नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय संघ शिक्षा वर्गाचा समारोप माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीत नागपुरात झाला. यावेळी प्रणव मुखर्जींनी राष्ट्र, राष्ट्रभावना आणि देशभक्तीची संकल्पना सर्वांसमोर मांडली. संघाच्या मंचावरुन प्रणव मुखर्जींनी देशभक्तीचे धडे दिले.
वसुधैव कुटुंबकम् हीच भारताची खरी ओळख असल्यामुळे सर्वांसाठी देशाचे दरवाजे कायम खुले असल्याचं प्रणव मुखर्जींनी सांगितलं. हिसेंच्या बातम्या रोज येत असल्याचं सांगून मुखर्जींनी अप्रत्यक्षपणे भाजपला सुनावलं.
डॉ. हेडगेवार हे भारतमातेचे थोर सुपुत्र असल्याचं प्रणव मुखर्जी यांनी डॉ. हेडगेवार यांच्या स्मृतिस्थळाला भेट दिल्यानंतर नोंदवहीत लिहिलं.
प्रणव मुखर्जींसाठी पहिल्यांदाच संघाच्या परंपरेला छेद देण्यात आला. दरवर्षी तृतीय संघ शिक्षा वर्गाच्या समारोप सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आधी भाषण करतात, त्यानंतर सरसंघचालकांचं संबोधन होतं. मात्र यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी आधी भाषण केलं, तर शेवटी प्रणव मुखर्जींनी उपस्थितांना संबोधित केलं.
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना संघाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण का दिलं, ते त्यांनी का स्वीकारलं, यावरुन वाद निर्माण करणं निरर्थक असल्याचं सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितलं.
दरवर्षी देशातील सदगृहस्थांना संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाच्या कार्यक्रमाला निमंत्रण दिलं जातं. त्यामुळे संघाच्या परंपरेला अनुसरुनच प्रणव मुखर्जींसारख्या सदगृहस्थांना निमंत्रण दिल्याचं भागवतांनी स्पष्ट केलं.
संघ सर्वांना जोडणारी आणि लोकशाही विचार मानणारी संघटना असल्याचं सांगतानाच संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार काँग्रेसच्या स्वातंत्र्य चळवळीत क्रांतिकारकांसोबत सहभागी झाले होते, अशी आठवणही भागवतांनी करुन दिली.
प्रणव मुखर्जी यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
- संविधानामुळे राष्ट्रीय भावना अधिक दृढ : प्रणव मुखर्जी
- भारतातील विविध वर्ण, धर्म, भाषा हीच खरी ओळख, सात धर्म, 122 भाषा, 1600 बोली, तरीही 130 कोटी व्यक्तींची ओळख भारतीय म्हणूनच. हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन अशा सर्वांनी मिळून भारताची खरी ओळख : प्रणव मुखर्जी
- विविधता, सहिष्णुता याच्यामध्ये भारत वसलेला आहे, हेच गेल्या 50 वर्षांपासून शिकत आलो आहे : प्रणव मुखर्जी
- भारतावर अनेक हल्ले झाले, राजवटी आल्या, तरी भारतीय संस्कृती अबाधित : प्रणव मुखर्जी
- राष्ट्रवाद कोणत्याही एका जात, धर्म, भाषा यांच्या अधीन नाही : प्रणव मुखर्जी
- भारतातून जगभरात बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार : प्रणव मुखर्जी
- विविधतेत एकता हेच भारताचं सौंदर्य, भेदभाव करत राहिल्यास जगात भारताची प्रतिमा बिघडेल : प्रणव मुखर्जी
- भारताचा राष्ट्रवाद हा 'वसुधैव कुटुंबकम्' या तत्त्वावर आधारित, त्यामुळे भारताचे दरवाजे सर्वांसाठी खुले : प्रणव मुखर्जी
- इसवी सन पूर्व 600 पासून 1800 वर्षांपर्यंत भारत जगासाठी शैक्षणिक केंद्र, याच काळात चाणक्यने अर्थशास्त्र लिहिलं : प्रणव मुखर्जी
- भारत स्वतंत्र विचारांचा देश, देशासाठी समर्पण हीच खरी देशभक्ती : प्रणव मुखर्जी
- राष्ट्र, राष्ट्रभावना आणि देशभक्तीची संकल्पना सर्वांसमोर मांडणार आहे : प्रणव मुखर्जी
प्रणव मुखर्जींसाठी संघाच्या परंपरेला छेद, पहिल्यांदाच पाहुण्यांपूर्वी सरसंघचालकांचं संबोधन
सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
-संघ सर्वांना जोडणारी आणि लोकशाही विचार मानणारी संघटना : मोहन भागवत
-डॉ. हेडगेवार काँग्रेसच्या स्वातंत्र्य चळवळीत क्रांतिकारकांसोबत सहभागी झाले होते : मोहन भागवत
