मुंबई: डॉक्टरांच्या काळ्या कारभाराचा फटका काही रुग्णांनाही बसला आहे. चुकीच्या उपचारामुळे रुग्णांच्या जीवावर बेतण्याची वेळ आली.

 

 

डॉक्टरांच्या अशाच गोरखधंद्याची शिक्षा भोगणारे मुलुंडचे चंद्रशेखर कुलकर्णी. वय वर्षे 63... 2012 साली पोटदुखी सुरु झाली. फॅमिली डॉक्टर म्हणाले किडनी स्टोन असेल. मुलुंडच्या सुश्रुशा हॉस्पिटलमध्ये दाखल झाले... तिथल्या डॉक्टरांनी निदान केलं हर्नियाचं... आणि त्यानंतर थेट कॅन्सरचं निदान केलं.

 

 

चुकीच्या उपचारामुळे कुलकर्णी कोमात गेले... मृत्यूशी झुंज सुरु झाली... कशी बशी मृत्यूला मात देऊन चंद्रशेखर जिंकले. पण त्यानंतर सुरु झाली... अनंत काळाची डॉक्टरांसोबत लढाई.

 

 

डॉक्टरांच्या नफेखोरीची आणखी एक पीडित श्रेया निमोणकर...

 

 

गर्भाशयाची पिशवी काढताना, दोन्ही मूत्रपिंड नलिकांना इजा झाली, त्यामुळे माझ्या दोन्ही किडन्या डॅमेज झाल्या. डॉक्टरांनी माफी मागितली, पण दुसऱ्या दिवशी काय करायचं ते करून घे, अशी भाषा केली, असा अनुभव श्रेयांनी सांगितला.

 

 

गेल्या 6 वर्षांपासून डॉक्टरांच्या निष्काळजीपणाची शिक्षा भोगणाऱ्या श्रेया निमोणकर यांची कहाणी प्रत्येकाच्या काळजात चर्रर्रर्र करणारी आहे

 

 

"मी आजारी होते, तेव्हा माझी मुलगी माझ्या बेडखाली झोपायची, माझे पती लेडीज वॉर्डाशेजारी झोपायचे", असंही श्रेयांनी सांगितलं.

 

 

पुण्यातल्या रीना यांनाही असाच अनुभव आला असता, पण सेकंड ओपिनियनने त्यांना वाचवलं.

 

 

माझं मिसकॅरेज होईल अशी मला भीती घातली... पण मी सेकंड ओपिनियन घेतलं, आणि मी बचावले, असं रीना म्हणाल्या.

 

 

पुण्यातल्या रीना सुदैवी म्हणा किंवा जागरुक म्हणा... त्या बचावल्या, पण असे अनेक रुग्ण आहेत... ज्यांना सेकंड चान्स मिळाला नाही... कारण त्यांच्या जीवापेक्षा डॉक्टरांच्या तराजूत पैसा हा वजनी ठरला.

 

 

भ्रष्टाचारावर उपाय :

 

डिसेंटिंग डायग्नोसेस या पुस्तकात मांडण्यात आलेला वैद्यकीय क्षेत्रातला भ्रष्टाचार हे वास्तव असलं, तरी ते बदलणं तितकं सोपं नाही. पण पुस्तकाच्या दुसऱ्या भागात, त्यावर उपायही सुचवण्यात आला आहे.

नगदनारायणासाठी रुग्णांच्या जीवाशी खेळ खेळणाऱ्या डॉक्टरांना आवरणं कठीण नक्की आहे, पण अशक्य नाही. डॉ. शुक्ल आणि गद्रेंच्या डिसेन्टिंग डायग्नोस या पुस्तकात त्याचंही उत्तर आहे.

 
पण खरंच हे चित्र बदलायचे असेल, तर लेखकांना कठोर कायद्याची गरज वाटते.

 

डॉ. गद्रे आणि डॉ. शुक्ल यांच्या या डोळे उघडणाऱ्या पुस्तकाची दखल आता केंद्र, राज्य आणि स्थानिक पातळीवर घेतली गेली आहे. पण खरी गरज आहे, ती संवेदनशील मनांची, निस्पृह रुग्णसेवेची आणि रुग्णांच्या जागरुकतेची. अन्यथा डिसेंटिंग डायग्नोसेसमधली पानं दिवसागणिक वाढतच राहतील