Raju Shetti :  राज्यात लाउडस्पीकर, हनुमान चालिसा आणि अजानच्या मुद्यावरून राजकीय वातावरण गरम असताना आता या वादात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी उडी घेतली आहे. राजू शेट्टी यांनी दिवसभर नमाज आणि हनुमान चालिसा म्हणण्याची तयारी असल्याचे म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होणार असतील,  शेतकऱ्यांना दिवसा दहा तास वीज मिळत असेल आणि शेतकऱ्यांच्या मुलांना पाहिजे तसं शिक्षण मिळत असेल तर मी दिवसभर नमाज पडायला, हनुमान चालिसा म्हणायला तयार असल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटले.


राजू शेट्टी यांनी म्हटले की, राज्यामध्ये उसाचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यातच विजेचा लपंडाव सुरू आहे. विहिरीत पाणी असूनही शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थ्यांनी फी भरली नाही म्हणून त्यांना शाळेतून बाहेर काढण्यात येते. रोजगार हिरावला जात आहे. पेट्रोल-डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत गॅसचे भाव वाढले आहेत.  हे प्रश्न महत्त्वाचे असताना या प्रश्नावर चर्चा होताना दिसत नसल्याचे शेट्टी यांनी म्हटले. सामान्यांच्या प्रश्नावर आवाज उठवण्यात दोघेही सत्ताधारी आणि विरोधक कमी पडत असल्याची टीका त्यांनी केली.अनावश्यक गोष्टीवर वाद  करून धार्मिक आणि जातीय ध्रुवीकरण केले जात आहे आणि त्यावर राजकीय पोळी भाजली जात असल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटले. 


उसाच्या पिकाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या वक्तव्याचाही राजू शेट्टी यांनी समाचार घेतला. एका बाजूला उसामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येणार आहे असं सांगत करायचे आणि दुसरीकडे नवीन कारखाने विकत घ्यायाचे याला दुटप्पी भूमिका म्हणत असल्याचे शेट्टी यांनी म्हटले. गडकरींचे चाललंय तेच पवारांचा चालले पवार ऊस उत्पादकांना आळशी म्हणतात आणि गडकरी आत्महत्या करावी लागेल असे म्हणतात दोघेही देशातील जबाबदार नेते आहेत. उसाकडेच शेतकऱ्याचा ओढा का या प्रश्नाच्या मुळाकडे हे दोघे जात नाहीत. त्यांना माहीत असली तरी प्रश्नाच्या मुळाकडे जाणार नसल्याचे ही शेट्टी यांनी म्हटले. ऊस हे  एकमेव पिक आहे, ज्याला केंद्र सरकार हमीभाव जाहीर करते आणि हा हमीभाव देणे कारखान्यांना बंधनकारक असतं. त्यामुळे उसाचे उत्पादन वाढले आहे. याच पद्धतीने सर्व पिकांचं हमीभाव केंद्र सरकारने दिला तर उसाचे उत्पादन वाढणार नाही असेही राजू शेट्टींनी म्हटले.


शेतकरी चळवळ मजबूत करण्यासाठी राजकारणात आलो. राजकारण करत असताना चळवळीचे हित लक्षात घेऊनच निर्णय घेत असतो. त्यामुळे मी फक्त शेतकऱ्यांच्या बाजूने आहे जन्माला आलो तेव्हापासून ती मरेपर्यंत मी शेतकरी राहणार आहे त्यामुळे मला कोणीही गृहीत धरू नये अशी माझी भूमिका असल्याचे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.