गडचिरोली : वाढदिवशीच तरुणाला मृत्यूने गाठल्याची घटना गडचिरोलीत घडली आहे. जन्मदिवस असलेल्या तरुणासह त्याच्या सख्ख्या भावाचाही नदीत बुडून मृत्यू झाला. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे दोघांच्या वडिलांचाही त्याच दिवशी वाढदिवस होता.


गडचिरोलीतील आल्लापल्लीचा रहिवासी असलेला 25 वर्षीय चेतन संतोष केळझरकर आणि 17 वर्षीय सुरज संतोष केळझरकर यांचा मृत्यू झाला. अहेरी तालुक्यातील टिकेपल्ली नदी घाटावर नाव उलटल्यामुळे दोघा भावंडांना प्राण गमवावे लागले.

चेतनचा वाढदिवस असल्यामुळे दोघे भाऊ सात मित्रांसोबत नदीघाटावर पार्टी करण्यासाठी गेले होते. संध्याकाळच्या सुमारास मजा मस्ती करत ते नदीतील बोटीत बसून फिरायला निघाले. बोट डळमळल्यामुळे उलटली आणि एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात दोघा सख्ख्या भावांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

दु्र्दैवाची गोष्ट म्हणजे त्यांच्या वडिलांचाही त्याच दिवशी वाढदिवस होता. त्यामुळे वाढदिवशीच त्यांच्यावर आपल्या दोन्ही मुलांच्या मृत्यूची दुःखद वार्ता ऐकण्याची वेळ आली.

घटनेची माहिती अहेरी पोलिसांना देण्यात आली, मात्र संध्याकाळ झाल्याचं सांगत पोलिसांनी घटनास्थळी येण्यास नकार दिल्याचा आरोप मित्रांनी केला. टिकेपल्ली व आलापल्ली गावातील काही रहिवाशांनी शोध मोहीम सुरु केली, मात्र अद्यापही दोघांचे मृतदेह मिळू शकले नाहीत. शोधकार्य सुरु आहे.