मालेगाव : पैशाच्या हव्यासापोटी सख्या आईनेच पोटच्या मुलीचे एकदा नव्हे तर तीनदा लग्न लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार नाशिक जिल्हयातील रावळगाव येथे घडला आहे. चौथ्या लग्नाच्या तयारीत असतांनाच अल्पवयीन असलेल्या मुलीने थेट नाशिक येथे चाईल्ड हेल्पलाईनशी संपर्क केल्याने हे प्रकरण पुढे आले आणि मालेगावच्या वडनेर-खाकुर्डी पोलिसात याची तक्रार दाखल झालीय.


रावळ येथे राहणारी पीडित मुलगी ही 13 वर्षाची असताना तिच्या आईने ती अल्पवयीन असताना सुध्दा 2017 मध्ये तिचे पहिले लग्न लावून दिले. त्याबदल्यात तिच्या आईने पीडित मुलीच्या नव-याकडून एक लाख रुपये घेतले. काही दिवसातच त्यांचा घटस्फोट झाल्यानंतर मुलीच्या आईने तिचे दुसरे लग्न लावत त्याच्याकडून एक लाख वीस हजार रुपये घेतले. विशेष म्हणजे दुसऱ्या नवऱ्याशी फारकत न करताच पीडित मुलीच्या आईने तिचे तिसरे लग्न चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड येथील एका तरुणाशी 25 एप्रिल 2020 रोजी एक लाख साठ हजार रुपये घेऊन लग्न लावून दिले. लग्नानंतर दोघांचा संसार सुरु असतांना मागील महिन्यात दोघा नवरा-बायकोचे भांडण झाले आणि पीडित मुलगी रावळगाव येथे आईकडे निघून आली. त्यावेळी मुलीच्या आईने तिला नवऱ्याशी फारकत घेण्यास सांगितले. तुझ्यासाठी मारवाडी मुलगा पाहिला असल्याच सांगितले यातून आई-मुलीच भांडण झाले आणि मुलीला तिने मारहाण केली. 


चौथे लग्न लावण्यापूर्वी पीडित मुलीने नाशिक येथे चाईल्ड हेल्पलाईनशी संपर्क साधला आणि त्यांच्याकडे तक्रार केली. आपल्या आजोबांच्या मदतीने पीडित मुलीने वडनेर-खाकुर्डी येथे पोलिसांत आई, भाऊ, पती, सासू, सासरे, दीर अशा एकूण आठ लोकांविरोधात तक्रार दाखल करत पीडित मुलगी अल्पवयीन असतांना लग्न लावले म्हणून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


केवळ पैशाच्या हव्यासापोटी स्वत:च्या मुलीचे तीन घर उद्ध्वस्त करत चौथे लग्न लावून देणारी माता नव्हे तर वैरिणी म्हटले तर वावगे ठरणार नाही.