मुंबई : भारताचे माजी पंतप्रधान आणि थोर कवी, उत्तम पत्रकार असं बहुआयामी व्यक्तीमत्व, कठोर, कणखर, प्रखर राष्ट्रवादी आणि हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा नेता भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आज आपल्याला कायमचे सोडून गेले.. दिल्लीतील स्मृतीस्थळावर वाजपेयींच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अटल बिहारी वाजपेयींची मानसकन्या नमिता भट्टाचार्य यांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.
देशातील असा एखादा जिल्हा नाही, जो तब्बल 13 वेळा खासदार राहिलेल्या अटल बिहारी वाजपेयींना माहित नसेल. महाराष्ट्राशी त्यांचं खास नातं होतं. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, दिवंगत नेते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासोबत, जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसोबत अटलजींचं विशेष नातं आहे.
परळीत अटलजी जेव्हा व्यासपीठावरुन खाली आले होते...
1980 साली अटलजींची बीड येथे सभा झाली होती. यावेळी त्यांची सभा ऐकण्यासाठी बीड आणि परिसरातील खेड्या-पाड्यातील तरुणांनी बैलगाड्या आणि सायकलवर उपस्थिती लावली होती.
1995 मध्ये भाजप सरकार सत्तेत आल्यावर दिवंगत नेते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्या आग्रहामुळे परळीमधून बीएसएनएल मोबाईल सेवेची सुरुवात केली. या सेवेच्या उद्घाटनानंतर व्यासपीठावरील नेत्यांनी एकमेकांना फोन केले.
अटलजींनी सन 1998 मध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान जयसिंगराव गायकवाड यांच्यासाठी प्रचार सभा घेतली. ही सभा भाजपसाठी विजयाची नांदी ठरली. यानंतर 2004 साली बीडच्या लोकसभेच्या निवडणूक प्रचारासाठी अटलजींची सभा झाली. यासभेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात लिहिलेल्या ‘जेम्स लेन’च्या वादग्रस्त पुस्तकाचा मुद्दा घेऊन काही संघटनांनी गोंधळ घातला. यानंतर अटलजींनी बीडमधून जेम्स लेनच्या पुस्तकावर बंदी करण्याच्या आश्वासन दिल होतं.
परळीत जाहीर सभेसाठी हेलीकॉप्टरने पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आले होते. वैद्यनाथ कॉलेज समोरील मैदानावर त्यांची सभा होती. तेव्हा सभेत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या आई लिंबाबाई मुंडे या सुध्दा अटलजींचं भाषण ऐकण्यासाठी आल्या होत्या. तेव्हा मुंडे साहेबांनी अटलजींची त्यांच्या आईशी ओळख करून दिली. तेव्हा स्टेजवरून खाली उतरत अटलजींनी जनतेत येऊन लिंबाबाई यांचे दर्शन घेतले होते.
गोपीनाथ मुंडे यांनी परळीत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची सभा आयोजित केली होती. एक महिन्यापासून कार्यकर्ते या सभेची तयारी करत होते. तेव्हा मुंडे हे रेणापूर मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवत असत. या सभेच्या सूत्रसंचलन दत्तापा इटके यांनी केले. 32 एकरचे मैदान तर भरलेच होते, शिवाय चारही बाजूचे रस्ते लोकांच्या गर्दीने फुलून गेले होते.
“अब हिंदू मार नही खायेगा”
भिवंडीत 7 मे 1970 रोजी शिवजयंती निमित्ताने शहरात प्रचंड मोठी रॅली काढण्यात आली होती. मात्र ही रॅली भिवंडीतील सौदागर मोहल्ला या ठिकाणी पोहोचली असता या रॅलीवर दगडफेक आणि पेट्रोल बॉम्बचा मारा सुरू झाला. त्यामुळे भिवंडीत दंगलीचे वातावरण निर्माण झाले आणि अनेक ठिकाणी जाळपोळ देखील झाली.
