जळगाव : जळगाव जिल्ह्यात वाळू माफियांची मुजोरी दिवसेंदिवस वाढतच असल्याचे पाहायला मिळत आहे. पाचोरा तालुक्यात अवैध वाळू वाहतुकिविरोधात प्राताधिकारी राजेंद्र कचरे यांनी जोरदार मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळेच त्यांच्या घरावर वाळू माफियांनी हल्ला केल्याची माहिती मिळते आहे.


प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांच्या घरावर वाळू माफियांनी दगडफेक करुन त्यांच्यावर दहशत निर्माण करुन अवैध वाळू मोहीम थांबविण्याचा प्रयत्न केला आहे. पाचोरा शहरातील कृष्णाजी नगर परिसरात प्रांताधिकारी कचरे राहत असलेल्या सुमन अपार्टमेंटवर रात्री दोन वाजेच्या सुमारास ही दगडफेक करण्यात आली.

या दगडफेकीत कचरे यांच्या घराच्या काचा फुटल्या असून, सुदैवाने यात कोणीही जखमी झालेले नाही. या घटने संदर्भात पाचोरा पोलिसात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरु आहे. या घटनेतील संशयित वाळू व्यावसायिक पिंटू पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.