Maharashtra Politics : राज्यात मावळतीकडे झुकलेल्या 14व्या विधानसभेत अभूतपूर्व अशा राजकीय घटना घडल्या. 2019 च्या सरकार स्थापनेपासून ते 2024 च्या अखेरपर्यंत या राजकीय घडामोडी घडतच राहिल्या. पहिल्यांदा राज्यातील जनतेनं भाजप आणि शिवसेना महायतीला कौल दिल्यानंतर मुख्यमंत्रीपदावरून बिनसल्याने महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. हे सरकार अडीच वर्ष कार्यरत असतानाच 2022 मध्ये राज्यांमध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी थेट शिवसेनेलाच खंडार पाडत भाजपला साथ देण्याचा निर्णय घेतला आणि ते मुख्यमंत्री झाले. त्यामुळे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणामध्ये भाजप सत्तेत आली. त्यानंतर झालेल्या अजित पवारांच्या राजकीय बंडाळीने पुन्हा एकदा राज्यांमध्ये राजकीय भूकंप झाला. अजित पवार यांनी राष्ट्रवादीला खिंडार पाडत महायुतीमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. 


त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये सत्तेत सर्व पक्षांना सत्ता चाखण्याची संधी मिळाली. कोणताच पक्ष सत्तेपासून दूर राहू शकला नाही. जनतेच्या प्रश्नाचं काय झालं? या प्रश्नाचे उत्तर मात्र काहीसं अनुत्तरीत आहे म्हटल्यास वावगं ठरणार नाही. मात्र, या बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये कोणाचा किती फायदा झाला आणि कोणाचा किती तोटा झाला याची सुद्धा राजकीय चर्चा होत आहे. राज्यामध्ये घडलेल्या या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर दैनिक सकाळकडून सर्वे करण्यात आला. यामध्ये बदललेल्या राजकीय समीकरणांमध्ये कोणत्या राजकीय पक्षाला सर्वाधिक लाभ झाला याचा कानोसा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. 


महाविकास आघाडीत काँग्रेस फायद्यात


यावेळी राज्यातील जनतेकडून महाविकास आघाडीचा सर्वाधिक लाभ कोणत्या पक्षाला झाला असे विचारण्यात आलं असता काँग्रेस सर्वाधिक लाभार्थी असल्याचं दिसून आले. राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर खिजगणतीत नसलेल्या काँग्रेसला सत्तेचा लाभ मिळाला. त्यामुळे काँग्रेसला संजीवनी मिळाली. 37.1 टक्के लोकांनी महाविकास आघाडीत काँग्रेसला लाभ झाल्याचं म्हटलं आहे.  18.5 टक्के लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाला लाभ झाल्याचे म्हटला आहे, तर शिवसेनेला 13.60 टक्के लोकांनी लाभ झाल्याचे म्हटलं आहे. 


सर्व घटक पक्षांना समान फायदा मिळाल्याचे 30.8 टक्के लोकांनी म्हटलं आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या उमेदवारांचा उद्धव ठाकरे यांनी झंझावाती प्रचार केला होता. त्यामुळे राज्यामध्ये सर्वाधिक काँग्रेसचे खासदार निवडून आले आहेत.
दुसरीकडे भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष असूनही सत्तेपासून दूर राहावं लागलं होतं. मात्र एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाळीने भाजपला अडीच वर्षांपूर्वी सत्तेची संधी मिळाली. यानंतर अजित पवार सुद्धा वर्षभरापूर्वी महायुतीमध्ये सामील झाले. त्यामुळे या समीकरणांमध्ये कोणाला लाभ मिळाला याबाबत विचारण्यात आले असता जनतेने सर्वाधिक लाभ हा शिंदेंच्या शिवसेनेचा झाल्याचे सांगितले. 


महायुतीत एकनाथ शिंदे फायद्यात


37.2 टक्के लोकांना शिवसेनेला फायदा झाल्याचे वाटते. 8.60 टक्के लोकांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला लाभ झाल्याचे वाटते. 22.9 टक्के लोकांना भाजपला लाभ झाल्याचे सांगितलं. तर सर्व पक्षांना समान फायदा झाल्याचे 31.2 टक्के लोकांनी सांगितलं. त्यामुळे महायुतीमध्ये बदललेल्या समीकरणांमध्ये एकनाथ शिंदे हे फायद्यात असल्याचे दिसून आलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सात खासदार निवडून आल्याने जवळपास भाजपच्या बरोबरीने खासदार निवडून आणले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या यशामुळे एकनाथ शिंदे यांना चांगलेच राजकीय बळ मिळाले. त्यांचे सात खासदार एनडीए सरकारच्या स्थापनेमध्ये सुद्धा महत्त्वपूर्ण ठरले आहेत. त्यामुळे बदललेल्या राजकीय समीकरणांमध्ये महायुतीचा लाभ हा शिंदेंना झाल्याचे सर्वेक्षणातून दिसून आलं आहे. मविआमध्ये काँग्रेस सर्वात मोठी लाभार्थी ठरल्याचे दिसून आला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या