-संघासाठी कोणीही परकं नाही, संघ स्वतःची ओळख जपत सर्वांचा सन्मान करतो : मोहन भागवत
-सरकार बरंच काही करु शकतं, मात्र सरकार सर्व काही करु शकत नाही : मोहन भागवत
-केवळ हिंदूच नाही, सर्व समाजाला संघटित करण्याचं संघाचं काम, भारतात जन्मलेला प्रत्येक जण भारताचा सुपुत्र : मोहन भागवत
-प्रणव मुखर्जी यांना निमंत्रण का दिलं, त्यांनी का स्वीकारलं, याबाबत चर्चा अयोग्य : मोहन भागवत
-संघाच्या परंपरेला अनुसरुनच प्रणव मुखर्जींसारख्या सदगृहस्थांना निमंत्रण, देशभरातील चर्चा निरर्थक : मोहन भागवत
- प्रणव मुखर्जी अनुभवसंपन्न, ज्ञानसमृद्ध; संघ संघ आहे, तसं ते प्रणव मुखर्जी आहेत, आणि प्रणव मुखर्जीच राहतील : मोहन भागवत
-दरवर्षी देशातील सदगृहस्थांना संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाच्या कार्यक्रमाला निमंत्रण : मोहन भागवत
-काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन रा. स्व. संघाविरोधात टिपणी, संघाने इंग्रजांना मदत केल्याचा आरोप
-"नमस्ते सदा वत्सले" ही संघाची प्रार्थना पार पडताना सरसंघचालक मोहन भागवतांसह सर्व स्वयंसेवक संघ दक्ष अवस्थेत, प्रणव मुखर्जी मात्र सावधान अवस्थेत
-प्रणव मुखर्जी रेशीमबागेतील कार्यक्रमस्थळी दाखल
-भारतमातेच्या थोर सुपुत्राला अभिवादन करण्यासाठी आणि आदर व्यक्त करण्यासाठी इथे उपस्थित, नागपुरात डॉ. हेडगेवार यांच्या स्मृतिस्थळाला भेट दिल्यानंतर प्रणव मुखर्जी यांच्याकडून नोंदवहीत प्रशंसोद्गार
-माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी संघ मुख्यालयात दाखल
-------------
प्रणव मुखर्जींनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या परिवाराला जोरदार झटका दिला. सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांना अभिवादन केलं.
प्रणव मुखर्जी स्वतःच्याच मुलीच्या निशाण्यावर
नागपुरातील डॉ. हेडगेवारांच्या याच निवासस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली होती. त्यामुळे काँग्रेस नेत्यांच्या नाराजीमध्ये अधिकच भर पडण्याची शक्यता आहे.
तृतीय वर्ष प्रशिक्षण वर्गाचं महत्त्व काय?
तृतीय वर्षाच्या प्रशिक्षण वर्गाला संघात अतिशय महत्त्व असतं. नागपुरात 14 मे पासून वर्गाला सुरुवात झाली. या वर्गात देशभरातून 800 तरुण स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. या प्रशिक्षण वर्गाचा समारोप रेशीमबाग मैदानावर होत आहे.
25 दिवसांच्या कठोर प्रशिक्षणानंतर देशभरातून स्वयंसेवकांची निवड केली जाते. सर्व सहभागींना स्वतःचा खर्च स्वतः करावा लागतो.
तृतीय वर्षाच्या प्रशिक्षणाला आलेले 191 पदव्युत्तर, 375 पदवीधर दर्जाचे स्वयंसेवक आहेत.
मुखर्जींच्या कन्येचे खडे बोल
संघाचं निमंत्रण स्वीकारल्यानंतर काँग्रेसमधून प्रणव मुखर्जींवर टीका झाली. या टीकेला आपण नागपुरात उत्तर देऊ, असं त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे मुखर्जी टीकाकारांना काय उत्तर देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
प्रणव मुखर्जींची कन्या शर्मिष्ठा मुखर्जी भाजपमध्ये प्रवेश करत असल्याच्या चर्चा रंगल्यामुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली होती. मात्र शर्मिष्ठा यांनी या बातम्यांचं खंडन करतानाच भाजप आणि संघावर तिखट शब्दात निशाणा साधला होता.
प्रणव मुखर्जी नागपुरात दाखल, वादावर काय बोलणार?
संघाच्या कार्यक्रमासाठी मुखर्जी कालच नागपुरात दाखल झाले. विशेष म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेल्या प्रणव मुखर्जींच्या स्वागतासाठी काँग्रेसकडून कुणीही उपस्थित नव्हतं. आरएसएसने आपल्या पारंपरिक पद्धतीने त्यांचं स्वागत केलं.
संघाचं शिष्टमंडळ नागपूर विमानतळावर प्रणव मुखर्जींच्या स्वागतासाठी दाखल झालं होतं. संघाच्या शैलीत कोणतीही फलकबाजी किंवा घोषणाबाजी न करता प्रणव मुखर्जींचं स्वागत करण्यात आलं. माध्यमांना दूर ठेवत शिष्टमंडळाने राजभवन गाठलं.