सांगली : लग्न समारंभात केलेल्या जेवणातून 100 हून अधिक जणांना विषबाधा झाल्याची घटना सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यात घडली. तासगाव येथील एका मंगल कार्यालयात दोन दिवसांपूर्वी आरवडे आणि येळावी कुटुंबीयांचा लग्नसोहळा पार पडला. त्यामध्ये ही घटना घडली.
लग्नात जेवण केल्यानंतर काहींना उलटी आणि जुलाबाचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे काही लोकांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तर काहींना प्राथमिक आरोग्य केंद्र आरवडे येथे दाखल करण्यात आलं.
वैद्यकीय अधिकारी कमी पडू लागल्याने मांजर्डे, डोर्ली आणि गौरगाव येथून वैद्यकीय मदत मागवण्यात आली असून आता सर्वांची प्रकृती स्थिर आहे.
लग्नात जेवणाबरोबरच मठ्ठा देण्यात आला होता. उन्हाळ्याचे दिवस असल्याने लोकांनी मठ्ठा जास्त प्रमाणात प्यायला. पण मठ्ठा बनवल्यानंतर तो बनवण्यासाठी वापरलेलं पाणी आणि त्यात टाकला गेलेला बर्फ हा दूषित असल्यामुळेच हा प्रकार झाला असवा, असा अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे.