मुंबई: पुण्यातील सनबर्न फेस्टिव्हलचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. सनातन संस्था आणि हिंदू जनजागरण समितीच्या विरोधामुळे या फेस्टिव्हलवर वादाचे ढग दाटले होते. मात्र या कार्यक्रमाला तहसीलदारांनी परवानगी दिल्यामुळे, हायकोर्टाने याबाबतच्या सुनावणीलाच नकार दिला.

त्यामुळे आजपासून तीन दिवसांच्या सनबर्न फेस्टिव्हलला सुरुवात होत आहे. पुण्यातील केसनंद या गावात या फेस्टिव्हलला रंग चढेल.

सनबर्न फेस्टिव्हल म्हणजे काय?

सनबर्न हा पूर्णत: व्यावसायिक ईडीएम अर्थात इलेक्ट्रिक डान्स म्युझिक फेस्टिव्हल आहे. ईडीएम यावरुनच हा फेस्टिव्हल कसा असेल, याचा अंदाज बांधता येईल.

डीजेचा ठोका, चकाकणारं लाईटिंग आणि बेधुंद तरुणाई असं थोडक्यात वर्णन या सनबर्न फेस्टिव्हलचं करता येईल.

हा आशियातील सर्वात मोठा, तर जगातील पहिल्या 10 फेस्टिव्हल्सपैकी एक म्युझिक फेस्टिव्हल असल्याचा दावा करण्यात येतो.



वेगवेगळ्या रंगात, वेगवेगळ्या ढंगात, 'बेफिक्रे' तरुणाई बेभान होऊन यात सहभागी होतात.  बिनधास्त डान्स, रापचिक म्युझिक आणि धुंदी आणणाऱ्या लाईट्समुळे हा फेस्टिव्हल परिचीत आहे.

या फेस्टिव्हलमध्ये केवळ म्युझिक आणि डान्स नाही तर विविध कला, खान-पान, थरारक गेम्स, कलाकुसर, हस्तकलांचा मेळा इथे भरतो.  त्यामुळे इथे यायचं आणि इथलंच होऊन जायचं, असं आयोजन करण्यात येतं.

सनबर्न फेस्टिव्हलचा इतिहास

सनबर्न फेस्टिव्हलचं हे पहिलंच वर्ष नाही. गेल्या 9 वर्षापासून म्हणजेच 2007 पासून गोव्यात हा फेस्टिव्हल सुरु आहे. दरवर्षी इयर एण्डिंगला या फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात येतं.

गोव्यात रुळलेला हा फेस्टिव्हल यंदा पहिल्यांदाच गोव्याबाहेर हलवण्यात आला आहे. यंदा तो महाराष्ट्रात - पुण्यात  आयोजित करण्यात आला आहे.

निखिल चिनापा

'गॉडफादर ऑफ डान्स म्युझिक' आणि MTV वरील 'रोडीज' आणि 'स्प्लिट्स व्हिला'चा अँकर निखील चिनापाने  सर्वात आधी सनबर्न फेस्टिव्हलचं आयोजन केलं होतं.



28-29 डिसेंबर 2007 मध्ये कांदोलिमच्या फेसाळलेल्या समुद्रकिनारी तरुणाई बेभान झाली होती. जगभरातील बँडचा ठेका आणि निखील चिनापा, रोहित बार्करचं खिळवून ठेवणारं अँकरिंग, त्यामुळे त्याचवेळी सनबर्न फेस्टचे पाय पाळण्यात दिसले होते.

2008 सनबर्न फेस्ट

2007 साली पहिल्याच वर्षी 'सनबर्न'ने गोव्याचंच नव्हे तर जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यामुळे 2008 सालचा सनबर्न फेस्टिव्हल वर्षभरापूर्वीपासूनच चर्चेत होता. मात्र त्याचवर्षी 26/11 ला मुंबईवर दहशतवादी हल्ला झाल्याने, या फेस्टिव्हलवर संकट होतं. मात्र हळूहळू हे संकट निवळलं आणि हलकं म्युझिक कधी लाऊड झालं हे कळलंच नाही.

त्या वर्षी फेस्टिव्हलची 'इलेक्ट्रिक सर्कस' ही थिम होती. त्यासाठी दोन मोठे भव्य स्टेज उभारण्यात आले होते.  'बन्यान ट्री' हे ट्रान्स अॅक्टसाठी, तर 'सर्कस स्टेज' हे हाऊस म्युझिकसाठी होतं.



याशिवाय या फेस्टिव्हलमध्ये वस्तू,पदार्थांचे विविध स्टॉल्स आणि बीच व्हॉलिबॉलचाही समावेश करण्यात आला होता.

सनबर्न फेस्टिव्हल 2009

दोन वर्षांचा अनुभव असलेला सनबर्नने 2009 साली तिसऱ्या वर्षात पदार्पण केलं होतं. त्यावेळी या फेस्टिव्हलमध्ये सहभाग घेणाऱ्यांची संख्याही तुफान वाढत होती. 2009 सालच्या फेस्टिव्हलला 22 हजार प्रेक्षकांनी हजेरी लावली होती.



त्याचवेळी सनबर्नच्या रात्रीचे साडेदहा ते पहाटे पाच या टाईमिंगने 'वेळ' भेदून तो चोवीस तासांचा केला.

सनबर्न फेस्टिव्हल 2010

27 ते 29 डिसेंबर 2010 मध्ये सनबर्न फेस्टिव्हलचा चौथा सिझन रंगला. पहिल्याच सिझनला परदेशी कलाकरांनी हजेरी लावली होती. त्यामुळे आधीच  गोव्यात परदेशी पाहुण्यांचा ओढा असताना, परदेशी कलावंतही या फेस्टिव्हलला हजेरी लावण्यासाठी मागे राहिले नाहीत.

इतकंच नाही तर बॉलिवूड अभिनेता संजय दत्तनेही 2010 सालच्या सनबर्न फेस्टिव्हलला हजेरी लावली होती.

सनबर्न फेस्टिव्हल 2011

सनबर्न फेस्टिव्हलचा पाचवा सिझन 27 ते 29 डिसेंबर 2011 दरम्यान रंगला.  पाचव्या सिझनपर्यंत या फेस्टिव्हलने आपली पाळंमुळं चांगलीच रोवली होती. एक नामांकित डान्स-म्युझिक शो म्हणून सनबर्न फेस्टिव्हल नावारुपास आला होता.



सनबर्न फेस्टिव्हल 2012

गोव्यातील कांदोलिम बीचवरच 2012 साली सनबर्न फेस्टिव्हलचा पुढचा हंगाम गाजला.

सनबर्न फेस्टिव्हल 2013

यापूर्वी कांदोलिम बीच सहा सीझन गाजवणाऱ्या सनबर्न फेस्टिव्हलने सातव्या सीझनसाठी जागा बदलली. गोव्यातीलच वागातोर इथं सातव्या सनबर्न फेस्टिव्हलची धूम पाहायला मिळाली.



यावेळी 120 आर्टिस्ट आणि 200 तासांपेक्षा जास्त म्युझिक ही या सिझनची खासियत होती.  10 मोठे स्टेज आणि एक लाखांहून अधिक प्रेक्षक यावेळी सहभागी झाले होते.

IIT, NIT मध्येही सनबर्न फेस्टिव्हलची हवा

देशभरात गाजत असलेल्या तरुणाईच्या सनबर्न फेस्टिव्हलने गोव्याची मर्यादा कधीच ओलांडली होती. कॉलेज तरुणांमध्ये सनबर्न फेस्टिव्हलची चर्चा रंगत होती. त्याचवेळी विविध IIT, NIT, IIM आणि अन्य कॉलेजमध्ये सनबर्न फेस्टिव्हल पाहायला मिळाले.



सनबर्न फेस्टिव्हल 2014

सनबर्न फेस्टिव्हलचा आठवा सिझन वागातोर इथंच पार पडला. एरव्ही तीन दिवस चालणारा हा फेस्टिव्हल 2014 ला मात्र एक दिवस वाढवावा लागला.

सनबर्न फेस्टिव्हल 2015

नवव्या हंगामातही सनबर्न फेस्टिव्हल चार दिवस रंगला. यावेळी गोव्याच्या आंतरराष्ट्रीय तिकीट पार्टनर 'वियागोगो'ने  सनबर्न फेस्टिव्हलला आशियातील सर्वात मोठा म्युझिक फेस्टिव्हल जाहीर केलं.

जगभरातील 42 पेक्षा जास्त देशातील लोकांनी 'वियागोगो'वरुन सनबर्न फेस्टिव्हलची तिकीटं बुक केली होती.