अहमदनगर : अहमदनगरला श्रीगोंद्यात वाळू तस्करांचा मुजोरपणा वाढला आहे. वाळू तस्करांनी बुधवारी रात्री तहसीलदारांच्या वाहनचालकाला मारहाण केली. त्याचबरोबर वाळू पथकात पुन्हा दिसल्यावर जीवे मारण्याची धमकी दिली.

चालक बाळासाहेब डोईफोडे यांना शिवीगाळ आणि मारहाण केली. दुचाकीवरुन घरी जाताना अज्ञात तिघा तस्करांनी तोंडाला मास्क बांधून मारहाण करुन धमकावलं. आमची वाळूची गाडी पकडून दिल्यानं आम्हाला दोन ते तीन लाखाचा दंड झाल्याचं म्हणत मारहाण केली. परत वाळू पथकात दिसल्यावर जीवे मारण्याची धमकी दिली. या हल्ल्याने तालुक्यात खळबळ उडाली असून कर्मचाऱ्यांवर भीतीचं सावट आहे.

या प्रकरणी तहसील कार्यालयात काळ्या फिती लावून कर्मचाऱ्यांनी  निदर्शनं केली. तहसील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन छेडलं आहे. तहसीलदार आणि प्रांतांना निवेदन देऊन  वाळू तस्करांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

तालुक्यातील अवैध वाळू तस्करी रोखण्यासाठी गौण खनिज पथकाची स्थापना केली. या पथकात चालक डोईफोडे यांचा समावेश आहे. या पथकानं दाणेवाडी, पेडगाव, निमगाव खलूत कारवाई करुन वाहनं जप्त केली. या कारवाईचा राग धरुन डोईफोडेवर हल्ला करण्यात आला आहे.