शिवसेनचे राजू वैद्य यांनी 'भारतरत्न' अटलजींचा श्रद्धांजली प्रस्ताव मांडला. मात्र सय्यद मतीन यांनी या प्रस्तावाला विरोध केला. यानंतर संतापलेले नगरसेवक प्रमोद राठोड, माधुरी अदवंत, रामेश्वर भादवे, उपमहापौर विजय औताडे हे मतीन यांच्यावर धावून गेले. यापुढे जाऊन त्यांनी मतीन यांना बेदम मारहाण करुन सभागृहाबाहेर बाहेर काढलं. तसंच सय्यद मतीनला कायमस्वरुपी निलंबित करावं, अशी मागणीही या नगरसेवकांनी केली आहे.
दरम्यान, माजी पंतप्रधान, प्रतिभासंपन्न कवी, प्रेरणादाई वक्ता, संवेदनशील व्यक्तीमत्व अशी एकपेक्षा एक बिरुदावली घेऊन जगणाऱ्या अटल पर्वाचा अंत झाला आहे. अटल बिहारी वाजपेयी यांचं एम्स रुग्णालयात प्रदीर्घ आजाराने काल (16 ऑगस्ट) संध्याकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. त्यांच्या निधनानंतर सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा घोषित करण्यात आला. दिल्लीतील राष्ट्रीय स्मृती स्थळ इथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.