मुंबई : राज्यात दोन दिवस कडक लॉकडाऊन सर्वत्र पाळला गेला. मात्र वीकेंड लॉकडाऊन संपल्यानंतर राज्यातल्या बाजारपेठा पुन्हा गजबजल्या. राज्यातील विविध बाजरपेठांमध्ये नागरिकांनी आज पुन्हा एकदा कोरोनाचे नियम पायदळी तुडवल्याचं पाहायला मिळालं. गुढीपाडवा सणानिमित्त खरेदीसाठी बाजारात गर्दी पाहायला मिळाली. कोरोना काळात बाजारपेठांमधील गर्दी धडकी भरवणारी आहे.
गुढी पाडव्याच्या खरेदीसाठी नाशिकमध्ये बाजारपेठेत प्रचंड गर्दी झालेली पाहायला मिळाली. शनिवार रविवार वीकेंड लॉकडाऊन पाळल्यानंतर आज बाजारात ग्राहकांनी मोठी गर्दी केली. त्यामुळे 2 दिवसाच्या लॉकडाऊनचा काही उपयोग होणार का? असा प्रश्न उपस्थित होतोय. ठिक ठिकाणी वाहनांच्या गर्दीने वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे.
दोन दिवसांच्या मिनी लॉकडाऊनला डोंबिवलीकरांनी चांगला प्रतिसाद दिला. मात्र आज डोंबिवलीकर पुन्हा रस्त्यावर उरतलेले दिसले. डोंबिवलीमधील नागरिकांनी स्टेशन आणि मार्केट परिसरात पुन्हा एकदा गर्दी केली. उद्या गुडीपाडव्याचे निमित्त साधून नागरिकांनी स्टेशन परिसरात एकच गर्दी केल्याचे दिसून आले. एकीकडे कल्याण डोंबिवली शहरात कोरोना रुग्ण संख्यांदररोज नवीन उच्चांक गाठत आहे. पालिकेकडून कोरोनाला आळा घालण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आज डोंबिवली फडके रोड आणि परिसरात नागरिकांची खरेदी साठी झुंबड उडाली होती.
Maharashtra Lockdown: लॉकडाऊनची मानसिकता ठेवा! घोषणेआधी जनतेला पूर्वसूचना देणार : राजेश टोपे
सोलापुरातही दोन दिवसाच्या वीकेंड लॉकडाऊन नंतर पुन्हा नियमांचा फज्जा उडाला. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लोकांची झुंबड पाहायला मिळाली. पहाटेपासून भाजीपाला खरेदी-विक्रीसाठी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. सोशल डिस्टन्सिंगचं पालनही कुठे होत नव्हतं. हीच परस्थिती अमरावती शहराच्या बाजारपेठेत होती. तिथेही लोकांनी मोठी गर्दी केली होती.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीत आज बाजार पुन्हा एकदा भरला. उद्या गुढीपाढवा असल्याने बाजारात ग्राहकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात दिसून आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून शनिवार व रविवार पूर्णतः बाजार बंद करण्यात आला होता. त्याला नागरिकांनी पूर्णतः सहकार्य केले होते. परंतु आज पुन्हा जिल्ह्यातील बाजार गजबजून गेला. तर व्यापाऱ्यांनी आपली दुकाने रस्त्यावर थाटली. जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ, सावंतवाडी बाजारपेठेत ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केलेली पहायला मिळत आहे. त्यामुळे बाजारपेठेत सोशल डिस्टन्सिंग कुठेही पाहायला मिळालं नाही. मात्र स्थानिक प्रशासननी याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे.