मुंबई : नोटाबंदीनंतर भारतीय अर्थव्यवस्थेने कॅशलेस इकॉनॉमीच्या दृष्टीने वाटचाल सुरु केली आहे. त्यामुळे येत्या काळात सर्व आर्थिक व्यवहार नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, स्वाईप मशिन, चेक यांद्वारे होणार आहेत.
मात्र भारतात ग्रामीण भाग जास्त असून अनेक ठिकाणी इंटरनेटही उपलब्ध नाही किंवा सर्वांकडे स्मार्टफोन नाही. त्यामुळे नेट बँकिंगसारखे पर्याय कसे वापरायचे हा मोठा प्रश्न आहे. मात्र याला पर्याय म्हणून यूएसएसडी (USSD) म्हणजेच 'अनस्ट्रक्चर्ड सप्लीमेंटरी सर्व्हिस डेटा' ही बँकिंग सेवा उपलब्ध आहे.
ग्राहकांना ही सेवा वापरण्यासाठी स्मार्टफोन किंवा इंटरनेटची गरज नाही. ही सेवा प्रामुख्याने इंटरनेट सुविधा नसलेल्या म्हणजेच फीचर किंवा बेसिक फोनवर वापरली जाते. शिवाय इंग्रजीचा अडथळा असणाऱ्यांसाठी देखील ही सेवा सोपी आहे. कारण यामध्ये मराठीसह 11 प्रादेशिक भाषांचा पर्याय उपलब्ध आहे. प्रत्येक भाषेसाठी वेगळा क्रमांक दिलेला आहे.
यूएसएसडीमध्ये उपलब्ध भाषा
यूएसएसडीद्वारे व्यवहार करताना मराठीचा पर्याय उपलब्ध आहे. मराठीमध्ये वापर करण्यासाठी *99*28# हा कोड आहे. हिंदीमध्ये वापर करण्यासाठी *99*22#, तर इंग्रजीमध्ये वापरासाठी *99# हा कोड दिलेला आहे.
यूएसएसडी वापरासाठी नियमित मर्यादा
यूएसएसडी सेवा 24 तास उपलब्ध आहे. याचा वापर करण्यासाठी रिझर्व बँक ऑफ इंडियाने काही मर्यादा घातल्या आहेत. यामध्ये एक रुपयांपासून ते 5 हजार रुपयांपर्यंतचे व्यवहार एका वेळी करता येऊ शकतात. यासाठी प्रत्येक व्यवहाराला 50 पैसे कर लागतो. मात्र सध्या 31 डिसेंबरपर्यंत यावर कसलाही कर नाही.
यूएसएसडी सेवा अशी सुरु करा
यूएसएसडी सेवा मोबाईलवर सुरु करण्यासाठी तुमच्या संबंधित बँकेत जाणं गरजेचं आहे. तुमचा मोबाईल नंबर खात्याशी कनेक्ट केलेला असावा. बँकेकडून मोबाईल बँकिंग सुरु करण्यासाठी एक फॉर्म भरुन घेतला जातो. ही सर्व प्रोसेस झाल्यानंतर मोबाईल मनी आयडेंटीफायर म्हणजेच एमएमआयडी (MMID) हा सात अंकी क्रमांक जनरेट केला जातो. बँकेकडून हा क्रमांक मोबाईल बँकिंग सुरु केल्यानंतर मोबाईलवर मेसेजद्वारे पाठवला जातो. तर बँकेकडून एमपीन (MPIN) पुरवला जातो.
मोबाईल बँकिंग सुरु करण्यासाठी बँकेकडूनही सहकार्य केलं जातं. ज्या ग्राहकांना मोबाईल बँकिंगविषयी माहिती नाही, ते बँकेतच एखादा व्यवहार करुन पाहू शकतात. जर तुमचा फोन नंबर अगोदरच बँकेशी कनेक्टेड असेल तर तुम्हाला बँकेत जाण्याची गरज नाही.
यूएसएसडी कोड कसा वापराल?
स्मार्टफोन किंवा इतर कोणत्याही बेसिक फोनमध्ये तुमच्या भाषेचा कोड टाईप करावा लागेल. उदाहरणार्थ मराठी भाषेमध्ये बँक खात्याची माहिती घ्यायची असल्यास *99*28# असा कोड टाईप करावा लागेल. त्यानंतर स्क्रीनवर खात्यामधील रक्कम तपासणे, पैसे ट्रान्सफर करणे, एमपीन चेंज करणे किंवा एमएमआयडी पाहता येतो.
डायल पॅड उघडल्यानंतर मराठीमध्ये व्यवहार करायचा असेल तर *99*28# हा क्रमांक डायल करा. त्यानंतर तुमची बँक निवडावी लागेल. बँक निवडण्यासाठी पहिले तीन अक्षरं टाकणं गरजेचं आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया असेल तर SBI, स्टेट बँक ऑफ हैदराबादसाठी SBH, एचडीफसी बँकसाठी HDF, आयसीआयसीआय बँकसाठी ICI टाईप करावं लागेल. मराठी पर्याय निवडल्यास तीनही अक्षरं मराठीमध्येच टाईप करावी लागतील. बँक निवडल्यानंतर स्क्रीन 7 पर्याय दिसतील.
स्क्रीनवर दाखवलेल्या 7 पर्यायांपैकी उदाहरणार्थ 1 नंबरचा पर्याय निवडला तर तुमच्या खात्यातील शिल्लक रक्कम दाखवली जाते.
दोन क्रमांकाच्या पर्यायाने केलेल्या व्यवहाराची माहिती मिळते.
तीन क्रमांकाचा पर्याय वापरल्यास एमएमआयडीचा वापर करुन पैसे ट्रान्सफर करता येतात.
तर बँकेच्या आयएफएससी कोडद्वारेही पैसे पाठवण्याचा पर्याय आहे. आयएफएससी कोड हा बँकेच्या पासबुकवरही दिलेला असतो.
तुम्हाला पैसे पाठवताना एमएमआयडी दिसत नसेल तर 6 क्रमांकाच्या पर्यायाने एमएमआयडी पाहता येईल.
एमपीन बदलण्यासाठी 7 व्या पर्यायाचा वापर करावा.
पैसे कसे ट्रान्सफर कराल?
मराठीमध्ये व्यवहार करायचा असल्यास *99*28# हा क्रमांक डायल करावा.
त्यानतंर स्क्रीनवर येणाऱ्या सात पर्यायांपैकी 3 क्रमांकाचा पर्याय निवडावा.
त्यानंतर बेनिफिशियरी मोबाईल नंबर असा पर्याय येईल. त्यामध्ये ज्यांना पैसे पाठवायचे आहेत, त्यांचा मोबाईल क्रमांक टाईप करावा.
मोबाईल क्रमांक टाईफ केल्यानतंर तुम्हाला ज्यांना पैसे पाठवायचे आहेत, त्यांचा एमएमआयडी क्रमांक माहित असणं आवश्यक आहे. तो क्रमांक टाईप करावा. एमएमआयडी क्रमांक टाकण्यापूर्वी दोन ते तीन वेळा काळजीपूर्वक तपासून पहावा.
जेवढे पैसे पाठवायचे आहेत, ती रक्कम त्यानंतर टाकावी. एका वेळी 5 हजार रुपयांपर्यंत पैसे पाठवता येऊ शकतात.
त्यानंतर शेवटी तुम्हाला चार अंकी एमपीन टाकणं गरजेचं आहे. स्पेस देऊन त्यासोबत तुमच्या खाते क्रमांकाचे शेवटचे चार अंकही टाकावे लागतील. सर्व माहिती अचूक असेल तर तात्काळ पैसे ट्रान्सफर होतील.
यूएसएसडी व्यवहाराच्या मर्यादा
यूएसएसडी व्यवहार करताना क्रमांक टाईप केल्यानंतर व्यवहाराचे पर्याय येण्यासाठी कमीत कमी 10 सेकंड लागतात. किंवा अनेकदा नेटवर्क एररचा मेसेज येतो. शिवाय व्यवहार करताना मध्येच सर्व प्रोसेस बंद होते. त्यामुळे पुन्हा पहिल्यापासून सर्व प्रोसेस करावी लागते. मात्र येत्या काळात या सेवेमध्ये सुरळीतता येण्याची शक्यता आहे.
यूएसएसडीचा उपयोग
शेतीचे किंवा घरगुती रोखीचे व्यवहार टाळण्यासाठी यूएसएसडीचा वापर करता येऊ शकतो. कारण एक रुपयाची रक्कमही ट्रान्सफर करण्याची सुविधा यूएसएसडीमध्ये आहे.