यामध्ये मोठी वित्तहानी आणि जीवितहानी झाली. या दंगलीमध्ये बाधित नागरिक आश्रयासाठी भिवंडी शहरातील दांडेकर हॉल याठिकाणी जमा झाले. मात्र त्यांची विचारपूस आणि चौकशी करण्यासाठी भिवंडी शहरात अटल बिहारी वाजपेयी 1970 मध्ये भिवंडीत आले होते. त्यावेळी ते खासदार होते. त्यांनी पीडित नागरिकांची अतिशय आपुलकीच्या भावनेने विचारपूस केली आणि भिवंडी शहरातील काही प्रतिष्ठित नागरिकांना जोडीला घेऊन त्यांच्याकडून देखील या दंगलीचे प्रकार विचारून घेतले.
या दौऱ्यानंतर लोकसभेत अटलबिहारी वाजपेयींनी भिवंडीचा प्रश्न उपस्थित करत "अब हिंदू मार नही खायेगा" असे ठणकावून सांगितलं. त्यानंतर त्यांचा भिवंडीचा असलेला दौरा तसेच त्यांनी केलेल्या भाषणाच्या आधारे "अब हिंदू मार नही खायेगा" असं पुस्तकही प्रकाशित झालं. 1970 सालचे जनसंघाचे उपाध्यक्ष हसमुख ठक्कर यांनी वाजपेयींसोबतच्या आठवणींना उजाळा दिला.
बाळासाहेब-वाजपेयींचे संबंध कसे होते?
"बाळासाहेब ठाकरे आणि अटल बिहारी वाजपेयी या दोघांचे संबंध चांगले होते. हास्यविनोद ऐकण्यासाठी बसावं तर या दोघांसोबतच बसावं. त्याचबरोबर कारभार करताना कठोर व्हावं लागतं. ते कठोर होणं हे ही दोघांमध्ये होते. पण अतिशय रागाने, भांडणाने कठोर व्हायचं असं नव्हतं.
या दोघांनी परस्परांना समजावून घेतलं होतं. त्यामुळे दोन्ही पक्षांनी पटवून घेतलं. विशेष आठवण म्हणजे हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर बाळासाहेबांची भूमिका एक घाव दोन तुकडे अशी होती. पण सरकारमध्ये असताना, पंतप्रधान असल्याने वाजपेयींनी हा विषय हाताळला नाही. मुद्दाम महत्त्व दिलं नाही", असं मनोहर जोशी यांनी सांगितलं.
इस्लामपुरात भर पावसात सभा
अटल बिहारी वाजपेयी यांचे सांगलीशी जिव्हाळ्याचे नाते राहिलेलं आहे. निवडणुकीच्या जाहीर सभांबरोबरच अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी अटलजींनी शहरात अनेक वेळा उपस्थिती लावली. जनसंघाच्या स्थापनेपासून ते भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेनंतर प्रचारसभांसाठी ते सुमारे 10 ते 15 वेळा सांगलीमध्ये आले. 1950 मध्ये पहिल्यांदा अटल बिहारी वाजपेयी यांनी जनसंघाच्या प्रचारानिमित्त सांगलीत उपस्थिती लावली होती. यावेळी शहरातील काही निवडक तरुणांसोबत बापट बाल विद्या मंदिर येथे बैठक पार पडली होती.
यानंतर अटलजी यांचे शहरातील जनसंघाच्या प्रचारसभेसाठी वारंवार येणे-जाणे राहिले. आणीबाणीनंतरही अटलजी यांनी सांगलीमध्ये सभेसाठी उपस्थिती लावली. कधी पंडित दिनदयाळ उपाध्याय, तर कधी लालकृष्ण अडवाणी यांच्यासोबत अटलजी यांनी सांगलीला भेट दिली.
अटल बिहारी वाजपेयी यांनी सांगलीत 'भूमिपुत्राचा सांगाती' या पुस्तक प्रकाशन समारंभासाठी हजेरी लावली होती. ग्वाल्हेरमध्ये वास्तव्यास असताना प्र. शं. ठाकूर यांच्यासोबत अटलींजी चांगली मैत्री होती. पुढे ठाकूर हे सांगलीमध्ये कृषी अधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांनी 'भूमीपुत्राचा सांगाती' हे पुस्तक लिहिले होते. या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी अटलजी यांनी आवर्जून हजेरी लावली होती.
