Adar poonawala: पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख अदर पुनावाला यांना गंडा घालणाऱ्यांना पुणे पोलिसांनी (pune police) थेट बिहारमधून अटक केली आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांना एक कोटींचा गंडा घालण्यात आला होता. त्यानंर पुणे पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु होता. अखेर बंड गार्डन पोलिसांनी धडक करवाई करत बिहारमधून चार आरोपींना ताब्यात घेतलं आहे. राजीवकुमार शिवाजी प्रसाद, चंद्रभूषण आनंद सिंग, कन्हैया कुमार संभो महतो आणि रवींद्र कुमार हुबनाथ पटेल अशी अटक केलेल्या आरोपींचं नाव आहेत.


काय होतं प्रकरण?
कंपनीचे संचालक सतीश देशपांडे यांना व्हॉट्सअॅप मेसेज पाठवून अनेक ठिकाणी पैसे पाठवण्याची मागणी केली होती. त्यानुसार त्या संचालकांनी पैसे पाठवले होते. मात्र संपूर्ण प्रकरण पुढे आल्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केली होती. त्या मेसेजमध्ये आदर पुनावाला यांनी पैसे पाठवण्यासाठी सांगितलं आहे, असं सांगण्यात आलं होतं. त्यासाठी अनेक क्रमांक आणि अकाऊंट नंबर देण्यात आले होते. त्यानुसार त्यांनी अनेक अकाऊंटमध्ये पैसे पाठवले होते. कंपनीच्या खात्यातून त्या खात्यांमध्ये 1,01,01,554 रुपये ट्रान्सफर करण्यात आले होते. 


पुनावालांशी बोलणं झाल्यानंतर फसवणूक झाल्याचं समोर
आदर पुनावाला यांच्याशी बातचीत झाल्यानंतर हा सगळा फ्रॉड असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर लगेच त्यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात दाखल केली होती. ही घटना 7 सप्टेंबर रोजी दुपारी 1.35 ते 8 सप्टेंबर रोजी दुपारी 2.30 च्या दरम्यान घडली होती, असं पोलिसांनी सांगितलं आहे. 


भारतीय दंड संहिता (IPC कलम 419 (व्यक्तीद्वारे फसवणूक), 420 (फसवणूक आणि अप्रामाणिकपणे मालमत्तेचे वितरण) आणि 34 (सामान्य हेतू) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला होता. आरोपी, ज्यांनी व्हॉट्सअॅप मेसेज पाठवले आणि ज्या बँक खात्यांमध्ये पैसे पाठवले होते त्यांची ओळख पटवून त्यांना पकडण्याचे प्रयत्न सुरू होतं. त्यानुसार पोलिसांचे आोरपींना पकडण्याचे प्रयत्न सुरु होते. अखेर पुणे पोलिसांना गंडा घालणाऱ्या आरोपींना पकडण्यात यश आलं आहे.


सीरम इंस्टिट्यूट ही कोरोनाची लस पुरवणारी कंपनी आहे. सध्या ऑनलाईन गंडा घालण्याच्या प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अनेक मोठ्या उद्योजकांना याचा फटका बसत आहे. मोठ्या उद्योजकांची अशी फसवणूक होत असेल तर सामान्यांचं काय, असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. त्यामुळे ऑनलाईन पैशाचा व्यावहार करताना योग्य काळजी घेण्याचं आवाहन पोलिसांकडून केलं जात आहे.