नोटाबंदीसाठी दोन वर्षापासून तयारी : मुख्यमंत्री
एबीपी माझा वेब टीम | 07 Dec 2016 03:58 PM (IST)
नागपूर : नोटाबंदीचे निर्णय उघडपणे घ्यायचे नसतात. अर्थसंकल्पही गोपनीय ठेवला जातो. नोटाबंदीसाठी दोन वर्षापासून तयारी सुरु होती, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. नोटाबंदीबाबत मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत निवेदन सादर केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अर्थतज्ज्ञ नसले, तरी ते जमिनीवर काम करणारे नेते आहेत, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी मोदींच्या निर्णयाचं समर्थन केलं. देशातील काळा पैसा बाहेर आला पाहिजे, अशी सभागृहातील प्रत्येक व्यक्तीची अपेक्षा आहे. भ्रष्टाचार कमी झाला पाहिजे, मात्र त्याची जननी काळा पैसा आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. पहिल्यांदाच चलनबंदी नाही चलन बंदी देशात पहिल्यांदा घडलं नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दर दहा वर्षांनी चलनबदली झाली पाहिजे हे 1923 मध्येच सांगितलं होतं. ती बाबासाहेबांची दूरदृष्टी होती. तयारीनंतरच नोटाबंदी पंतप्रधानांनी नोटांबदीचा निर्णय घेतला. लोक म्हणतात आधी का तयारी केली नाही. असे निर्णय उघडपणे घाययचे नसतात, आता आम्ही नोटबंदी करणार,कामाला लागावे असं सांगून होत नाही. बजेट पण सिक्रेट ठेवलं जातं. बजेट मंडण्याआधी 5 मिनिटं आधी कॅबिनेटसमोर येतं त्यामुळे नोटबंदीसाठी जी तयारी करायची होती ती 2 वर्षापूर्वीच केली होती. 85% चलन बदलत आहोत तरीही लोकांनी निर्णय मान्य केला, मागे उभे राहिले. याचा अर्थ त्रास झाला तरी चालेल पण काळा पैसा बाहेर आला पाहिजे, ही जनतेची भूमिका आहे. मूठभर लोकांकडेच मोठ्या नोटा 500 आणि 1000 च्या नोटा अनेकांकडे नाहीत,मूठभर लोकांकडे त्या आहेत. या निर्णयाची तयारी 2 वर्षापूर्वीच झाली होती, असं मुख्यमंत्री म्हणाले. मनमोहन अर्थतज्ज्ञ, मोदी जमिनीवरचे नेते माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी प्रत्येक व्यक्तीचं बँक खातं असावं असं म्हटलं होतं. मोदी हे अर्थतज्ज्ञ नसले तरी ते जमिनीवर काम करणारे नेते आहेत. त्यांनी 23 कोटी जनधन खाती उघडली. पहिली दोन वर्षे तयारी केली. डिजिटल इंडियाची तयारी केली. पहिल्या दिवशी काळा पैसा संपवण्याचा निर्धार केला. कॅशलेस बँकिंग पण पहिल्याच दिवशी सांगितलं होतं. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.