मुंबई : गेल्या काही दिवसांपासून व्यावसायिक गॅसच्या दरात सातत्याने वाढ होत आहे.  सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे उपहारगृहांमधील खाद्यपदार्थ महागणार आहेत. गेल्या वर्षभरात गॅसच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या वर्षात जर तुम्हाला हॉटेलमधील खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यायचा असेल तर तुमच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे.


गेल्या महिन्यात गॅसच्या दरात 266 रुपयांची वाढ झाली आहे. आता पुन्हा 100 रुपयांनी दर महागले आहे. नाताळ आणि वर्षाअखेरीस हॉटेलवाल्यांचा मोठा व्यवसाय होत असतो. त्यामुळे हॉटेल संघटनांकडून दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे.  गॅस दरवाढीमुळे हॉटेल व्यावसायिकांचं बजेट पुरतं बिघडून गेलंय. लॉकडाऊनमध्ये रेस्टॉरंट बंद होते. त्यात बसलेली झळ कमी होत नाही तो महागाईचा फटका देखील या व्यावसायिकांना बसला आहे. भाजीपाला आणि इतर गोष्टी देखील महागल्या आहेत. त्यामुळे व्यावसाय टिकवण्यासाठी खाद्यपदार्थांच्या किंमती वाढवण्याशिवाय पर्याय नाही. अशात दर वाढवले तरी व्यवसायावर नकारात्मक परिणाम होणार याची देखील चिंता व्यावसायिकांना सतावत आहे. 


वर्षाअखेरीस 20 टक्के वाढ अटळ! 



  • छोट्या हॉटेलमध्ये दिवसाला दोन व्यवसायिक सिलेंडरचा वापर होतो. तर मोठ्या रेस्टॉरंटमध्ये सरासरी पाच सिलेंडर वापरले जातात. 

  • गेल्या महिन्यात 266 रुपयांनी व्यावसायिक गॅसचे भाव वधारले आहेत. त्याची किंमत दोन हजार रुपयांच्या पार गेली आहे.  

  • अशात सरासरी एका व्यावसायिकाला दीड ते दोन हजार रुपये दिवसाला अतिरिक्त मोजावे लागत आहे. 

  • परिणामी हॉटेल व्यावसायिकांच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे आणि उत्पन्नात घट झाल्याचं चित्र आहे.


हॉटेल व्यावसायिकांकडून पेट्रोलियम मंत्रालयाला पत्र लिहित दर वाढीसंदर्भात फेरविचार व्हावा अशी मागणी करण्यात येणार आहे. मात्र, तोपर्यंत ग्राहकांच्या खिशाला कात्री बसणार हे नक्की. त्यामुळे येणाऱ्या वर्षात जर तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये जात असाल तर तुमच्या समोर असलेले मेन्यू कार्ड तेच असेल मात्र  रेट बदललेला असणार हे मात्र नक्की आहे. 


इतर बातम्या : 



Hotel Rates Hike : नाताळ आणि न्यू ईयरचं प्लॅनिंग करताय? आधी ‘हे’ जाणून घ्या!