अमरावती : धामणगाव रेल्वे तालुक्यातून वाहणाऱ्या चंद्रभागा नदीवर एकादशी आणि अधिकमास निमित्त पूजेसाठी गेलेल्या एका महिलेसह तीन मुलांचा बुडूनमृत्यू झाला. ही खळबळजनक घटना आज निंभोरा राज येथे घडली. या घटनेमुळे निंभोरा राज गावात शोककळा पसरली आहे.


अमरावती जिल्ह्याच्या धामणगाव तालुक्यातील निंभोरा राज येथील काही महिला आणि मुले एकादशी आणि अधिकमासच्या पूजेसाठी गावाजवळ असलेल्या चंद्रभागा नदीवर गेले होते. या नदीचे खोलीकरण झाल्याने पाण्याचा अंदाज आला नाही. दरम्यान त्यामुळे सोबत असलेली तीन मुले पाय घसरून पाण्यात बुडत असल्याने त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना घडताच इतरांनी गावाकडे ओरडत धूम ठोकली. घटनेचे वृत्त कळताच लगेच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव आणि वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. परंतु जीवन प्रदीप चवरे (वय 15), यश प्रमोद चवरे (वय 11) आणि सोहम दिनेश झेले (वय 11) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर पुष्पा दिलीप चवरे (वय 45) यांना अधिक उपचारासाठी अमरावती येथे नेत असतांना रस्त्यातच प्राण ज्योत मावळली.


अतिवृष्टीनं पिकं 'पाण्यात'! कृषीमंत्री म्हणतात, 'शेतकऱ्यांना मदतीसाठी सरकारकडे पैसे नाहीत'


जीवन चवरे हा दहाव्या वर्गात, यश चवरे हा सहाव्या तर सोहम झेले हा चौथ्या वर्गात शिकत होता. सदर घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे निंभोरा राज गावात शोककळा पसरली असून आज रविवारी 'चुलीच' पेटल्या नाही. संपूर्ण गाव शोकमग्न होते.