उस्मानाबाद : 90 लाख रुपयांची औषधं जप्त करण्यात आली आहेत. एमआयडीसीमधील अभय आयुर्वेदिक फार्मसी या औषध उत्पादक कंपनीवर अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई केली आहे. या कारवाईत औषधांचा एवढा मोठा साठा जप्त करण्यात आला. आतापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात औषध साठा जप्त करण्याची मराठवाड्यातील ही पहिलीच घटना आहे.


मधुमेह कमी करा, लठ्ठपणावर हमखास उपाय अशा भ्रामक जाहिराती करुन आपली वैद्यकीय उत्पादने ग्राहकांच्या माथी मारल्याचा कंपनीवर आरोप आहे.

रोग पूर्ण बरा होऊ शकतो, असा दावा करणाऱ्या जाहिराती करताच येत नाहीत. मधुमेह, मोतीबिंदू, कर्करोग, लठ्ठापणा, वंध्यत्व, फिट्स, ब्रेन ट्युमर असे 54 आजार बरा करणारी जाहिरात करणे 'द ड्रग्ज आणि मॅजिक रेडिमेज' या कायद्यानुसार गुन्हा आहे. या कायद्यांतर्गत खटला दाखल झाल्यानंतर शिक्षा आणि दंड होऊ शकतो.

ग्राहकांना भ्रामक जाहिराती करुन भ्रमित करणाऱ्या त्यांच्या खिशाला गंडा लावणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारने 'द ड्रग्ज आणि मॅजिक रेडिमेज' हा कायदा केला आहे. या कायद्याचा आधार घेत अन्न आणि औषध प्रशासनाने ही कारवाई केली आहे.

अभय आयुर्वेदिक फार्मसी कंपनी अनेक वर्षापासून उस्मानाबादमध्ये औषध निर्माण करण्याच काम करत आहे. यामध्ये अभय मेदारी, गोळ्या आणि पातळ औषध अभय जन्बुकासव या औषधांचा समवेश आहे. या औषधांच्या डब्यावर आणि बाटल्यावर बेकायदेशीर जाहिरातीचे स्टीकर लावून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जाहिरात केली जात होती म्हणून ही कारवाई करण्यात आली.