14 नोव्हेंबर 1995 मध्ये सांगलीतील तरुण भारत स्टेडियमवर हा कार्यक्रम पार पडला होता. 1995 साली अटलबिहारी वाजपेयी शांतिनिकेतनला भेट द्यायला आवर्जून आले होते. तेव्हा ते विरोधी पक्ष नेते होते. सांगलीत काही कार्यक्रमानिमित्त आले असताना त्यांनी गुरु-शिष्य परंपरा जागवणाऱ्या शांतिनिकेतन लोकविद्यापीठाला भेट दिली. शांतिनिकेतनच्या परिसरामध्ये हुतात्म्यांच्या स्मृती तेवत ठेवणाऱ्या स्मृती स्तंभाला त्यांनी अभिवादन केले.
अटलजी 1982 आणि 1987 मध्ये दोन वेळा इस्लामपुरात येऊन गेले. इस्लामपूर तालुक्यात काँग्रेसचे प्राबल्य असताना भाजप निष्ठेने पक्ष वाढवू पाहात होती. अण्णासाहेब डांगे त्याकाळी भाजपचे राज्याचे उपाध्यक्ष होते. राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांनी इस्लामपुरात येऊन कार्यकर्त्यांना संबोधित करावे म्हणजे पक्ष वाढीला बळ मिळेल, असा डांगे यांचा आग्रह होता.
त्यानंतर वाजपेयी 1982 साली इस्लामपुरात आले. प्रचंड पाऊस असतानाही सभा झाली आणि वाजपेयी यांनी जनसमुदायासमोर भिजत भाषण केल्याची आठवण माजी मंत्री अण्णासाहेब डांगे सांगतात. अटलबिहारी वाजपेयी दुसऱ्यांदा 1987 साली इस्लामपुरात आले होते. तेव्हा ते जिल्हा दौऱ्यावर होते. पंढरपूर येथील एक सभा आटोपून वाजपेयी रात्री इस्लामपूरच्या सभेला आले होते. या सभेत कार्यकर्त्यांनी जमवलेला निधी पक्षासाठी वाजपेयींच्याकडे सुपूर्द करण्यात आला होता. महिलांनी त्यांचे औक्षण केले. भाजपच्या काही निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या घरीही त्यांनी भेट दिली होती.
50 वर्षे पंढरपूरशी ऋणानुबंध
अटलजी यांनी 50 वर्षे पंढरपूरशी ऋणानुबंध जपले. त्यांनी चार वेळा विठुरायाचं दर्शन घेतलं. जनसंघ ते देशाचे पंतप्रधान अशा प्रवासात 1954 पासून 2004 पर्यंत अटलजींनी चार वेळा पंढरपूरचा दौरा केला. 1954 पासून त्यांच्या सहवासात असलेले वि मा मिरासदार आणि 1974 पासून अटलजींच्या सोबत राहिलेले सहकारी सुरेश खिस्ते यांनी अटलजींसोबतच्या आठवणी जागवल्या.
अटलजी नेहमीच हाडाचे कार्यकर्ते हेरायचे आणि त्याला घडवायचे .. असाच एक त्यानी हेरलेला कार्यकर्ता काशिनाथ थिटे .. आज अटलजींच्या आठवणी जागवताना हजारो आठवणी सांगताना आपले वडिलांचे निधन झाल्याची भावना आज त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होते..
अटलजींनी पहिल्यांदा वारकरी संप्रदायासाठी विकासकामांची सुरुवात केली. वारी, वारकरी आणि विठुराया याबाबत अखेरपर्यंत अटलजींना कमालीची आस्था होती. पंढरपुरात भट्टीवर भाजलेले शेंगदाणे अटलजींचा वीक पॉईंट होता, तर जेवताना कितीही गोड असले तरी हिरव्या मिरच्यांचा ठेचा त्यांना खूप आवडायचा. अटलजी कधीच शासकीय विश्रामगृहावर राहिले नाहीत, मात्र 2004 साली पंतप्रधान असताना त्यांना पंढरपुरात पहिल्यांदाच विश्रामगृहावर उतरावे लागले होते. 1954 पासून अटलजी पंढरपुरात आले, की त्यांचे सहकारी कै. नाडगौडा यांच्या निवासस्थानी मुक्काम करत असत.
यवतमाळ
यवतमाळ जिल्ह्यात अटल बिहारी वाजपेयी हे तीन वेळा आले होते. यवतमाळमध्ये पाहिल्यांदा 1964 ला जनसंघाचे अधिवेशनात ते आले, तर 1983 साली भाजप पक्षाच्या वाढीसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी अटलजी आले होते. शिवाय 1996 साली सुद्धा अटलजी यवतमाळला आले होते. येथे आझाद मैदानात एक कार्यक्रम झाला, त्यावेळी त्यांनी प्रत्येकाला आपलंसं केलें आणि कायम ते स्मरण राहील अशी त्यांची वाणी होती. अटलजींना मराठी भाषा चांगल्या प्रकारे येत होती, त्यामुळे ते मराठीतूनच बोलायचे.
1996 साली त्यांना जेवणासाठी आमंत्रित केले त्यावेळी त्यानी पुरणपोळी खाणार असं सांगितलं. त्यावेळी दिल्लीत सहा खासदारांची धावपळ झाली होती, अशी आठवण माजी खासदार राजाभाऊ ठाकरे सांगतात. तर 1983 साठी भाजप पक्ष वाढीच्या अनुषंगाने अटलजी यवतमाळ मध्ये आले होते. त्यांचे छोट्या कार्यकर्त्यांकडेही लक्ष असायचं, असं डॉ. अशोक गिरी सांगतात.
पालघर
पालघर जिल्ह्यातील जव्हारमध्ये 2004 साली अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान असताना सभा झाली होती. त्यावेळी सोबत दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, चिंतामण वनगाही होते. त्यावेळी दहीसरच्या विद्यमान आमदार मनीषा चौधरी यांनी ठाणे, पालघरची ओळख म्हणून अटलजींना तारपा भेट दिला. त्यांना तो इतका आवडला, की त्यांनी तो वाजवून पाहिला. त्यानंतर त्यांनी तो त्यांच्या पंतप्रधान निवासस्थानामध्येही ठेवला होता.
अकोला
अकोल्याचे विद्यमान आमदार गोवर्धन शर्मा यांचे वडील मांगीलाल शर्मा जनसंघाचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. अनेकदा शर्मा यांच्याकडे अटलजींचा मुक्काम झाला. त्याबद्दलच्या आठवणी गोवर्धन शर्मा यांनी जागवल्या. याचबरोबर अकोल्यातील भाजप कार्यकर्ते गिरीश जोशी यांनीही अटलजींच्या काही आठवणी शेअर केल्या.
नागपूर
संघ प्रचारक राहिलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांचे नागपूरसोबत विशेष संबंध होते. मात्र, नागपुरतील संघ कार्यालयाशिवाय त्यांचे नागपूरच्या दीक्षाभूमी सोबतही वेगळे ऋणानुबंध होते. 2000 साली पंतप्रधान असताना वाजपेयी तत्कालीन उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्यासोबत दीक्षाभूमीवर आले होते. त्यावेळी संपूर्ण दीक्षाभूमी फिरून अटलजी यांनी सर्व इतिहास जाणून घेतला.
दीक्षाभूमीच्या निर्माणाचे बारकावे समजून घेत इथल्या विकास कामांसाठी लगेच एक कोटी रुपये जाहीर केले होते. एवढेच नाही, तर दिल्लीला गेल्यानंतर लगेच जाहीर केलेला निधी दीक्षाभूमी स्मारक समितीला पाठवला होता. त्यानंतर निधी प्रत्यक्ष मिळाला की नाही याची स्वतः फोन करून चौकशी केली होती.
मनमाड
“अरे हॉटेलवाले शिंदे कहा है, शिंदे को बुलाव”, हे वाक्य आहे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे.. वाजपेयी मनमाड शहरात दोन वेळा प्रचार सभेच्या निमित्ताने येऊन गेले. मनमाड शहरातील तत्कालीन जनसंघाच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. शहरातील हॉटेल विसावाचे मालक आणि जनसंघाचे तत्कालीन जिल्हापदाधिकारी लक्ष्मणराव शिंदे यांच्याशी त्यांचे स्नेह जुळले होते. त्यांची ओळख हॉटेलवाले शिंदे या नावाने झाल्याने वाजपेयी जेव्हा पण नाशिकला येत, तेव्हा ते “हॉटेलवाले शिंदे कहा है, बुलाव उनको” असं म्हणत.
अहमदाबाद येथील अधिवेशनात संतती नियमनाचा ठराव आल्यानंतर कोणीही त्याबद्दल बोलले नाही. मात्र मी उठून त्याला अनुमोदन दिले तेव्हा अटलजी म्हणाले “कोई एक तो है जो इसके बाजूसे बोले”...
बेलापूर आणि अटलजी
अटलजींच्या आठवणी अहमदनगर जिल्ह्यातील बेलापूरसारख्या छोट्या गावाशीही जोडल्या गेलेल्या आहेत. सात किलोमीटरचा सायकल प्रवास, कार्यकर्त्यांसोबत फुटाणे - मुरमुऱ्यावर भूक भागवणारे अटलजी.... बैलगाडीतून निघालेली मिरवणूक असे अटलजींचे अवस्मिरणीय किस्से सांगताना बेलापूरकरांचे डोळेही पानावले.
अटलबिहारी वाजपेयी यांचे अहमदनगर जिल्ह्याचे छोटा नागपूर समजले जाणारे बेलापूर बुद्रूक गावावर विशेष प्रेम होते. वाजपेयींच्या निधनानंतर गाव शोकसागरात बुडालं. गाव कडकडीत बंद ठेवत ग्रामस्थांनी श्रद्धांजली वाहिली. बेलापूरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम 1940 पासून जोमाने सुरु झालेले होते. ही बाब लक्षात घेऊन अटलजींनी 28 वर्षांचे असताना 1952 मध्ये बेलापूरला जनसंघाचे प्रचारक म्हणून भेट देऊन त्यांच्याच उपस्थितीत जनसंघाची स्थापना केली. त्यावेळी ते रेल्वेने बेलापूर स्टेशनला आले. नंतर टांग्याने बेलापूर येथे आले.
त्यांच्या उपस्थितीत बेलापूर परिसरात दिवसभर जनसंघाच्या प्रचार कार्यासंदर्भात भरगच्च कार्यक्रम झाले. त्यावेळी ते जनसंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस होते. यावेळी कामाच्या व्यापात त्यांना जेवणाचेही भान राहिले नाही. रात्री 10 वा. शेवटची रेल्वे होती आणि दुसर्या दिवशी नियोजित कार्यक्रम होते. त्यामुळे त्यांनी रात्रीचे जेवणही टाळले. त्यावेळी श्रीरामपूर-बेलापूर रस्ता म्हणजे निव्वळ निर्मनुष्य जंगल होते. त्यामुळे भीतीदायक हा रास्ता वाटायचा...
बेलापूर-पढेगाव रस्त्यावर वस्त्या असल्याने भीती वाटत नसे. रात्रीचे नऊ वाजले आणि पढेगावहून रेल्वेने जायचे होते. त्यावेळी साधनांचा अभाव होता. अशावेळी गाडी चुकू नये म्हणून तत्कालीन जनसंघाचे कार्यकर्ते स्व. पांडुरंग शिंदे यांनी क्षणात सायकल आणली आणि अटलजींना चक्क सायकल पुढे नळीवर बसून सात किलोमीटर पढेगाव स्टेशनला सोडलं.
रेल्वे स्थानकावर रेल्वे येण्यास तीन तास प्रतीक्षा होती. भूक लागली त्यामुळे स्टेशनवरच अटलजींनी फुटाणे मुरमुरे विकत घेतले आणि कार्यकर्त्यांसोबत त्यांनी ते खाल्ले. त्यानंतर फक्त तांब्याभर पाणी पिऊन अटलजी दहाच्या रेल्वेने रवाना झाले. या सर्व आठवणींना स्वर्गीय पांडुरंग शिंदे यांच्या परिवाराने उजाळा दिला.
अटलजींनी बेलापूरला दोनदा भेट दिली. 1967 साली नगरला सभेला जात असताना बेलापूरकरांनी त्यांचं जल्लोषात स्वागत करून त्यांची मिरवणूक देखील काढली. त्यावेळी त्या मिरवणुकीत मोहन जाधव हे सोबत होते. त्यानंतर अटलजी पंतप्रधान झाले तेव्हा त्यांना मोहन जाधव यांनी शुभेच्छा पत्र पाठवले. तेव्हा अटलजींनी दिल्लीस ये आणि आपला 50 वर्षांपूर्वीचा फोटो घेऊन ये म्हणजे मला ओळखू येईल, असं सांगितलं होतं. वय आणि कुटुंबाच्या अडचणी असल्याने मी जावू शकलो नाही त्यांच्या निधनाने दुःखी असल्याचं जाधव सांगतात.
पुरणपोळीचा आग्रह
वर्ध्याचे माजी खासदार विजयराव मुळे यांनी खासदार असताना अटल बिहारी वाजपेयी यांचा मोठेपणा एका प्रसंगातून सांगितला. तसेच पुरणपोळीचा आग्रह केला असता त्यांना दिल्लीत पत्नीने पुरपोळी करून खाऊ घातल्याचा प्रसंगही त्यांनी सांगितला. नेता मोठा असला तरी त्यांचा साधेपणा या प्रसंगातून जाणवतो, असं ते सांगतात.
मीरा भाईंदर
भाईंदरच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत वाजपेयी यांच्या हस्ते लावण्यात आलेलं आंब्याचं वृक्ष आजही बहरदार स्थितीत उभं आहे. 18 जून 2003 रोजी वाजपेयींच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला होता. त्यावेळी वाजपेयींच्या हस्ते हापूस आंब्याचं हे रोपटं लावण्यात आलं. 17 जून ते 20 जून रोजी भाजपची चिंतन बैठक होती. त्यावेळी भाजपचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. या वृक्षाला जेव्हा आंबे आले, त्यावेळी या झाडाचे तीन डझन आंबे हे वाजपेयींना दिल्लीला पाठवण्यात आले होते. त्यावेळी ते आंबे खाऊन वाजपेयींनी स्तुतीही केली होती. या आंब्याच्या वृक्षाला आता अटलवृक्ष नाव देणार येणार आहे.
भाईंदरच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये अटलजी तीन वेळा आले. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचं लोकापर्ण हे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते 6 जानेवारी 2003 रोजी झालं.
चंद्रपूर
अटलजींचे चंद्रपुरात अनेक कार्यक्रमाच्या निमित्ताने दौरे झाले. ज्येष्ठ संघ स्वयंसेवक डॉ. सच्चीदानंद मुनगंटीवार यांनी आज त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. पक्ष कार्यात त्यांनी सर्वसमावेशकता यावी यासाठी 1967 साली झालेल्या दौऱ्यात दलित कार्यकर्त्यांच्या घरी भोजनाचा आस्वाद घेतला. तर चंद्रपूर नगर परिषदेत प्रथम संघ चालक डॉ. हेडगेवार यांच्या प्रतिमा अनावरण प्रसंगी त्यांनी डॉ. मुनगंटीवार यांच्या घरी भेट दिली.
राज्याच्या माजी मंत्री आणि ज्येष्ठ भाजप नेत्या शोभाताई फडणवीस यांनी दिवंगत नेते अटलजींच्या विविध आठवणीना उजाळा दिला. छोट्या छोट्या प्रसंगातून अटलजींनी कार्यकर्ता घडवल्याचं त्यांनी सांगितलं. एकदा दिल्लीत शेतकरी मोर्चा आयोजित करण्यात आला. मला शेतकरी मोर्चाचा अनुभव असल्याचं अटलजींना माहित होतं. त्यांनी दिल्लीत किती गर्दी आणाल असं मिश्कीलपणे विचारलं. आत्मविश्वासाने उत्तर दिल्यावर त्यांनी दिल्लीत मोर्चा आटोपल्यावर शाबासकी दिली होती, अशी आठवण शोभाताईंनी सांगितली.
रत्नागिरी
अटलजी तीन वेळा रत्नागिरीत आले होते. या तिन्ही वेळचे साक्षीदार आहेत रत्नागिरीतील ज्येष्ठ वकील विलास पाटणे. तिन्ही वेळा वाजपेयी यांची पाटणे यांनी भेट घेतली होती.
