Farmers Leaders on Narendra Singh Tomar : जे शेतकरी तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत, योजनांचा लाभ घेत आहेत त्यांची दिवसेंदिवस प्रगती होत आहे. तसेच त्या शेतकऱ्यांचे उत्पन्न केवळ दुप्पटच नाही तर 10 पटीने वाढले असल्याचा दावा केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर विविध स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. कृषीमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर एबीपी माझा डीजिटलने राज्यातील विविध शेतकरी नेत्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कृषीमंत्र्यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे.


शेतकऱ्यांचे उत्पन्न केवळ दुप्पटच नाही तर 10 पटीने वाढले असल्याचा दावा केंद्रीय कृषीमंत्री तोमर यांनी केला. यासंदर्भात एबीपी माझा डीजिटलने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष अनिल घनवट, किसानपु्त्र आंदोलनाचे अमर हबीब. भाजप नेते पाशा पटेल आणि शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांच्याशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी त्यांची मते मांडली.


राजू शेट्टी


कृषीमंत्री तोमर साहेब मोदी म्हणाले उत्पादन खर्चावर दीडपट हमीभाव देतो. त्यानंतर म्हणाले उत्पन्न दुप्पट करतो. तुम्ही म्हणताय शेतकऱ्यांचे उत्पन्न दसपट झाले. तुमचा हिशोब कागदावर मांडून द्या. नाहीतर एक काम करा, भारतातील साऱ्या शेतकऱ्यांची शेती तुम्हीच करा आणि कृषी भवनमध्ये काम करणाऱ्या चपराशाला सातव्य़ा वेतनासह जेवढा पगार आहे तेवढी रक्कन शेतकऱ्याला प्रति हेक्टरी द्या, असे म्हणत राजू शेट्टी यांनी कृषीमंत्र्यांच्या दाव्यावर टीका केली आहे.



कृषीमंत्री अवास्तव बोलतायेत : अमर हबीब


वादळ दिसू नये म्हणून शहामृग वाळूत तोंड खुपसतो असे म्हणतात, त्याप्रमाणे शेतीची विदारक अवस्था नजरेआड करण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री तोमर हे डोळे मिटून जे दिसते ते अवास्तव बोलत असल्याची टीका किसानपुत्र आंदोलनाचे अमिर हबीब यांनी केली आहे. खरे लपवल्याने वास्तव बदलत नाही. शेतकरी आत्महत्यांची नोंद न करण्याचा घेतलेला निर्णय देखील याच प्रकारचा होता असे ते म्हणाले. भाजप सरकार देखील शेतकरी विरोधीच आहे. सिलिंग, आवश्यक वस्तू हे कायदे शेतकऱ्यांच्या पायातील बेड्या आहेत. त्यामुळेच शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागत आहेत. भाजप सरकारला शेतकरी आत्महत्यांचे गांभीर्य नाही. देशात लाखों शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकरी आत्महत्या करीत असताना कृषीमंत्र्यानी भ्रामक चित्र निर्माण करण्यासाठी खोटे बोलणे निंदनीय असल्याचे अमर हबीब म्हणाले.


अनिल घनवट


केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दसपट वाढल्याचा कसा हिशोब लावला याचा अंदाज येत नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न आजही उत्पादन खर्चाइतके नाही. या सरकारने काही गोष्टी चांगल्या केल्या आहेत. इतर पिकांमध्ये काही हस्तक्षेप केला नाही. ग्राहक आणि शेतकरी यामध्ये त्यांनी हस्तक्षेप केला नाही. पण शेतकऱ्यांचे उत्पन्न दसपट झाले नसल्याचे स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष अनिल घनवट म्हणाले. सध्या शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला आहे. त्यामुळे खर्चाइतके उत्पादन मिळणे देखील शेतकऱ्यांना कठीण झाले असल्याचे घनवट म्हणाले.


रघुनाथदादा पाटील


केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी केलेलं वक्तव्य हे शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळणारे आहे. एकिकजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. तर दुसरीकडे शेतकरी कर्जबाजारी होत असल्याचे शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील म्हणाले. भाजपचे नेते अशी विधाने करण्यात पटाईत असून, जनतेमध्ये गैरसमज पसरवण्याचे काम करत असल्याची टीका रघुनाथ पाटील यांनी केली. शेतकऱ्यांचे उत्पन्न दहापट झाले तर मग शेतकऱ्यांच्या आत्महत्या का वाढल्या? असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे.


दरम्यान, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा अंतर्गत 'किसान भागीदारी, प्राथमिक हमारी' या मोहिमेचा शुभारंभ कृषीमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला होता. यावेळी तोमर यांनी देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांचे उत्पन्न केवळ दुप्पटच नाही तर 10 पटीने वाढले असल्याचा दावा कृषीमंत्र्यांनी केला होता. त्यांच्या या दाव्यानंतर शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी त्यांच्या या वक्तव्यावर टीका केली आहे.