नागपूर : नागपूर मेट्रोची जॉय राईड सुरु झाली, त्यामुळे आता कमर्शियल धाव सुरु होईल, असं नागपूरकरांना वाटत असेल, तर ते चुकीचं आहे. सध्या नागपूरकर हे अनेक महिने विनातिकीट मेट्रोची ही जॉय राईड एन्जॉय करू शकणार आहेत. इच्छा असेल, त्याला या जॉय राईडमध्ये समाविष्ट करुन घेण्याचा महामेट्रोचा प्रयत्न आहे.

सध्या नागपूर मेट्रो ही तीन स्टेशन्सवर धावते. ही धाव सध्यातरी जॉय राईडच्याच स्वरुपात ठेवण्याचा निर्णय महामेट्रोने घेतला आहे. मेट्रोचा सीताबर्डी इंटरचेंज स्टेशनपर्यंतचा एक संपूर्ण पट्टा तयार करण्यासाठी प्राथमिकता दिली जात आहे. यात 11 स्टेशन्स हे 14 किलोमीटरच्या अंतरादरम्यान असतील. त्यामुळे हा पूर्ण पट्टा तयार झाल्यावरच तिकीट देऊन मेट्रो वाहतूक सुरु होणार आहे.

पहिले कमर्शियल रनचे स्टेशन्स

1. खापरी, 2. न्यू एअरपोर्ट, 3. एअरपोर्ट दक्षिण, 4. एअरपोर्ट, 5. उज्ज्वल नगर, 6. जयप्रकाश नगर, 7. छत्रपती चौक, 8. अजनी चौक, 9. राहटे कॉलनी, 10. काँग्रेस नगर, 11. सीताबर्डी (इंटरचेंज)

सध्या खापरी, न्यू एअरपोर्ट आणि एअरपोर्ट दक्षिण ही तीन स्टेशन्स 5.80 किलोमीटरचं अंतर पार करतात. मात्र जी पहिली कमर्शियल रनची 11 स्टेशन्स सज्ज व्हायची आहेत, त्याला अजून 6 ते 8 महिने लागणार आहेत. तो पर्यंत केवळ जॉय राईड सुरु राहणार आहे.

सुरुवातीला काही दिव्यांग, वृद्धाश्रमात राहणारी मंडळी, तर काही अनाथाश्रमातील मुले, तसेच मीडिया अशा वेगवेगळ्या घटकांना हा जॉय राईड देण्यात आला. यापुढेही शनिवार आणि रविवार असे आठवड्यातील दोन दिवस जी संस्था, संगठन किंवा व्यक्ती जॉय राईड घेऊ इच्छितात त्या सर्वांना सहभागी करुन घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

दरम्यान, कमर्शियल रनचे तिकीट किती असावं, हे ठरवायला एक समिती गठीत करण्यात आली आहे. हे तिकीट ठरलं नसलं तरी सामान्य माणसाला झेपेल, असं तिकीट असेल, असा मेट्रो प्रशासनाचा दावा आहे.

संबंधित बातम्या :

नागपूर मेट्रोचा इंटर्नल ट्रायल रन यशस्वी


नागपूर मेट्रोचा फर्स्ट लूक!