हिंगोली : सरकारी काम आणि सहा महिने थांब, असा अनुभव नेहमीच येतो. याच चाकोरीत रेमडेसिविर इंजेक्शनही अडकले. त्यामुळे हिंगोलीतील कळमनुरी मतदारसंघाचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी स्वतःची मुदत ठेव मोडून 90 लाख एका खासगी वितरकाला उपलब्ध करुन दिले आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील इंजेक्शनचा स्टॉक संपला. जिल्हा रुग्णालयात इंजेक्शन्स मागवायचे तर एवढी मोठी रक्कम गुंतवल्यानंतर प्रशासनाकडून ती वेळेत न मिळाल्यास व्याजाचा भुर्दंड कोणी सोसायचा म्हणून अशातच एकही वितरक इंजेक्शन्स मागवत नव्हता. ही बाब आमदार संतोष बांगर यांच्या कानावर पडली त्यांनीही प्रशासकीय चाकोरीला मुरड घालून ऑर्डर देण्याचे प्रयत्न केले. मात्र यातून काहीच मार्ग निघत नव्हता.
यात अग्रीम देण्यास विलंब होत असल्याचे लक्षात घेता एका खासगी वितरकास स्वत:च्या फिक्स डिपॉझिटमधील 90 लाखांची रक्कम उपलब्ध करुन दिली आहे. यातून उपलब्ध होणाऱ्या इंजेक्शनच्या पुरवठ्यानंतर संबंधित वितरकास जिल्हा प्रशासन जेव्हा निधी देईल, तेव्हा तो आमदार बांगर यांनी मिळणार आहे. त्यातही ना नफा ना तोटा या तत्त्वावर त्यांनी ही तूर्त उपलब्ध करुन दिली आहे. आता दोन दिवसांत हे इंजेक्शन्स उपलब्ध होतील, अशी आशा आहे.
22 लाखांची कार विकून ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करुन देणारा सिलेंडर मॅन
नुकतंच मुंबईतील एका तरुणाने कोरोनाग्रस्तांसाठी मदतीचा हात दिला आहे. शाहनवाज शेख या तरुणाने लोकांच्या मदतीसाठी स्वत:ची 22 लाखांची कार विकली आणि त्यामधून ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करुन दिले. त्यामुळेच तो आता ऑक्सिजन मॅन म्हणून ओळखला जात आहे.
केंद्राकडून महाराष्ट्राला रेमडेसिवीरचा पुरवठा वाढला
राज्यात रेमडेसिवीरच्या तुटवड्यामुळे निर्माण झालेल्या समस्येकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधलं होतं. तसंच पंतप्रधानांनाही पत्राद्वारे हा पुरवठा वाढवण्याची विनंती केली होती. यानंतर कोरोना रुग्णांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या रेमडेसिवीरचा पुरवठा महाराष्ट्रात वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. येत्या 30 एप्रिलपर्यंत राज्याला 4 लाख 35 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन मिळणार आहेत. हा पुरवठा पूर्वी 2 लाख 69 हजार वायल्स एवढा होता. पुरवठा वाढवल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले.