने हे पैसे मागितले होते, कोणाच्या सांगण्यावरुन तक्रारदार रमेश जाधव यांना फोन केला होता, याबाबत गजानन पाटील काहीच सांगत नसून,
आपण गंमत म्हणून रमेश जाधव यांना फोन केल्याचा जबाब एसीबीच्या अधिकाऱ्यांना गजानन पाटील याने दिला आहे.
गजानन पाटील याचे अनेक मंत्र्यांशी जवळचे संबंध असून, अशाप्रकारे आणखी किती लोकांकडे गजानन पाटील याने लाच मागितली आहे याचा तपास एसीबी ने सुरु केला आहे. गजानन पाटील याचे फोन डिटेल्स तपासल्यानंतर त्याने मंत्रालयातील अनेक महत्वाच्या व्यक्तींना फोन केले होते. त्याबाबत आता एसीबीने चौकशी सुरु केली असल्याची माहिती एसीबीच्या सुत्रांनी दिली आहे.
एकनाथ खडसे यांचे ओएसडी तसेच इतकं अधिकारी आणि खडसेंच्या निकटवर्तीयांशी गजानन पाटील याचे जवळचे संबंध असल्याचे तपासात समोर आले आहे. यापैकी कोण गजानन पाटील याला सहकार्य करत होते त्याचा तपास आता एसीबी करणार आहे.
गजानन पाटील लाचखोरी प्रकरणात महसूलमंत्री एकनाथ खडसेंनी आपल्यावरील सर्व आरोप पुन्हा एकदा फेटाळून लावले होते. या प्रकरणात तथ्य आढळल्यास मी स्वतः राजीनामा देईन, असं म्हणत खडसेंनी आपली बाजू स्पष्ट केली.
एक रुपयाचाही व्यवहार झालेला नसल्याचा दावा करत तक्रारदार रमेश जाधवविरोधात अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं खडसेंनी सांगितलं आहे.
काय आहे गजानन पाटील लाचखोरी प्रकरण?
राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा खासगी पीए असल्याचं सांगणाऱ्या गजमल पाटील उर्फ गजानन पाटील, याला 30 कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी शनिवारी अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंत्रालयात त्याला अटक केली.
ठाण्यातील मागासवर्गीयांच्या शिक्षण संस्थेला जमीन हस्तांतरित करण्यासठी गजानन पाटीलने संस्थेच्या विश्वस्तांकडे तब्बल 30 कोटींची लाच मागितली होती. यानंतर संस्थेचे ट्रस्टी डॉ. रमेश जाधव यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे या प्रकरणी तक्रार नोंदवली होती. त्यावर कारवाई करत एसीबीने गजानन पाटीलला मंत्रालयात अटक केली.