Nagpur News : सहकारी महिला कर्मचाऱ्याकडे टक लावून बघणे नागपूर मनपाचे (NMC) अधिकारी, कर्मचाऱ्यांना महागात पडणार आहे. याबाबत तक्रार आल्यास संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी महापालिका सेवेतील महिला कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळवणुकीपासून संरक्षण देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेत महिला तक्रार निवारण समिती (Internal Complaint Committee for Prevention of Sexual Harassment) स्थापन करण्यात आले आहे. मनपाच्या सर्वच झोन कार्यालयांत, तसेच विभागात फलक लावण्यात येणार आहे. समितीच्या अध्यक्षपदी डॉ. भावना सोनकुसळे यांची नियुक्ती करण्यात आली असून, सचिवपदी अलका गांवडे आहेत.


महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी., अतिरिक्त आयुक्त डॉ. राम जोशी, उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले, समितीच्या नवनियुक्त अध्यक्ष डॉ. भावना सोनकुसळे, सदस्य सचिव अलका गांवडे यांच्या उपस्थितीत महापालिकेच्या मुख्य इमारतीत मनपा महिला तक्रार निवारण समिती फलकाचे अनावरण करण्यात आले. महानगरपालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयात तसेच मनपाच्या विविध विभागात समितीचे फलक लावून, महिलांना समितीबाबत माहिती देण्यात यावी अशा सूचना यावेळी आयुक्त राधाकृष्णन बी यांनी केल्या.


दोषी आढळल्यास शिस्तभंगाची कारवाई करुन निलंबन


मनपा अंतर्गत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचा त्रास असल्यास, समितीच्या सदस्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन समितीच्या अध्यक्ष डॉ. सोनकुसळे यांनी यावेळी केले. समितीतील इतर सदस्यांमध्ये सहायक आयुक्त घनश्याम पंधरे, उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले, श्रीमती इस्टर शिंदे, श्रीमती कल्पना महल्ले, अॅड. सुरज पारोचे आणि अॅड. स्मिता सिंगलकर यांचा समावेश आहे. महिला तक्रार निवारण समितीकडे (ICC) येणाऱ्या पीडित व्यक्तींच्या संरक्षणाची आणि गुप्ततेची काळजी घेतली जाईल, चौकशीनंतर आरोपी व्यक्ती दोषी आढळल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, ज्यामध्ये निलंबनाची कारवाई होऊ शकते. कामाच्या ठिकाणी पुरुष सहकाऱ्याकडून अथवा प्रमुखाकडून, लैंगिक छळ होत असल्यास, महिलांनी त्वरित तक्रार दाखल करावी असे आवाहन यावेळी समितीच्या वतीने करण्यात आले.


'या' संदर्भात करता येणार तक्रार


लैंगिकता सूचक शारीरिक स्पर्श, अश्लील फोन, अश्लील बोलणे, लैंगिकता सूचक शेरे मारणे, अश्लील विनोद सांगणे, टक लावून पाहणे, अनावश्यक खर्च, चुकून शरीराच्या विशिष्ट अवयवांना स्पर्श करणे, घसटणे, अतीजवळ येणे, अश्लील वा धमकीची पत्रे पाठवणे, ऑफिस, बाथरुम, लिफ्टच्या भिंतीवर लिखाण किंवा चित्र लावणे इत्यादीबाबत तक्रारी असल्यास, महिला कर्मचाऱ्यांनी मनपा, धरमपेठ झोन क्रमांक 2, विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ. भावना सोनकुसळे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मनपा प्रशासनाने महिला कर्मचाऱ्यांना केले आहे.


ही बातमी देखील वाचा...


नागपूरच्या सायन्स काँग्रेसमध्ये महिलांचे स्वागत हळदीकुंकू लावून केल्यानं वाद निर्माण, आयोजकांकडून स्पष्टीकरणी