सांगली : कृष्णा नदीतून वाहून जाणारे पाणी आजपासून दुष्काळी भागात वळवले जाणार आहे. कोयना धरणातून सातत्याने सुरु असलेल्या विसर्गामुळे कृष्णा नदी काठच्या भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. कृष्णेची पातळी 31.7 फुटावर पोहोचली आहे. 40 फुटांवर कृष्णेची इशारा पातळी आहे. या पार्श्वभूमीवर कृष्णेतून वाहून जाणारे पाणी जिल्ह्यातील दुष्काळी सिंचन योजनाना देण्याचा निर्णय घेण्यात जलसंपदा खात्याकडून घेण्यात आलाय. यानुसार टेंभू आणि म्हैसाळ या उपसा सिंचन योजनांतून कृष्णा नदीतील वाहून जाणारे पाणी उचलून तलाव, बंधारे भरण्यात येणार आहेत.
म्हैसाळ योजनेतून आज सकाळपासूनच आणि टेंभू योजनेतून संध्याकाळपर्यंत पूर परिस्थिती दरम्यान वाहून जाणारे कृष्णा नदीतील अतिरीक्त वाहून जाणारे पाणी उचलून कायमस्वरुपी दुष्काळी भागात वळवले जाणार आहे. या पाण्यामुळं भागातील तलाव व बंधारे भरुन घेतल्यास पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या योजनेतून कृष्णा नदीतील वाहून जाणारे पाणी उचलल्याने नदी काठची पूरपरिस्थिती कमी होणार नसली तरी पुराच्या काळात वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागाला द्यावे अशी अनेक वर्षांपासून मागणी होती, ती मागणी आज पूर्ण होताना दिसत आहे. या पूर काळात या उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून अगदी सोलापूर जिल्ह्यापर्यंत हे पाणी पोहोचेल आणि त्या ठिकाणचेही तलाव, बंधारे भरून घेण्यात येणार आहेत.
म्हैसाळ उपसा सिंचन योजना यावर्षी मार्च ते मे अखेर तीन महिन्यांसाठी उन्हाळी आवर्तना दरम्यान सुरु होती. पावसाचे आगमन झाल्यानंतर योजना बंद करण्यात आलेली होती. गतवर्षी कृष्णा नदीला पूर आलेला होता व अतिरीक्त पाणी वाहून गेले होते. त्याअनुषंगाने पूर परिस्थिती दरम्यान वाहून जाणारे अतिरीक्त पाणी म्हैसाळ योजनेद्वारे उचलून कायमस्वरुपी दुष्काळी भाग असलेल्या तासगाव, कवठेमहांकाळ, जत, सांगोला, मंगळवेढा या तालुक्याच्या लाभक्षेत्रातील तलाव व बंधारे भरुन घेतलेस पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सूचित केले होते.
सद्यस्थितीत कृष्णा नदीला पूरसदृष्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता पाहता म्हैसाळ योजना आजपासून कार्यान्वित करुन योजनेच्या लाभक्षेत्रातील कायमस्वरुपी दुष्काळी तालुक्यातील सर्व तलाव व बंधारे भरणेबाबत सूचना जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या गेल्या आहेत. यामध्ये साधारणपणे 2.50 टीएम.सी पाणी उचलून लाभक्षेत्रातील 30 मोठे तलाव, 50 पाझर तलाव व 50 बंधारे भरण्याचे नियोजन आहे. त्यानुसार ही योजना आजपासून कार्यान्वित होत आहे. तर रात्रीपासून आशिया खंडातील सर्वात मोठी योजना म्हणून ओळख असलेल्या टेंभू योजनेतून कडेगाव, खानापूर, आटपाडी या दुष्काळी भागातील तलाव, बंधारे भरले जाणार आहेत. या दोन्ही योजनाची जलसंपदा विभागामार्फत कार्यवाही करणेसाठी आवश्यक सर्व यंत्रणा सज्ज ठेवलेली आहे.
कृष्णेचं वाहून जाणारे पाणी आजपासून दुष्काळी भागात वळवणार, सोलापूर जिल्ह्यापर्यंत पोहोचणार पाणी
कुलदीप माने, एबीपी माझा
Updated at:
17 Aug 2020 08:47 AM (IST)
कृष्णा नदीतून वाहून जाणारे पाणी आजपासून दुष्काळी भागात वळवले जाणार आहे. कोयना धरणातून सातत्याने सुरु असलेल्या विसर्गामुळे कृष्णा नदी काठच्या भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -