पंढरपूर : राज्यातील शाळा सुरु करण्याबाबत राज्य सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. आधी विधानसभा आणि लोकसभेचे वर्ग भरावा आणि मगच पोटच्या गोळ्यांना शाळेत बोलावावं असा टोला माजी शिक्षणमंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी लगावला आहे. सोलापूर जिल्ह्याचे आमदार प्रशांत परिचारक यांनी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील संस्था चालक आणि मुख्याध्यापकांची बैठक बोलावली होती. या बैठकीत ढोबळे यांनी सरकारवर टीकेची झोड उठवताना आधी विधानसभेचे वर्ग भारावून नागरिकांत विश्वास संपादन करा आणि मगच शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घ्या असे ढोबळे म्हणाले.

ते म्हणाले की, कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना जनतेतूनही बेजबाबदार वर्तन होत आहे.  मृत्यूची संख्या वाढत चालली असताना भविष्यातली पीढी तरी या संकटातून वाचली पाहिजे. जीवघेण्या कोरोनावर औषध उपलब्ध नसताना कुणीही आपला पोटचा गोळा शाळेत पाठवायला तयार होईल असे वाटत नाही. देशाची ही पुढची पीढी सक्षम राहिली पाहिजे याची जाणीव ठेवून शाळा सुरू केली पाहिजे असा सल्ला माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांचा सरकारला दिला.

अनेक शाळा विलगीकरणासाठी वापरण्यात आलेल्या आहेत त्या शाळांचे निर्जंतुकीकरण करावे लागणार असून यातील काही रेड झोन मधील तर काही ग्रीन झोन मधील आहेत. ऑनलाईन शिक्षणाच्या बाबतीत ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी इंटरनेटची सुविधाच नसल्याने त्या गोरगरीब विद्यार्थ्यांना शिकता येणार नसल्याचे अनेक मुख्याध्यापकांनी बैठकीत सांगितले.

मुलांना शिक्षणापासून जास्त काळ दूर ठेवणे शक्य नसल्याने या बाबत काहीतरी ठोस उपाय योजताना अभ्यासक्रम कमी करून अथवा 2 वर्षाचे शिक्षण दीड वर्षात कसे द्यायचे यावर विचार करावा असे आमदार प्रशांत परिचारक यांनी सांगितले. यावेळी सरकारने आरोग्य व शिक्षणावर खर्च करावा. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी साधन सामग्री उपलब्ध करून द्यावी व मुख्याध्यापकांनी सुचवलेल्या सूचना आपण मुख्यमंत्र्यांकडे पोहोचवणार असल्याची माहिती आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली.

ऑनलाईन शिक्षणाचे धडे देताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व पालकांना मोठा आर्थिक व टेक्निकली सामना करावा लागत आहे, अशी खंत मुख्याध्यापकांनी व्यक्त केली. ऊस तोडणी कामगार, साखर शाळेवरील मुले यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना हे ऑनलाईन शिक्षण परवडणारे नाही. त्यामुळे ऑनलाईन ऐवजी शाळा सुरू झाल्यावर सुट्टीत जास्त वेळ शाळा घेऊन त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करून घ्यावा अशा सूचना काही मुख्यध्यापकांनी दिल्या. तर अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिकत असणाऱ्या आश्रम शाळेच्या समोर अॅडमिशन पासून ते शाळेची स्वच्छता, फिजिकल डिस्टन्सिंग कशी ठेवायची असे प्रश्न आहेत. ज्यामुलांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे अश्यानी ऑनलाईन शिक्षण कुठून घ्यायचं असा प्रश्न आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका शमशाद बागवान यांनी केला.

यावेळी कल्याणराव काळे , मंगळवेढ्यातील संस्थाचालक राहुल शहा, सुभाष माने यांच्यासह अनेक संस्थाचालक बैठकीस उपस्थित होते .