बेळगाव
बेळगाव आणि महाराष्ट्राचं अतूट नातं आहे. निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने अटलबिहारी वाजपेयी यांनी बेळगावला अनेकदा भेट दिली आणि त्यांच्या सभा अविस्मरणीय ठरल्या. पंतप्रधान होण्यापूर्वी त्यांची युनियन जिमखान्यावर झालेली सभा गर्दीचा उच्चांक मोडणारी ठरली होती. बेळगाव बरोबरच प्रचाराच्या निमित्ताने अटलबिहारी वाजपेयी यांनी रामदुर्गला देखील भेट देऊन तेथे भोजनाचा आस्वाद देखील घेतला होता. हलगत्ती येथील साईचे दही, वांग्याची भाजी, कोरट्याची चटणी आणि कडक भाकरी यांचा आस्वाद घेतला होता.
1982 मध्ये कर्नाटक विधानसभेची निवडणूक होती. त्यावेळी भाजप हा ब्राह्मणांचा पक्ष अशीच प्रतीमा होती. त्यामुळे भाजपला उमेदवार मिळणे अवघड झाले होते. पुढे होऊन कुणीही भाजपची उमेदवारी स्वीकारण्यास तयार नव्हते. त्यावेळी बेळगाव जिल्ह्यात भाजपने 12 उमेदवार रिंगणात उतरवले होते.
रामदुर्गमधून मारुती यंकाप्पा चंदरगी उभे होते. त्यांच्या प्रचारासाठी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी रामदुर्गला आले. यावेळी त्यांची भोजनाची व्यवस्था सोमनट्टी यांच्या बंगल्यात करण्यात आली होती. यावेळी हलगत्ती येथील साईचे दही, तेलावर परतलेल्या वांग्याची भाजी, कोरट्याची चटणी आणि कडक भाकरी असा मेनू होता. अत्यंत आवडीने वाजपेयी यांनी या मेनूचा आस्वाद घेतला होता अशी आठवण मारुती चंदरगी यांनी सांगितली. त्यावेळी वाजपेयी 57 वर्षांचे होते.
गोवा
अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहताना गोव्यातील भाजप नेत्यांनी वाजपेयी यांच्याशी निगडीत गोव्यातील आठवणींना उजाळा दिला. वाजपेयी यांना गोव्याचे मानकुराद आंबे आणि काजूचे बिबे (काजूचे हिरवे गर) फार आवडायचे. आंबा आणि काजूच्या हंगामात राष्ट्रीय कार्यकारिणी असली की गोव्यातून जाणारे कार्यकर्ते आवर्जून त्यांच्यासाठी मानकुराद आंबे आणि काजूचे बिबे घेऊन जात अशी आठवण भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर जागवली.
माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी देखील वाजपेयी यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. पार्सेकर म्हणाले, वाजपेयी गोव्यात आले की कार्यकर्त्यांच्या घरात राहणे पसंत करत. पणजीमध्ये आले की वाजपेयी माधव धोंड यांच्या घरी सर्वसामान्य कार्यकर्त्यासारखे रहायचे.
एकदा दाबोळी विमानतळावर उतरल्यानंतर वाजपेयी हे राजेंद्र आर्लेकर यांच्या दुचाकीवर मागे बसून त्यांच्या घरी गेले होते. तेथे त्यांनी आंघोळ करण्यासाठी गरम पाण्याशिवाय काही मागितले नव्हते, त्यांची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी कार्यकर्त्यांना नेहमीच प्रेरणा द्यायची, असे पार्सेकर म्हणाले. पार्सेकर यांनी मुख्यमंत्री बनल्यानंतर दुसऱ्या दिवशी दिल्लीत जाऊन वाजपेयी यांच्या पायावर माथा टेकून आशीर्वाद घेतले होते.
संबंधित बातम्या :
अटल बिहारी वाजपेयी अनंतात विलीन, मुलगी नमिताकडून मुखाग्नी
राष्ट्रीय स्मृती स्थळ इतकं महत्त्वाचं का?
वाजपेयींच्या आयुष्यातील 'राजकुमारी कौल' कोण होती?
वाजपेयींच्या श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध, MIM नगरसेवकाला बेदम चोप
अटल बिहारी वाजपेयी आणि महाराष्ट्र
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Aug 2018 07:34 PM (IST)
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, दिवंगत नेते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासोबत, जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसोबत अटलजींचं विशेष नातं आहे.
फोटो : सोशल मीडिया
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -